सूक्ष्म आशंका (भाग ६)
नभ माथां लागले दिसे | परी ते जैसे तैसे असे | तैसे जाणावे विश्वासे | निर्गुण ब्रह्म ||८/३/४०||
जसे क्षितिजापाशी आकाश डोक्याला टेकलेले वाटते. तरीही ते जसे आहे तसेच असते तसे या दृश्य विश्वात ब्रह्म सगुण झाल्यासारखे वाटते. पण त्याची निर्गुणता जशी आहे तशी असते.ब्रह्म स्वरूप जसेच्या तसे असते हे समजावून सांगताना समर्थ अनेक दृष्टांत देत आहेत की १) आकाशाचा निळा रंग आपण बघतो अर्थात हाही दृष्टीचा भ्रम आहे. किंवा ते एखाद्या झाकाणासारखे पालथे, चारही बाजूने बंदिस्त वाटते, जणू त्याने सगळे विश्व कोंडून ठेवलेले आहे. अर्थात हे खरे नाही ते चारही बाजूंनी मोकळे आहे. २) डोंगराचा रंगही लांबून निळा दिसतो जवळून पाहिले तर तसा नसतो. याचप्रमाणे हे दृश्य विश्व परब्रह्माला चिकटलेले दिसते पण निर्गुण ब्रह्म त्यापासून अलिप्त, मोकळे आहे. ३) रथ धावताना रथातल्या व्यक्तीला पृथ्वी धावते आहे असे वाटते पण वास्तविकत: ती स्थिर असते. ४) रात्री आकाशात ढग धावत असतात पण चंद्र धावत आहे असा भास होतो. याप्रमाणे सगुण विश्व पाहून ब्रह्म सगुण झाल्यासारखे वाटते. ५) आकाशात आगीच्या ज्वाला उठताना आकाश हलल्यासारखे दिसते तोही भ्रमच आहे. ६) नजरबंदीत जादुगार तात्पुरत्या अनेक वस्तू उत्पन्न करतो तशी माया स्वत: चंचल असून अनेक दृश्य पदार्थ निर्माण करते. पण ते अशाश्वत, तात्पुरते असतात. दृश्य पदार्थ क्षणभंगुर आहेत पण ब्रह्म मात्र शाश्वत आहे.
मुलत: ब्रह्म अखंड, अवयवरहित असते पण मायेमुळे खंड पडल्याचा आभास होतो. मुळात जे नाही ते आहे असा आभास निर्माण करणे हेच मायेचे काम आहे. माया मूळ ब्रह्मस्वरूपात नाही पण ती खरी आहे असा भ्रम उत्पन्न होतो. ढग येतात जातात पण आकाशाला फरक पडत नाही तसे माया मूळ स्वरूपात दिसते आणि नष्ट होते. ब्रह्माला त्याचा फरक पडत नाही.
ब्रह्माच्या ठिकाणी अहं अशी जी स्फूर्ती येते तीच माया होय. पण तिचा निर्गुण ब्रह्म स्वरूपाशी संबंध नसतो. आकाशाकडे चंचल डोळ्याने बघितल्यावर ढगाचा आकार बघून सैन्य आहे असे दिसते. पण हे तर ढग आहेत हे समजल्यावर तो भ्रम मिटतो. असा मायेचा खेळ मिथ्या असतो. अहं जी स्फूर्ती आहे ते स्फुरण वायूमय असते. तोच ओंकार आहे. त्यात पंचमहाभूते बीजस्वरूपाने असतात. ज्ञानी लोकांना हे बरोबर समजते. निश्चल ब्रह्मात जी हालचाल होते तीच मूळमाया होय. तिची ही हालचाल शक्तिरूप आहे. शक्ति हे वायूचे लक्षण आहे. वायूतील शक्तिमुळे सूक्ष्म तत्त्वे स्थूल रूप घेतात. पंचमहाभूते जी मूळ मायेमध्ये बीजरूपाने होती, अव्यक्त होती ती विश्वाची रचना करण्यासाठी व्यक्त होतात.
आकाश आणि वायू ही तत्त्वे मूळ मायेत होती. कसे ते बघा. १) शब्द हा आकाशाचा गुण आहे. म्हणून अहं हे स्फुरण ओंकार नाद स्वरूपात प्रकट झाले. २) चलन हा वायूचा गुण आहे. म्हणून मी एक आहे अनेक व्हावे ही इच्छा स्वरूपाच्या ठिकाणी झाली. ३) बल हा तेजाचा (अग्नी) गुण आहे. म्हणून मी अनेक व्हावे या इच्छेला सामर्थ्य प्राप्त झाले. ४) हे सामर्थ्य मृदू आहे. जीवाला टोचत नाही. मृदुता हा जळाचा गुण आहे. ५) हा खेळ जड आणि द्रव्याच्या सहाय्याने चालतो, जडता हा पृथ्वीचा गुण आहे. अशा पद्धतीने मूळ मायेतील ही सारी तत्त्वे व्यक्त झाली. आणि विश्व आकाराला आले. ही सर्व तत्त्वे एकमेकात मिसळलेली असतात. यांच्या माध्यमातून माया स्वर्ग, मृत्यू व पाताळ अशी विश्वभर पसरलेली आहे. आरंभी व शेवटी परमात्मा आहे आणि मध्ये मायेचा हा खेळ चाललेला आहे.
कथाव्यास, सद्गुरुचरणरज श्री. दामोदर रामदासी, पुणे.
(रामदासी मठ परंपरा, नवगणराजुरी, जि. बीड)