मुंबई : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा येत्या 10 नोव्हेंबर 2024 रोजी घेण्यात येणार असून यासाठी अर्हताप्राप्त परीक्षार्थींनी 30 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत करण्यात आले आहे.
इयत्ता पहिली ते पाचवी आणि इयत्ता सहावी ते आठवीसाठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक, शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमतः ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी 30 सप्टेंबर पर्यंत असून 28 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर 2024 या कालावधीत प्रवेश पत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेता येईल. शिक्षक पात्रता परीक्षा पहिला पेपर 10 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.30 ते 1 वाजेपर्यंत होईल तर दुसरा पेपर 10 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 ते 4.30 या वेळेत होईल.
या परीक्षेशी संबंधित सर्व शासन निर्णय अनुषंगिक माहिती सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या https://mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाइन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क भरणे, परीक्षेची वेळ व इतर सविस्तर माहितीचा तपशील परिषदेच्या या संकेतस्थळावर देण्यात आला असून सर्व संबंधितांनी या संकेतस्थळास नियमित भेट द्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे उपायुक्त संजयकुमार राठोड यांनी केले आहे.