सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • अमृता फडवणीस यांनी भाऊ रंगारी गणपतीची आरती
  • समाजसेवा करण्याचा सल्ला केजरीवाल यांनी मानला नाही : आण्णा हजारे
 पूर्ण तपशील

साधनप्रतिष्ठा (भाग १)

डिजिटल पुणे    29-07-2024 11:11:18

साधनप्रतिष्ठा (भाग १)

सवे लाविता सवे पडे | सवे पडता वस्तु आतुडे | नित्यानित्यविचारे घडे | समाधान ||७/७/१५||

मनाला जशी सवय लावावी तशी लागते. नित्य काय, अनित्य काय हा विचार आणि स्वरूपचिंतन करण्याची सवय मनाला लावली तरच ती ब्रह्म वस्तू सापडेल. समाधान प्राप्त होईल.

मनाला कल्पना करण्याची सवय असते. त्याला आकार दिसतात. दृश्य विश्व कल्पनेची मर्यादा आहे. पण ही कल्पना ब्रह्मवस्तूला आकलन करू शकत नाही. कारण ब्रह्म निराकार, निर्विकल्प आहे. ब्रह्माची कल्पना करायला जाऊ तर ते गोंधळात पडेल. जे इंद्रियांना दिसत नाही, मनाला आकलन होत नाही त्याचा अनुभव येणार तरी कसा ? म्हणून ब्रह्म पाहायला गेलेले मन शून्य होऊन जाते. कारण त्याची कल्पना लटकी पडते. अज्ञान अंधार अनुभवाला येतो. म्हणून जणू काय ब्रह्म काळे आहे की काय असे वाटते. अर्थात ब्रह्माला विशिष्ट रंग, रूप नाही. ते भासाहून निराळे, अदृश्य, गुणातीत, अव्यक्त, अचिंत्य, निर्गुण आहे. ज्याला कशाचा आधार नाही, वर्णन करताना शब्द हार खातात. त्यामुळे मनाला त्याची कल्पना करायला फार श्रम पडतात.

अशा अचिंत्याला चिंतू जाता, निर्विकल्पाला कल्पू जाता, अद्वैत ब्रह्माचे ध्यान करू गेल्यास ज्ञाता आणि ज्ञेय इ. द्वैताचा जोर उठतो. आणि ध्यान, अनुसंधान सोडले तर त्याचे अस्तित्व नक्की आहे का ? असे त्याविषयी संशय निर्माण होतात. द्वैताच्या गोंधळाचा प्रभाव किंवा संशयात अडकलेले मन, मनाला जशी सवय लावावी तशी ती लागते. म्हणून संशय न घेता सतत अनुसंधानात राहणे आणि नित्य-अनित्य विचार करणे ही सवय लावलेली बरी. हाच राजमार्ग आहे.

वस्तूचे चिंतन करायला गेले तर चिंतन करणारा मी आणि चिंतनाची वस्तू हे द्वैत राहते. म्हणून चिंतन करणे सोडून चालणार नाही. त्यामुळे प्रगती खुंटेल. विवेक सोडला तर संशय वाढेल. म्हणून तोही सोडून भागणार नाही. कारण त्या नित्य अनित्य विवेकामुळे मनाला दृश्य प्रपंचापासून बाजूस सारता येते. अर्थात अहंपणा गेल्याखेरीज द्वैत जाणार नाही. द्वैताच्या क्षेत्रातील कार्यकारण आणि दृष्टांत परब्रह्माला लागू होत नाही. त्याला जाणण्यासाठी स्वत:चा म्हणजे देहबुद्धीचा विसर पडावा लागतो. आणि त्यास जाणले तरी मी जाणले ही जाणीव तिथे नसते. आठवणे, विसरणे, जाणणे, नेणणें हे सर्व मनाचे व्यापार आहेत. त्यास वृत्ति म्हणतात.

ब्रह्माशी तदाकार झाल्यावर मन निर्वृत्त होते. मन म्हणून तिथे काही राहत नाही. त्याचे व्यापार थांबतात. मग आठवण कोणाची काढणार ? जाणणार कोणाला ? या निर्वृत्त स्थितीत मी ब्रह्माची भेट घ्यायला चाललोय, भेटताना मी ब्रह्माला भेटतोय हे दोन्ही भान नष्ट झालेले असते. मी ब्रह्म साधतोय अशा मी पणाने साधायाला गेले तर ते साधत नाही. आतबाहेर व्यापलेले आहे, निकटचा संबंध आहे म्हणून सोडून द्यावे म्हटले तरी ते सुटत नाही. वेगळेपणाने त्यास बघायला गेले तर ते दुरावते आणि तसे न बघितले जिकडे तिकडे त्याचाच प्रकाश दिसतो.

संशोधक, लेखक, कथाव्यास - श्री. दामोदर प्र. रामदासी, पुणे.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती