सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • संजय खन्ना देशाचे नवे सरन्यायाधीश होणार
  • भाजपाची पहिली यादी उद्या जाहीर होणार
 पूर्ण तपशील

देव दर्शन (भाग १)

डिजिटल पुणे    30-09-2024 09:58:47

देव दर्शन (भाग १)
 
देव कोणासी म्हणावे | कैसें त्यास जाणावे | तेचि बोलणे स्वभावे | बोलिजेल ||८/१/१६||
 
लहान मुलाला देखील समजेल अशा बाळबोध भाषेत समर्थ आपल्या शिष्याबरोबर संवाद करत आहेत. आठव्या दशकाच्या ज्ञान दशकात ज्याला मायोद्भव असेही नाव आहे त्यात शुद्ध आत्मज्ञान सांगितले आहे. देव दर्शन या पहिल्या समासात समर्थ म्हणतात की देव भेटावा म्हणून या जगात अनेक शास्त्र आहेत. सर्व शास्त्राचा अभ्यास एका जन्मात करणे शक्य नाही. शिवाय त्या अनेक शास्त्र विचारात मन गोंधळून जाते. जगात अनेक तीर्थे आहेत, त्यांच्या यात्रेने पुण्यसंचय देखील होतो पण सर्व तीर्थांची यात्रा एकाच जन्मात करणे शक्य नाही. देव दर्शनासाठी माणूस अनेक तपे, दानधर्म, अनेक योग करत राहतो. अशाप्रकारे भरपूर श्रम केल्यावर मग देव दिसतो असा सर्व सामान्य माणसांचा समज असतो.
 
देवाची भेट व्हावी म्हणून अनेक मत, अनेक पंथ आहेत पण भगवंताचे खरे स्वरूप नेमके कसे आहे हे समजणे महत्वाचे आहे. मोजता येणार नाहीत इतके देव या जगात आहेत पण खरा जो एकच देव आहे तो काही सापडत नाही. अनेक उपासना पद्धती जगात आहेत पण ज्या उपासनेने फळ मिळते ती उपासना माणूस करत राहतो. अनेक शास्त्रे आहेत आणि त्यांच्यात मतभेदही आहेत. हजारो लोकात एखादाच खरा देव शोधून काढण्यासाठी विवेकयुक्त प्रयत्न करतो. तरी खऱ्या देवाच्या स्वरूपाचे आकलन त्यालाही होत नाही. अहंकारात अडकलेल्या माणसाला देव सापडत नाहीत. मग नेमक्या कुठल्या उपायाने देव सापडेल याचे उत्तर समर्थ देत आहेत.
 
ज्याच्या सत्तेने हे चराचर रचले गेले, विश्वातील सर्व घडामोडी होत आहेत तो खरा देव आहे. त्याला कायमचा सर्वकर्ता म्हणून ज्ञानी ओळखतात. ज्याने मेघमाला निर्मिल्या, चांदण्यात अमृत घातले, रविमंडळात तेज ओतले, सागराला मर्यादा घालून दिली, शेषाच्या मस्तकावर पृथ्वी स्थिर केली, आकाशात अनंत तारका बसवल्या, चार प्रकारचे (अंडज, जारज, स्वेदज, उद्भिज) जीव, चार प्रकारची (परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी) वाणी, चौराशी लक्ष योनी, स्वर्ग-मृत्यू-पाताळ हे त्रिलोक निर्मिले, ब्रह्मा-विष्णू-महेश हे ज्याचे अवतार आहेत तोच खरा देव आहे. देव्हाऱ्यात असलेली देवाची मूर्ती वा जागोजागी असलेले देव म्हणजे काही खरा देव नाही. ती मूर्ती काही सर्व जीव निर्माण वा ब्रह्मांड उत्पन्न करू शकत नाही. जो या सर्वाचा कर्ता आहे तोच खरा देव आहे. तो कर्ता आहे म्हणून त्याचे हातपाय दिसत नाहीत, त्याला ठराविक आकार नाही तरीही त्याने हे सर्व निर्माण केले हीच त्याची कलापूर्ण निर्मिती आहे जी ब्रह्मादी देवांना देखील आकलन होत नाही.
 
विश्वाची निर्माण कथा आता श्रीसमर्थ सांगत आहेत. आधी सगळीकडे पोकळी होती जिला आपण शून्यमय आकाश म्हणतो. तिथे आधी वायूचा जन्म झाला. वायूपासून अग्नी निर्माण झाला, अग्नीपासून पाणी उत्पन्न झाले, पाण्यापासून पृथ्वी झाली. जी आधारावाचून त्या आकाशात आहे. आता त्या पृथ्वीवर अनेक दगड आहेत. त्या दगडाला देव म्हणून माणूस पुजतो या अज्ञानाला काय म्हणावे ? ज्या देवाने ही सृष्टी निर्मिली तो या सृष्टीच्या आधीही होता. जसे कुंभार घडे बनवतो. म्हणजे त्या घड्याआधी तो होताच. तो कुंभार काही तो घडा बनत नाही. तो घड्यापासून वेगळाच राहतो. किंवा मातीचे शिपाई तयार केले पण ते सैन्य बनवणारा कारागीर वेगळाच राहतो तसे पाषाण म्हणजे काही देव नव्हे. खरा देव वेगळाच राहतो.
 
कथाव्यास (श्रीमद्भगवद्गीता, श्रीराम, श्रीहनुमान कथा) - श्री. दामोदर प्र. रामदासी, पुणे.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती