सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • पुण्यात पीएमपाएल ची सेवा रात्रभर सुरू राहणार
  • अजित पवारांना मोदी शाहाच्या दयेवर जगावे लागेल : वड्डेट्टीवार
  • भाजपाचे नितीन गडकरी,देवेंद्र फडवणीस ,चंद्रशेखर बावनकुळे ,दानवे यांचे कडे विधानसभा निवडणुकांचे नेतृत्व
  • काहीना देव झाल्यासारखे वाटते : मोहन भागवत
 पूर्ण तपशील

द्वैतकल्पना निरसन (भाग १)

डिजिटल पुणे    30-06-2024 12:57:53

द्वैतकल्पना निरसन (भाग १)

ब्रह्म अंतरी प्रकाशे | आणी मायाहि प्रत्यक्ष दिसे | आतां हे द्वैत निरसे | कवणेपरी हो ||७/५/२||

अंतरंगात शुद्ध ब्रह्म प्रकाशित होत आहे आणि बाहेर इंद्रियांना माया प्रत्यक्ष दिसते. या द्वैताचे निरसन कशा पद्धतीने व्हावे ? हे सांगा.

द्वैत–अद्वैत, ब्रह्म-माया, ज्ञान-अज्ञान हा सर्व मनाचा खेळ आहे. मायाच हे मन उत्पन्न करते म्हणून तेही मिथ्या आहे. हा द्वैताचा खेळ काही संपत नाही. याला उत्तर म्हणून श्रीसमर्थ म्हणतात की प्रथम ही माया आणि ब्रह्म यांना जाणणारे कोण आहे ? मन जेव्हा ब्रह्माची कल्पना करते तेव्हा ती खरी असते त्यास संकल्प असे म्हणतात. तेच मन जेव्हा मायेची कल्पना करते तेव्हा ती खोटी असते त्यास विकल्प असे म्हणतात.

ऐक तुर्येचे लक्षण | जेथे सर्व जाणपण | सर्वचि नाही कवण | जाणेल गा ||७/५/६||

साधक एकीकडे मायेला जाणतो आणि दुसरीकडे ब्रह्माचे ज्ञान असते अशा सर्व काही जाणणाऱ्या साक्षिणी अवस्थेला तुर्या म्हणतात. पण जेथे सर्व नाहीसे झाले तेथे जाणायला मग काय उरले ? मन नाहीसे झाल्यावर साक्षीपणाने बघायला कोण शिल्लक राहिले ? दृश्याचा कोणताच गुण शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणी नाही. पण साक्षीपणा, चैतन्य आणि सत्ता हे गुण माया उगाच ब्रह्माच्या माथी मारते. जसे आकाश एकच आहे पण घटाकाश म्हणजे भांड्यातील आकाश, मठाकाश म्हणजे घरातील आकाश आणि महदाकाश म्हणजे विश्वातील आकाश असे तीन भेद आकाशाचे केले जातात. तसे माया खरी मानली की ब्रह्मावर गुणांचा आरोप केला जातो; मूळ ब्रह्मात ते गुण नाहीत. माया जोपर्यंत खरी वाटते तोपर्यंत ब्रह्म हे सर्वाला साक्षी आहे असे द्वैत असते. माया व अविद्या दोन्ही नाहीशा झाल्या की द्वैत मिटते व त्याबरोबर साक्षित्व देखील मिटते.

उन्मन म्हणजे – उर्द्ध्वगती किंवा पूर्णता

म्हणोनि सर्वसाक्षी मन | तेचि जालिया उन्मन | मग तुर्यारूप ज्ञान | ते मावळोन गेले ||७/५/११||

मनच विराट होता होता सर्व साक्षी बनते. ते जेव्हा उन्मन होते तेव्हा तुर्या अवस्था मावळते. तेव्हा मी सर्व जाणतो हे ज्ञान देखील मावळते. उन्मनी अवस्थेत द्वैत नाहीसे होते. केवल अद्वैत उरते. द्वैताचे चिंतन आपोपाप थांबते. द्वैताचे चिंतन म्हणजे वृत्तीच आहे. उन्मन या शब्दाचा अर्थ आहे – (उद्+मन) उद् म्हणजे उर्ध्वगति, पूर्णता. दृश्यातून, अज्ञानातून मुक्ती. ब्रह्माशी एकाकार होणे, विलीन होणे, कल्पनारहित होणे, वृत्तिचा पूर्ण निरोध होणे. मनाची पूर्णावस्था.

मनाला दृश्य खरे वाटते. पण तर्क करत गेले तर ते अशाश्वत वाटते. मग दृश्य मायामय आहे आणि शुद्ध ब्रह्म मायेच्या पल्याड आहे अशी कल्पना केली तर मन संकेताने दोन्हीचे अस्तित्व मानते. पण ज्ञानी पुरुष हे ब्रह्म कल्पनेरहित आहे हे जाणत असतात. ब्रह्मअनुभवाने द्वैत शिल्लक राहत नाही. द्वैत आणि अद्वैत याही मनाच्याच कल्पना आहेत.

संशोधक, लेखक, कथाव्यास - श्री. दामोदर प्र. रामदासी, पुणे.


 लोकांच्या प्रतिक्रिया

Digital Pune
श्रीमती मेघा प्रदीप खरात
 11-07-2024 16:27:18

अतिशय मांडणी उत्तम, आणि अभ्यासू. पण संपूर्ण समासाचे विवरण द्यावे. त्याबरोबर मनाचे श्र्लोक यावर पण विवरण द्यावे.

 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती