मुंबई : देशांतर्गत अन्नधान्य महागाई कमी करण्यासाठी गेल्या वर्षी लागू केलेले बासमती तांदूळ आणि कांद्यावरील किमान निर्यात मूल्य (एमईपी) रद्द करण्याचा मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्याचबरोबर खाद्यतेलावरील आयात शुल्क वाढविण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे देशातील कांदा, बासमती तांदूळ आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शहा यांचे आभार मानले आहेत. कांद्यासह बासमती तांदळावरील निर्यात मूल्य रद्द करण्याबरोबरच खाद्य तेलावरील आयात शुल्क वाढविण्याची आग्रही मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यासह केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाकडे सातत्याने केली होती. त्यांच्या या मागणीला यश आले आहे.
देशांतर्गत अन्नधान्याच्या महागाईला नियंत्रित करण्यासाठी कांदा आणि बासमती तांदळावर निर्यात मूल्य लावले होते. काल (शुक्रवारी) केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात मूल्य हटवले आहे. या निर्णयाचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. त्याचबरोबर खाद्यतेलाच्या आयात शुल्कात मोठी वाढ करण्यात आली आहे. यामुळे देशातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. सोयाबीनच्या किंमती वाढून शेतकऱ्यांना चांगला दर मिळणार आहे.
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंबंधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चार दिवसांपूर्वीच (दि. 11 सप्टेंबर) मंत्रालयातील त्यांच्या दालनात विशेष बैठक घेतली होती. कांदा, सोयाबीन आणि बासमती तांदळाच्या प्रश्नासंबधी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यादृष्टीने कार्यवाही सुरु करण्यात आली होती. केंद्र सरकारने कांदा आणि बासमती तांदळावरील निर्यात मूल्य हटवावे तसेच खाद्य तेलाच्या आयात शुल्कात वाढ करण्याची आग्रही मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडे केली होती. त्याचा सातत्याने पाठपुरावा केला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मागणीला यश आले आहे. केंद्राने घेतलेल्या या निर्णयाचा देशातल्या कांदा, बासमती तांदूळ आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. शेतकरी हिताच्या या निर्णयाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्यासह वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांचे आभार मानले आहेत.