सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • संजय खन्ना देशाचे नवे सरन्यायाधीश होणार
  • भाजपाची पहिली यादी उद्या जाहीर होणार
 पूर्ण तपशील

सूक्ष्म आशंका (भाग १)

डिजिटल पुणे    14-10-2024 10:39:32

सूक्ष्म आशंका (भाग १)

आदि येक परब्रह्म | नित्यमुक्त अक्रिय परम | तेथे अव्याकृत सूक्ष्म | जाली मूळमाया ||८.२/३||

नित्यमुक्त, निष्क्रिय, सर्वश्रेष्ठ असे मूळ एक परब्रह्म होते त्याच्या ठिकाणी निर्विकार, अत्यंत सूक्ष्म अशी मूळमाया उत्पन्न झाली.

मूळ अविकारी ब्रह्मापासून विकारी नाशवंत दृश्य विश्व निर्माण झाले असे म्हणता येत नाही. तर्काला ते पटत नाही. अद्वैत वेदांत हा विषय समजावून सांगतो. विश्वाचे कर्तेपण ब्रह्मावर लादले तर ते निष्क्रिय आणि निर्गुण राहत नाही. त्याच्या इच्छेने विश्व झाले नाही असे म्हणावे तर ते निरपेक्ष व कल्पनारहित राहत नाही. विश्व झाले असे म्हणावे गुरु शिष्य, दासबोध कशालाच स्थान उरत नाही. या समासात सगुण-निर्गुण अशा तर्काच्या अनेक अडचणी कशा उभ्या राहतात हे समर्थ सांगत आहेत.

निर्गुण ब्रह्मात हे विश्व कसे निर्माण झाले याचे उत्तर देताना समर्थ म्हणतात की ब्रह्म सनातन आहे त्याच्या ठिकाणी विवर्तरूप माया उत्पन्न झाली. ही माया खरी नाही तरीही खरी आहे अशी भासते. समजा कमी प्रकाशात खोलीत दोरी पडलेली असताना एखाद्याला ती साप आहे असे भासू शकते. याला विवर्त असे म्हणतात. मी आत्मा आहे हे विसरून जीवाला मी देह आहे अशी भावना होते यास विवर्त असे म्हणतात. हे अज्ञान, अविद्येमुळे घडते. या देहबुद्धीमुळे दृश्य खरे वाटते आणि स्वरूपाचा अनुभव येत नाही. आत्मस्वरूप सगळीकडे भरलेले असतानाही ते झाकले जाऊन दृश्य व अशाश्वत विश्व दिसू लागते. हे मायेमुळे घडते.

मुळात सर्वांच्या आधी एकच परब्रह्म आहे. ते नित्यमुक्त, कधीही बदल न होणारे, निर्विकारी असे आहे त्यात अत्यंत सूक्ष्म माया उत्पन्न होते. तिच्यात बीज रूपाने जीव वास करतो. इथे शंका उत्पन्न होते की अशा निराकार, निष्क्रिय, निर्विकार ब्रह्मात साकार, सक्रीय, सविकार माया उत्पन्न झालीच कशी ? ब्रह्माच्या संकल्पाने विश्व निर्माण झाले असे म्हणावे तर ब्रह्म अखंड, निर्गुण आहे त्याच्यात इच्छा कशी असणार ? ते संकल्प कसे करू शकते ? ते सगुण मानले तरच ते संकल्प करते असे म्हणता येईल. ब्रह्म निर्गुण आहे असे म्हटले जाते म्हणजेच त्याच्यात सगुणता नाही. तरीही ही सगुणता कशी आली ? निर्गुण ब्रह्म सगुण झाले असे म्हणणे मूर्खपणाचे आहे.

कोणी म्हणते – १.देव निराकार आहे, सगळे करून अकर्ता आहे. त्याची लीला विलक्षण असून सामान्य जीवाला कळणे शक्य नाही. २.त्या परमात्म्याचा महिमा कोणाला कळणार ? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. म्हणून मग सामान्य जीव देवाचा महिमा सांगत सुटतात. त्यांना देवाचे खरे स्वरूप समजलेले नसते. ते आग्रहाने निर्गुण ब्रह्म अकर्ता आहे असे म्हणतात. मूळ ब्रह्मात अमुक एक करावे अशी उर्मीच नसते तेथे तो करून अकर्ता असे कसे म्हणावे ? ब्रह्म करून अकर्ता आहे ही गोष्ट खोटी आहे. म्हणजे देवाच्या इच्छेने हे विश्व झाले हे म्हणणे खरे नाही.

कथाव्यास (श्रीमद्भागवत्, श्रीरामकथा) - श्री. दामोदर प्र. रामदासी, पुणे.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती