सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
 पूर्ण तपशील

विकी कौशल स्टारर 'छावा' चित्रपटाबद्दल आयपीएस विश्वास नांगरे पाटील यांनी केली पोस्ट...

डिजिटल पुणे    24-02-2025 12:25:02

मुंबई : लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' चित्रपटाची सध्या बॉक्स ऑफिसवर क्रेझ पाहायला मिळत आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता विकी कौशलनं छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकरली आहे. तसेच साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदान्नानं येसूबाईंची भूमिका केली आहे. या चित्रपटात अभिनेता अक्षय खन्ना औरंगजेबाच्या भूमिकेत आहे. सध्या या चित्रपटाचे अनेक सेलिब्रिटी आणि राजकीय नेते कौतुक करत आहेत. आता या चित्रपटाबद्दल आयपीएस विश्वास नांगरे पाटील यांनी देखील कौतुक केलं आहे. त्यांनी त्याच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. आता ही पोस्ट सोशल मीडियावर खूप चर्चेत आली आहे. ही पोस्ट अनेकांना आवडली आहे.

आयपीएस विश्वास नांगरे पाटील यांनी केलं कौतुक : आयपीएस विश्वास नांगरे पाटील यांनी विकी कौशलचा छत्रपती संभाजी महाराज यांच्या लूकमधील एक फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं, 'छत्रपती संभाजी महाराज हे एक गारूड आहे, मराठी माणसाच्या स्वभिमानाचे, स्फुल्लिंगाच प्रतीक आहे, स्वराज्याच्या स्वप्नाचे जिवंत, मूर्तिमंत द्योतक आहे.' आता या पोस्टवर अनेकजण हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत आहे.

विश्वास नांगरे पाटील यांची संपूर्ण पोस्ट

छावा………

ज़िंदा रहे….. काळजाला चिरत जातात या काव्यपंक्ती, ज्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांच्या डोळ्यांत धगधगत्या सळ्या खुपसल्या जातात,त्यांची जीभ खेचून काढली जाते.

सळसळतात धमन्या, ज्यावेळी त्यांच्या जखमांवर मीठ चोळले जाते!

‘मन के जीते जीत, मन के हारे हार , हार गये जो बिनलढे,उनपर हैं धिक्कार !’

केवढी उमेद केवढी प्रेरणा देणारे हे शब्द ! स्वतःला मैदानात भिडायची, लढायची आणि शेवटच्या श्वासापर्यंत झुंझायची ऊर्जा देतात.

‘हाथी घोडे, तोफ तलवारे

फौज तो ‘तेरी सारी हैं

पर जंजिरोंमे जकडा हुआ मेरा राजा

अब भी सब पे भारी हैं !

छत्रपती संभाजी महाराज हे एक गारूड आहे, मराठी माणसाच्या स्वभिमानाचे , स्फुल्लिंगाच प्रतीक आहे, स्वराज्याच्या स्वप्नाचे जिवंत, मूर्तिमंत द्योतक आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे प्रौढ, प्रताप, पुरंदर स्वरूप आहे. असा पराक्रमी, शूर आणि चतुरस्त्र भूप होणे नाही. प्रभु शंभूराजे, शतशः नमन तुम्हाला ! काय घ्यावं आम्ही मावळ्यांनी तुमच्या धगधगत्या आयुष्यातून ?

आम्ही घ्यावा निर्भयपणा,

आम्ही सोडावी लाचारी आणि गुलामगिरी,

विचारांची आणि कृतींची

आम्ही सोडावं स्वार्थी आणि घुस्मटलेलं जगणं,

घ्यावी कणभर तरी आपल्याकडून जिद्द,

करारी बाणा आणि महाराष्ट्र धर्म !

समतेचा, नीतिमत्तेचा शिकावा धडा !

राहावा मनोमनी चिंतावा क्षणोक्षणी,

शेर शिवराज आणि त्यांचा छावा !

जगदंब जगदंब !

'छावा' चित्रपटाबद्दल : विकी कौशल स्टारर 'छावा' चित्रपट प्रदर्शित होऊन 10 दिवस झाले आहेत. या चित्रपटानं 10 दिवसांत 300 कोटीहून अधिक कमाई केली आहे. हा चित्रपट 400 कोटी कमाई करण्याची वाटचाल करत आहे. 'छावा' चित्रपट पाहण्यासाठी आता देखील चित्रपटगृहांमध्ये गर्दी होतं आहे.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती