आत्मदर्शन (भाग २)
सोहं आत्मा स्वानंदघन | अजन्मा तो तूचि जाण | हेचि साधूचे वचन | सदृढ धरावे ||८/८/३३||
सो (तो आत्मा) अहं (मी - जीवात्मा) म्हणजे तो स्वानंदघन आत्मा मीच आहे, ज्याला जन्म नाही असा तूच आहेस हे साधूचे वचन मनात घट्ट धरावे.
तूच शाश्वत आत्मा आहेस हाच महावाक्याचा खरा अर्थ आहे. देहाच्या मृत्यूने मी अनंत ब्रह्म होईल असे काहींना वाटते तर काही म्हणतात की विश्वाचा प्रलय झाला की माया नाहीशी होईल आणि मग आम्हाला ब्रह्मप्राप्ति होईल ही दोन्ही विधाने अज्ञान मूलक आहेत. आत्मज्ञानाने होणारे समाधान अशा प्रकारचे नसते. सर्व सैन्य ठार झाल्यावर मग मी सिंहासनावर बसेन. हा मूर्ख विचार आहे. सैन्य असताना राज्य करण्यात शोभा आहे. तसे माया असतानाही ती नसल्यासारखी होणे, देह असून विदेह होणे यात समाधान आहे. एकदा का राजा झाला की मग सैन्य इ. काही करू शकत नाही तसे एकदा का आत्मज्ञान झाले की दृश्य जगाचे, देहाचे भान राहत नाही.
एकाने रस्त्यात झाडाची मुळी बघितली आणि त्याला ती साप वाटली, तो घाबरला. पण नीट पाहिल्यावर समजले की ही साप नाही. त्याचे भय देखील नाहीसे झाले. तसे अज्ञान असताना माया भयंकर वाटते. पण आत्मनात्म विवेक आला, आत्मज्ञान झाले की माया भ्रामक दिसते आणि भय नाहीसे होते. वाळवंटात एकाला जिकडे तिकडे पाणी दिसले. मग पलीकडे कसे जायचे ही चिंता लागली पण जवळ जाऊन बघितले तर ते मृगजळ आहे हे पटले. एकाला झोपेत भयंकर स्वप्न पडले आणि तो घाबरला. पण जाग येताच त्याला कळले की हे तर स्वप्न होते. आणि त्याची भीती नाहीशी झाली. अशा रीतीने मनुष्य त्याच्या कल्पनेमध्ये फसून घाबरा होतो. माया देखील आपल्या कल्पनेचाच खेळ आहे. आपण स्वानंदघन आत्मा आहोत हे एकदा का अनुभवले की आपण कल्पनेच्या पलीकडे आहोत याची खात्री पटते. निर्विकल्पाला माया दु:ख देऊ शकत नाही.
मरताना जी भावना राहील तशीच पुढे गती मिळते असे सर्व म्हणतात. हे जर खरे तर - मी तोच आत्मा आहे ! हाच विचार राहून जर देहबुद्धीचा अंत झाला तर स्व स्वरूपाची प्राप्ति आपोआप आहे. चार देह म्हणजे दृश्य प्रपंच याचा अंत म्हणजे माया आहे. जन्माच्या मुळाचे स्थान अविद्या आहे. माया, अविद्या यापासून अलिप्त असणारा जो आत्मा तो तूच आहेस. ज्याला हे पक्के समजले त्याला आत्मदर्शन घडतेच. गति, अधोगति, सद्गती, दुर्गती यापासून आत्मा निराळा राहतो. आत्मदर्शनात आत्मप्रचीति, गुरुप्रचीति, शास्त्र प्रचीति यांचा समन्वय आहे. जे शास्त्रात लिहिलेले आहे, सद्गुरूंना ज्याचा अनुभव आलेला आहे, तोच अनुभव ते शिष्याला देखील देऊ शकतात. या तीन प्रचीतींची ऐक्यता येथे असते.
सद्गुरू जेव्हा प्रचीतीचे ज्ञान शिष्याला देतात तेव्हा त्याच्या चारही देहाचा अंत होतो. आणि स्वरूपाचा निदिध्यास सुरु होतो. आणि तो आत्मस्वरूप होऊन जातो. सायुज्यमुक्तिचा अधिकारी होतो. हाच मोक्ष आहे. खोट्याचे खऱ्यावर झाकण आल्याने खरे हे लोपल्यासारखे होते पण सद्गुरू कृपेने हा भ्रम मिटतो आणि सत्य जे आधीच उपस्थित आहे त्याचे भान येते. हाच मोक्ष आहे. महत्वाचे आहे ते सद्गुरू वचनाचे श्रवण, त्याचे वारंवार मनन आणि शेवटी निदिध्यासाने त्याची प्रचीती.
कथाव्यास/प्रवचनकार/लेखक : श्री. दामोदर रामदासी पुणे. (रामदासी मठ परंपरा, नवगणराजुरी, जिल्हा बीड)