आत्मदर्शन (भाग १)
आत्मनिवेदनाचे लक्षण | आधी पाहावे मी कोण | मग परमात्मा निर्गुण | तो ओळखावा ||८/८/१३||
आत्मनिवेदनाचे (संपूर्ण समर्पण) लक्षण काय आहे तर आधी मी कोण आहे याचा शोध घेणे होय. त्यानंतर निर्गुण परमात्मा जाणून घ्यावा.
तत्त्वमसि म्हणजे तूच तो परमात्मा आहे ! हे उपनिषदातील महावाक्यावर समर्थांनी मागील समासात भाष्य केले होते. जीवो ब्रह्मैव ना पर: | - जीव आणि ब्रह्म वेगळे नाहीत. हेच वेदांताचे सार आहे. वेदांतील सर्व महावाक्यातून हेच सांगण्याचा प्रयत्न पूर्वसुरींनी प्राचीन काळापासून केलेला आहे. हा परमात्मा ज्याला जन्म-मृत्यू नाही, कोठे येणे वा जाणे नाही, कसले बंधन वा मोक्षही नाही, जो निर्गुण-निराकार, अनंत-अपार, नित्य निरंतर, सर्वव्यापी, अनेकात एकपणाने राहणारा, तर्कातीत असा आहे, तो भक्तीने प्राप्त होतो. ही भक्ती नवविधा प्रकाराने केली जाते. त्यात अंतिम म्हणजे आत्मनिवेदन भक्ती ज्यात साधकाचे संपूर्ण समर्पण म्हणजे स्वत:ला देवास पूर्ण अर्पण करणारी अशी असते. त्यामुळे ती अत्यंत श्रेष्ठ आहे.
या भक्तीद्वारे काही स्वत:चे शीर अर्पण करणारे असेही असतात एवढी आत्यंतिक भावनाही इतिहासात घडलेली आपण ऐकलेले असेल. अर्थात एवढी टोकाची भूमिका का घेतली असावी असा प्रश्न पडतो. खरेतर यात सूक्ष्म अहंकार ज्याला अस्मिता म्हटले जाते त्याचे समर्पण अपेक्षित आहे. यात देव कोण, कसा ? देव आणि भक्त यांचा संबंध कसा ? याचा शोध करत गेले की आत्मनिवेदन आपोआप घडते. देह म्हणून जे आपण आपले अस्तित्व समजत होतो ते शाश्वत नसून परमात्म स्वरूप शाश्वत आहे हे भक्त अनुभवतो. देव आणि भक्त हे द्वैत मिटून केवल अद्वैत (अभेद) स्थितीत भक्त व देवाचे वेगळेपण उरत नाही. अशा प्रकारे भगवंतापासून जो विभक्त नाही तो भक्त. म्हणून त्यास कसलेच बंधन नसते. हे अद्वैतच आत्मनिवेदन आहे. याला सायुज्यमुक्ती असेही म्हणतात.
आत्मनिवेदनाचे अंती | जे का घडली अभेद भक्ति | तये नाव सायोज्यमुक्ति | सत्य जाणावी ||८/८/१९||
सद्गुरू शरण गेलेल्या साधकाला त्यांच्या कृपेने त्यांचा अद्वैत उपदेश हृदयात ठसतो. मी आत्मस्वरूप आहे हा अनुभव येतो. जशी नदी समुद्राला मिळाल्यावर वेगळी करता येत नाही, परीसस्पर्श झाल्यावर लोखंडाचे सोने होते आणि परत ते कधीच काळे होत नाही. तसे एकदा का भक्तभगवंताचे अद्वैत झाले की भक्ताला भगवंतापासून वेगळे करता येत नाही.
देवाला भक्त होऊन बघावे. या दर्शनाने भक्ताच्या अंगी भगवंताचे ऐश्वर्य तत्काळ येते. अर्थात यासाठी देहातीत अवस्था येणे आवश्यक आहे. मी देह आहे या देहबुद्धीने दु:खाशिवाय काही मिळत नाही. मग देहातीत होण्याची युक्ति काय ? समर्थ सांगतात की परब्रह्म देहातीत वस्तू आहे. आत्मबुद्धी प्राप्त झालेला विदेही होतो. अशाची स्तुती वेदही करतात. नुसत्या शास्त्र अध्ययनाने हे होणार नाही. मी देह आहे ही भावना नष्ट झाली पाहिजे. तेव्हाच विदेह होता येते, हे साधूंचे वचन आहे आणि त्याला खोटे मानू नये अन्यथा त्याचा दोष लागतो. मग संतांचे नेमके म्हणणे आहे तरी काय ? यावर समर्थ काय म्हणतात हे पुढील लेखात बघू.
कथाव्यास/प्रवचनकार/लेखक : श्री. दामोदर रामदासी पुणे. (रामदासी मठ परंपरा, नवगणराजुरी, जिल्हा बीड)