आत्मदर्शन (भाग ३)
जेथे आटती दोन्ही पक्ष | तेथे लक्ष ना अलक्ष | या नाव जाणिजे मोक्ष | नेमस्त आत्मा ||८/८/५८||
द्वैत मिटल्याने पूर्व पक्ष आणि उत्तर पक्ष म्हणजे आधी प्रश्न विचारणारा पक्ष मग त्याचे उत्तर देणारा दुसरा पक्ष असे दोन्ही स्वरूपात विलीन होऊन जातात. लक्ष म्हणजे मायेचा प्रांत आणि अलक्ष म्हणजे स्वरूपाचा प्रांत असे दोन्ही राहत नाहीत. केवळ आत्मा शिल्लक राहतो. या स्थितीलाच मोक्ष असे म्हणतात. ध्यान आणि धारणा दोन्ही थांबतात, कल्पना निर्विकल्प समाधीत विरून जाते, केवळ शुद्ध जाणीवमय सूक्ष्म ब्रह्म तेवढे शिल्लक राहते.
श्रीसमर्थ सांगत आहेत की या अवस्थेत प्रपंचाचे मृगजळ आटून जाते, मुळात खोटे असलेले बंधन तुटते, जो आधीचाच अजन्मा आत्मा आहे त्याची जन्ममरणाच्या चक्रातून सुटका होते. आधीचाच जो नि:संग आहे त्याची आसक्तीची व्याधी नष्ट होते, जो आधीचाच विदेह आहे त्याची देहबुद्धी म्हणजे मी देह आहे ही संकुचित भावना नाहीशी होते. त्याची प्रपंचाची उपाधी विवेकाने तुटते. मुळात भेद नसलेला असा तो त्याचा भेदाचा भास नाहीसा झाला. त्याचा स्वभाव असलेला एकांत त्याला परत मिळाला, अनंत असलेला असा तो त्याची लोपलेली अनंतपणाची जाणीव परत मिळाली.
त्याचे जागेपणाचे लोपलेले भान नीट जागे झाले, जागेपणास स्वरूपाची जाणीव करून दिली आणि मी आत्माच आहे या ज्ञानाने त्याला सावध केले. जो अमृत आहे त्याच्या मागे मृत्यू लागला होता पण अमरत्वाच्या भानाने ती कटकट आता मिटली, मोक्षाला राहयाला घर नव्हते आता ते मिळाले, जीव आणि ब्रह्म यांचा संयोग जो होताच आता तो कायम झाला, निर्गुण जे सगुण झाले होते ते परत निर्गुण झाले, सार्थकाचे देखील सर्वोच्च सार्थक घडून आले, किती दिवसांनी आपणच आपल्याला भेटलो.
द्वैताचा पडदा फाटून अद्वैत प्रगटले, अभेदाचा अनुभव येऊन भेद तोडला, पंचभूतांची झालेली बाधा ते मिथ्या आहेत या अनुभवाने आता नष्ट झाली. आत्मदर्शन झाल्याने जे साधन केले त्याचे फळ मिळाले, निश्चल ब्रह्मावर चंचल मायेची जी उपाधी आली होती ती नाहीशी झाली, अविद्येचा साठलेला मळ विवेकाने गेल्यामुळे निर्मळ स्थिती प्रगट झाली. जे जवळच होते पण सापडत नव्हते ते ज्याचे त्याला आता सापडले, अशा रीतीने आपणच आपल्याला पाहिल्याने जन्मदु:ख नाहीसे झाले आहे.
एका ब्राह्मणाला स्वप्न पडले की आपण हीन जातीत जन्माला आलेलो आहोत त्यामुळे तो घाबरला. पण जागे झाल्यावर त्याला आपण ब्राह्मणच असल्याचे स्वत:चे भान आले आणि तो भयमुक्त झाला याप्रमाणे जो देहबुद्धीतून जागा झाला त्याला आत्मबुद्धि प्राप्त झाल्याने तो भयापासून मुक्त होतो. आता मी आत्माच आहे हे ज्याला कळाले त्याची नेमकी लक्षणे काय आहेत ? हे पुढील समासात आपल्याला कळेल.
कथाव्यास/प्रवचनकार/लेखक : श्री. दामोदर रामदासी पुणे. (रामदासी मठ परंपरा, नवगणराजुरी, जिल्हा बीड)