सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • अमृता फडवणीस यांनी भाऊ रंगारी गणपतीची आरती
  • समाजसेवा करण्याचा सल्ला केजरीवाल यांनी मानला नाही : आण्णा हजारे
 पूर्ण तपशील

श्रवण निरुपण (भाग २)

डिजिटल पुणे    26-08-2024 10:04:52

श्रवण निरुपण (भाग २)

श्रवणा ऐसे सार नाही | श्रवणे घडे सर्व काही | भवनदीचा प्रवाही | तरणोपाव श्रवणे ||७/८/१६||

श्रीसमर्थ सांगत आहेत की श्रवणासारखी सारभूत गोष्ट नाही. सर्व काही श्रवणामुळे घडून येते. भवनदीच्या प्रवाही अडकलेल्या जीवाला श्रवणाशिवाय तरणोपाय नाही.

सर्व गोष्टीचा आरंभ हा श्रवणापासूनच होतो. भक्तीचा आरंभ श्रवणाने होतो. प्रवृत्ती म्हणजे प्रपंच आणि निवृत्ती म्हणजे परमार्थ या दोन्हीमध्ये यश प्राप्त करण्यासाठी श्रवण महत्वाचे आहे. जे कधीच ऐकले नाही त्याबाबत मनात अनेक शंका असतात. म्हणून श्रवणाची बरोबरी कशाची करता येणार नाही. सूर्य उगवला नाही तर जसा सगळीकडे अंधार पसरतो तसे श्रवण घडले नाही तर अज्ञानाचा अंधार आयुष्यात पसरेल. नवविधा भक्ति, चार मुक्ति, सहजस्थिती याविषयी श्रवण केल्यानेच कळून येते. षड कर्म म्हणजे अध्ययन, अध्यापन, यजन, याजन, दान व प्रतिग्रह शिवाय पुरश्चरण, विधियुक्त उपासना हे सर्व श्रवणाने उमगते. अनेक प्रकारची दाने, तपे, साधने, योग, तीर्थाटने, अनेक विद्या, शरीराचे ज्ञान, अनेक तत्वांचे ज्ञान, अनेक कला आणि ब्रह्मज्ञान हे श्रवणाने कळते.

जसे सर्व प्रकारच्या वनस्पती एका पाण्याने वाढतात, सर्व प्राणी एका रसापासून उत्पन्न होतात, सर्व जीव एकाच पृथ्वीवर राहतात, सर्वांना एकच सूर्य प्रकाश देतो, सर्वांना एकच वायू जिवंत ठेवतो व हालचाल करवून घेतो, विशाल पोकळी ज्याला आकाश म्हटले जाते ती सर्व जीवांना एकच ठिकाण आहे, सर्व जीवांना परब्रह्म हे एकच राहण्याचे ठिकाण आहे तसे सर्व जीवांना सारभूत असे एकच साधन आहे ते म्हणजे श्रवण. अर्थात श्रवणाशिवाय जीवाचे अस्तित्व टिकू शकत नाही. कारण ऐकल्यानेच अस्तित्व कसे टिकून ठेवायचे हे जीवाला कळते. अनेक देश, भाषा, विचार या पृथ्वीवर आहेत पण या सर्वांना श्रवणाशिवाय वेगळे साधन नाही.

श्रवणाने उपरती (स्वत:च्या चित्तवृत्तींना बाह्य विषयांनी प्रभावीत होऊ न देणे) येते, बद्ध मुमुक्षु (अहंकारापासून देहापर्यंतच्या अज्ञानामुळे कल्पिलेल्या सर्व बंधनापासून स्वत:च्या स्वरूपज्ञानाने मुक्त होण्याची तीव्र इच्छा ) होतात, जे मुमुक्षु असतात ते साधक (ज्याला उपासना करता करता स्वरूपस्थिती आली तो) बनून नेमाने साधना करतात. श्रवणाने साधक सिद्ध बनतात, श्रवणामुळे दुष्ट तत्काळ पुण्यशील होतात, तीर्थे-व्रतांचे पुण्य पुढे मिळेलही पण श्रवणाचे हे लगेच फळ मिळते. अनेक रोग-व्याधी उत्तम औषधाने बऱ्या होतात तसे श्रवणाने देहबुद्धि तत्काळ जाते. श्रवण महात्म्य एखाद्याला समजले तर त्याचा भाग्योदय होतो.

संत जे सांगतात त्याचे श्रवण नीट केल्यावर त्याचा अर्थ नीट समजून घेऊन (सर्व संशय फिटणे) त्यावर लक्ष देणे यास मनन असे म्हणतात. त्या अर्थावर मन एकाग्र झाले की निदिध्यासन घडते. आणि निदिध्यासन झाल्यामुळे साक्षात्कार घडतो. स्वरूपाविषयीचा संदेह हाच जन्माचे मूळ आहे. मी मुक्त आहे या भावनेने जेथे नित्य श्रवण-मनन असते तेथेच खरे समाधान असते. मुमुक्षु, साधक वा सिद्ध कोणीही असो जोपर्यंत स्वरूप अनुभव (निर्विकल्प समाधी) स्थिर होत नाही तोपर्यंत त्याने श्रवण करावे. अन्यथा त्यास मूढ समजावे. जिथे चित्तशुद्धी करणारे असे श्रवण घडत नाही तिथे थांबू नये. म्हणून नित्य श्रवण करावे, मनापासून साधना करावी आणि नित्येनेमाच्या बळावर संसार तरून जावा.

सेविलेच सेवावे अन्न | घेतलेचि घ्यावे जीवन | तैसे श्रवण मनन | केलेचि करावे ||७/८/४७||

एकदा जेवल्याने वा पाणी पिल्याने भागत नाही रोज जेवण व पाणी ग्रहण करावे लागेत तसे श्रवण व मनन नित्य करावे. अन्यथा आळसाने परामार्थ बुडतो.

कथाव्यास (श्रीमद्भगवद्गीता, श्रीराम, श्रीहनुमान कथा) - श्री. दामोदर प्र. रामदासी, पुणे.

 


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती