सूक्ष्म आशंका (भाग ५)
अविद्यागुणे बोलिले जीव | मायागुणे बोलिजे शिव | मूळमायागुणे देव | बोलिजेतो ||८/३/१८||
अज्ञान, अविद्येत सापडलेल्या परमात्म्याला जीव असे म्हणतात. विद्या आणि अविद्या युक्त मायेच्या सहवासात त्याला शिव म्हणतात. जो विश्वात राहतो. आणि केवळ ज्ञानमय व शक्तिमय चैतन्याला देव म्हणजेच परमात्मा म्हणतात.
महत्वाचे मुद्दे :
१) त्या परब्रह्माचे केवळ ज्ञानमय अंग मूळपुरुष आहे आणि
२) शक्तिमय अंग मूळमाया आहे. विश्वात ज्या अनंत शक्ति आहेत त्याचे कारण मूळ माया आहे.
३) मूळमाया आणि मूळपुरुष दोन्ही एकच आहेत.
४) अनंत नावे असणाऱ्या नियंत्यास जगदीश म्हणतात.
५) सगळीकडे मायेचा विस्तार असला तरी ती खरी नाही आणि माया शब्दात मांडता येत नाही.
६) मूळ चैतन्य अनाम व अरूप आहे. मायेने त्यास अनेक रूपे व नावे दिलेली आहेत.
निराकार ब्रह्मामध्ये मुळमाया कशी उत्पन्न झाली या प्रश्नाचे निराकरण करताना समर्थ म्हणतात – हे विश्व नजरबंदीचा खेळ आहे. जादुगार अनेक वस्तू निर्माण करतो पण त्या मिथ्या असतात. या दृश्य विश्वाचेही असेच आहे. हा विश्वाचा खेळ कसा खेळला गेला हे बघू.
१) निश्चल आकाशात चंचल वायू उत्पन्न झाला. तसे निश्चल ब्रह्मात मूळ माया उत्पन्न झाली. वायुमुळे आकाश भंगले असे होत नाही तसे मायेमुळे निर्गुण ब्रह्मात काहीही बदल होत नाही.
२) वायू आकाशासारखा पुरातन नाही तशी मायाही ब्रह्मासारखी सनातन नाही.
३) वायू जसा आकाशात लीन होतो तशी मायाही ब्रह्मात लीन होऊन जाते.
४) म्हणून अशी उत्पन्न होणारी आणि लीन होणारी माया काही सत्य नाही.
५) वायुला जसे निश्चित रूप नसते तो वाहताना जाणवतो. तसे मूळ माया कर्तुत्वाने आहे असे भासते. पण तिचे अमुक रूप आहे असे नाही.
६) मायेला पाहायचे तर दृश्य विश्वाच्या रूपाने दिसते.
७) जसे वायूच्या वाहण्याने पदार्थ आकाशात उडतात तसे मायेच्या संयोगाने निर्गुण ब्रह्मात दृश्य दिसू लागते.
८) ब्रह्म निर्गुण, निराकार, अदृश्य आहे त्यामध्ये उत्पन्न झालेली मूळमाया त्याच सद्वस्तुला दृश्य, सगुण, साकार पदार्थांच्या रूपांनी दाखवते.
९) आकाश स्वच्छ असते पण त्यात एकाकी ढग दिसू लागतात तसे मूळ परब्रह्म एकजिनसी निर्मल असते. त्यात मायेमुळे दृश्य जगाचा देखावा दिसू लागतो. जसा ढगांमुळे निर्मळ, निश्चल आकाशात काही बदल होत नाही तसा माया निर्मित दृश्य जगामुळे ब्रह्म जरी सगुण साकार झाल्यासारखे वाटले तरी ते निर्गुणच असते.
कथाव्यास, सद्गुरुचरणरज श्री. दामोदर रामदासी, पुणे.
(रामदासी मठ परंपरा, नवगणराजुरी, जि. बीड)