सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • संजय खन्ना देशाचे नवे सरन्यायाधीश होणार
  • भाजपाची पहिली यादी उद्या जाहीर होणार
 पूर्ण तपशील

देहांत निरुपण (भाग २)

डिजिटल पुणे    23-09-2024 10:05:32

देहांत निरुपण (भाग २) 

एवं न करिता भगवद्भजन | अंती नव्हीजे पावन | जरी आले बरे मरण | तरी भक्तीविण अधोगति ||७/१०/२३||

एखाद्याने आयुष्यभर भजन केले नाही तर त्याला अंतकाळी आध्यात्मिक दृष्ट्या सद्गती मिळत नाही. जरी त्याला सुखाचे मरण आले तरी भक्तिवीण अधोगतीच झाली असे समजावे.

जो विचार आपण सातत्याने करतो, जे भावतरंग आपल्या पेशीपर्यंत जातात त्याच प्रकारचे स्मरण त्या पेशीच्या स्मरणकोशात साठत जातात. अंतकाळी भगवंताचे स्मरण येऊन शांत मरण यावे असे वाटत असेल तर आयुष्यभर तसा अभ्यास करून त्याची स्मृती बनवावी लागेल. श्रीसमर्थ सांगत आहेत की आसक्तीमध्ये अडकून हवे तसे आयुष्य जगले तर अंतकाळ कसा साधणार ? जे पेरलेच नाही ते कसे उगवणार ? जसा पैसा आधी साठवला, पैशाचा तसा व्यवहार केला त्याला जसे पुढे जाऊन खूप पैसा मिळतो तशी ही गोष्ट आहे. दिल्यावाचून मिळणार नाही, पेरल्यावाचून उगवणार नाही, आधी सेवा करील तेव्हाच मालक मोबदला देईल. याचप्रमाणे जिवंत असताना ज्याने भगवद्भक्ती केलेली नसते त्याच्या अंतकाळी कल्याण होणार नाही. त्याला मेल्यावर मुक्ती मिळत नाही. जिवंतपणीच ज्याने आत्मकल्याण करून घेतले, जो सदेह मुक्त झाला, ज्याने देह असतानाच महामृत्युचा म्हणजे अज्ञान मुक्तीचा अनुभव घेतला, त्याचे शरीर भगवंताच्या कारणी लागले असे समजावे.

जो जिवंत असतानाच मुक्त झाला, मी सनातन आत्मा आहे असे ज्याला उमगले, ज्याने जन्ममृत्यूचा घोट आधीच घेतलेला आहे, त्याचे शरीर अंतकाळी रानात पडले, स्मशानी पडले, खितपत पडले किंवा कुत्र्या मांजराने खाल्ले तरी काही फरक पडत नाही, कारण ते आधीच धन्य झालेले असते. त्याची ती अवस्था बघून लोकांना मात्र वाईट वाटते. खरेतर त्यांना साधूची अवस्था समजणे अवघड असते. देहबुद्धी नाहीशी झाल्यामुळे साधू देहात असतानाही मेल्यासारखाच राहतो. देहादिक अशाश्वत, मलीन दृश्य पदार्थ त्याला स्पर्श करू शकत नाहीत. अशा साधूची भक्ती केली तर सामान्य माणसे पवित्र होऊन जातात.

हेचि साधकासी निरवणे | अद्वैत प्रांजळ निरुपणे | तुमचेहि समाधान बाणे | साधूच ऐसे ||७/१०/३४||

ज्याला आत्मज्ञान हवे त्याने सद्गुरूला शरण जावे, सत्संग करावा, आज्ञेप्रमाणे साधना करावी. विवेक करावा, अद्वैत विवेचन प्रतिपादन करावे, यामुळे साधूला प्राप्त झालेले खरे समाधान त्यालाही मिळेल. सद्गुरू भक्तीने त्यांना प्रसन्न करून घेतले तर त्वरीत लाभ होतो. कारण सद्गुरू शरण आलेल्याची काळजी वाहतात. एका सद्गुरूवाचून दुसरा दाता नाही. आई जशी तान्ह्या मुलाला सांभाळते, लहानाची मोठी करते तसे सद्गुरू शिष्याची काळजी वाहतात. सद्गुरूवाचून समाधान मिळवण्याचा अन्य मार्ग नाही. ज्याला हे पटत नसेल त्याने भगवान सदाशिवाने पार्वतीला सांगितलेली गुरुगीता बघावी.

खरे तर आतापर्यंत परमार्थाचे सर्व सार सांगून झाल्यामुळे समर्थ ग्रंथाचा शेवट करण्याची भाषा या समासाच्या शेवटी करतात. पण आपल्या भाग्याने ग्रंथ अजून त्यांनी संपवलेला नाही. पुढे ते म्हणतात की संस्कृत भाषेतला अद्वैत वेदांत मराठी भाषेत या ग्रंथात सांगितला म्हणून काही त्याला कमी समजू नये. माकडाला जशी नारळाची किंमत समजत नाही तशी मुर्खाला हे समजणार नाही. ज्याने त्याने आपल्या लायकीप्रमाणे या ग्रंथातून घ्यावे. भाषा कुठलीही असो परब्रह्म शब्दांच्या आवाक्याबाहेरचे आहे हेच खरे आहे.

कथाव्यास (श्रीमद्भगवद्गीता, श्रीराम, श्रीहनुमान कथा) - श्री. दामोदर प्र. रामदासी, पुणे.

 


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती