सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • अमृता फडवणीस यांनी भाऊ रंगारी गणपतीची आरती
  • समाजसेवा करण्याचा सल्ला केजरीवाल यांनी मानला नाही : आण्णा हजारे
 पूर्ण तपशील

श्रवण निरुपण (भाग १)

डिजिटल पुणे    19-08-2024 11:43:21

श्रवण निरुपण (भाग १)

ऐकिल्याविण कळेना | हे ठाऊके आहे जना | याकारणे मूळ प्रेत्ना | श्रवण आधी ||७/८/१९||

ऐकल्याशिवाय एखादी गोष्ट आपल्याला कळत नाही. हे सर्वांनाच ठाऊक आहे. म्हणून कुठल्याही कार्याचा (सांसारिक/पारमार्थिक) प्रयत्न करण्याआधी त्या विषयाचे श्रवण महत्वाचे असते.

आत्मा वा अरे श्रोतव्य: ! मन्तव्य: निदिध्यासितव्या: ! या आत्माचेच केवळ श्रवण करावे. मनन करावे आणि वारंवार ध्यान करावे. असे बृहदारण्यक उपनिषदामध्ये याज्ञवल्क्य ऋषी मैत्रेयीला सांगतात. सनातन वैदिक धर्माच्या सद्गुरू शिष्य परंपरेत प्राचीन काळापासून परमार्थाची वाटचाल सद्गुरू मुखातून निघणाऱ्या वेदतुल्य वाणीच्या श्रवणापासूनच होते. १) पारमार्थिक वाटचाल करणाऱ्या नव उपासकासाठी २) अपरोक्ष ज्ञान दृढ न झालेला साधकासाठी ३) शास्त्रात अनेक मतमतांतरे (शाखाभेद, कामभेद इ. मुळे) असतात ती परस्पर विरोधी वाटू शकतात त्यामुळे त्यांच्याविषयी गोंधळ किंवा संशय निर्माण होऊ शकतो म्हणून त्यांचा नेमका अर्थ समजून घेण्यासाठी ४) सर्व वेदान्ताच्या अंती ब्रह्मात्मऐक्यच आहे अशी बुद्धी होण्यासाठी ५) बुद्धीचे समाधान तर्काने होते म्हणून त्यासाठी शास्त्रार्थ करावा लागतो म्हणून पूर्व आचार्यांनी श्रवण साधनाचा वारंवार उच्चार केला आहे.

अस्तु बोधोsपरोक्षोsत्र महावाक्यात्तथाsप्यसौ |

न दृढ: श्रवणादीनामाचार्यै: पुनरीरणात् ||पञ्चदशी, तृप्तीदीप ९७||

अर्थ – या ब्रह्मात्म विषयामध्ये महावाक्यावरून अपरोक्ष बोध होवो. तरी पण तो दृढ होत नाही. म्हणून आचार्यांनी श्रवणादिकाचे पुनरपि विधान केले आहे.

बाढं सन्ति ह्यदाढर्यस्य हेतव: श्रुत्यनेकता |

असंभाव्यत्वमर्थस्य विपरीता च भावना ||पञ्चदशी, तृप्तीदीप ९९||

अर्थ – श्रुतींची अनेकता, त्यांच्या अर्थाचे असंभवनीयत्व व विपरीता भावना असे अदृढतेचे अनेक हेतू नि:संशय आहेत.

श्रीसमर्थ सातव्या दशकातील आठव्या श्रवण निरुपण या समासात मार्गदर्शन करतात की या श्रवणामुळे भक्ति स्वाधीन होते, विरक्ति उत्पन्न होते, दृश्याची आसक्ति सुटते, चित्तशुद्धी होते, बुद्धीला स्थिरता येते, अभिमान नष्ट होतो, निश्चय करण्याची शक्ती येते, माझेपणा नाहीसा होतो, समाधान येऊ लागते, शंका फिटतात, संशय नाहीसे होतात, मनातला दोष जाऊन स्वभावात बदल घडून येतो. श्रवणाने मन आवरले जाते, देहबुद्धीचे बंधन नाश पावते, अनेक घात टळतात, अनेक संकटे समूळ नाहीशी होतात. कार्य सिद्धीला जाते, समाधि साध्य होते, संपूर्ण समाधान प्राप्त करण्यासाठी आवश्यक पूर्व तयारी सिद्ध होते, सत्संगतीमध्ये श्रवण घडले तर आत्मनात्मविवेक प्राप्त होतो. मन तदाकार होऊन जाते. श्रवणाने ज्ञान वाढते, प्रज्ञेचा उत्कर्ष होतो, विषयांची ओढ कमी होते, ब्रह्मविचार कळू लागतो, ज्ञानशक्ति वाढते, मन सूक्ष्म झाल्यामुळे धारणा वाढून साधकाला आत्मवस्तूचा स्पष्ट अनुभव येतो, सद्बुद्धी व विवेक जागा होतो. भगवंताची ओढ लागते, कुसंगती तुटते, कामविकार नष्ट होतो, अनेक धोके कमी होतात, मोहाचा नाश होतो, श्रवणामुळे स्फूर्तीचा प्रकाश (प्रतिभा) अंतरंगात प्रगट होतो, उत्तम गती, शांती, कधीही न ढळणारे निवृत्ती पद प्राप्त होते.

 


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती