मागील लेखापासून पुढे
भूते गुण मेळविजे | त्यासी अष्टधा बोलिजे | पंचभूतिक जाणिजे | अष्टधा प्रकृति ||८/४/४२||
आधी मागील लेखातील मुद्दा पूर्ण करू.
अग्नी तत्त्व किंवा तेजाने भास होतो. प्रत्यक्ष काही तरी दिसते. कठीणपणा असल्याखेरीज भास नाही. हा कठीणपणा पृथ्वीचा अंश आहे. हा भास मऊ असतो आणि मऊपणा हा पाण्याचा गुण आहे. तेजामध्ये तेज असतेच. तेजातील चंचलता वायूचा अंश आहे. तर स्तब्धता आकाशाचा अंश आहे. अशा प्रकारे तेजात इतर भूते आढळतात.
पाणी मऊ जरी असले तरी त्यातही काठिण्य असतेच. हाच पाण्यातील पृथ्वीचा अंश आहे. पाण्यातील मृदुता हा त्याचा स्वत:चा गुण आहे. तेजामुळे पाण्यातील मऊपणा अनुभवाला येतो. या मऊपणातील स्तब्धता वायूचा गुण आहे. सर्वांना व्यापून राहणे हा आकाशाचा गुण आहे. तो पाण्यातही असतोच. अशा प्रकारे इतर भूते पाण्यात आढळतात.
पृथ्वीबद्दल सांगायचे तर काठीण्य हा तिचा स्वत:चा गुण आहे. त्या काठीण्यातही काही मृदुता असतेच तो पाण्याचा गुण आहे. कठीणपणाचा जो प्रत्यक्ष अनुभव येतो तो तेजाचा अंश आहे. त्या कठीणपणात प्रतिकाराचा गुण आहे तो वायूचा अंश आहे. आकाश सर्वांनाच व्यापून राहते. माणसाला जो दृश्याचा अनुभव येतो तो आकाशातच येतो. हे आकाश तोडू शकत नाही, हलवू शकत नाही. अशाप्रकारे पृथ्वीत इतर पंच भूते सामावलेली आहेत.
आता आपल्या मूळ विषयाकडे येऊ. पंच भूते एकमेकात मिसळलेली आहेत. हा सगळा वायूचा म्हणजे शक्तिचा म्हणजे मूळ मायेचा खेळ आहे. या शक्तिला शोधायला जावे तर सूक्ष्म पंच भूते आढळतात. या सूक्ष्म मायेपासून होणारी गुणक्षोभिणी माया आणि तिच्यातून निर्माण होणारे सगळे पंच भूतात्मक असतात. पंच भूते आणि तीन गुण मिळून आठ प्रकार होतात. म्हणू त्यास अष्टधा प्रकृती असे म्हणतात.
मूळमायेतील सूक्ष्म पंच भूते तीन गुणामुळे आकाराला येतात. त्यांना दृश्य स्वरूप आल्यावर सगळी तत्त्वे निर्माण होतात. ही तत्त्व रचना पिंड आणि ब्रह्मांडात आपल्याला दिसून येतेच. आतापर्यंत सांगितलेला विषय हा विश्वरचना होण्यापूर्वीचा आहे. मूळ मायेचा आहे. ही मूळमाया होती तेव्हा सात आवरण (पंचमहाभूते, अहंकार व महत् तत्त्व) असणारे हे विराट ब्रह्मांड झाले नव्हते. माया व अविद्या यांचा खेळ नव्हता. ब्रह्मा, विष्णू, महेश या देवताही नव्हत्या. पृथ्वी, मेरू पर्वत, सात समुद्र शिवाय अनेक लोक, ग्रह-तारे, चौदा भुवने, सप्त द्वीपे देखील नव्हते. एकवीस स्वर्ग, तेहेतीस कोटी देव, दिक्पाल व दिशा, बारा आदित्य, अकरा रुद्र, सात ऋषी, नऊ नाग, चौदा मनु असे काहीच नव्हते. या सर्वाचे मूळ मूळमाया आहे. पुढील समासात पंचभूते दृश्य रूप धारण करतात याचे विवेचन बघू. जसे महाद्वार ओलांडल्यावर देव दर्शन होते तसे दृश्य म्हणजे पंच भूतात्मक हे जग ओलांडले की ब्रह्म दर्शन होते. त्यासाठी साधना करावी. वृत्तीवर जमलेले दृश्याचे दाट आवरण सैल होणे हा विवेक (आत्म आणि अनात्म) आहे. तर ते बाजूला होणे हे वैराग्य आहे.
कथाव्यास, सद्गुरुचरणरज श्री. दामोदर रामदासी, पुणे.
(रामदासी मठ परंपरा, नवगणराजुरी, जि. बीड)