आरती केल्यावर स्वतःभोवती गोल फिरण्याचे काय आहे महत्व ?
आपण सगळेच वेगवेगळ्या प्रसंगी देवाचे रूप पाहत, हातात टाळ घेत किंवा टाळ्या वाजवत देवाची मनोभावे आरती केली असेलच. पण आरतीचे नेमके महत्त्व काय ? आणि आरतीमध्ये स्वतः भोवती का फिरतात?
हिंदू धर्मात देवाची पूजा केल्या नंतर आरती केली जाते. स्कंद पुराणात आरतीचे महत्त्व सांगितले गेले आहे. प्रत्येक व्यक्तीला सगळेच धार्मिक विधी, मंत्र, येतातच असे नाही. त्यामुळे ज्या व्यक्तींना कोणत्याही प्रकारची धार्मिक विधी, मंत्र, श्लोक इ. माहीत नसेल त्यांनी केवळ देवाची आरती केली तरीही देवाची त्याच्यावर कृपादृष्टी राहते. इतर विधीनंतर ज्या प्रकारे देव प्रसन्न होतो तसाच केवळ आरती केल्यानेही देव पावतात आरतीला पुराणात आरात्रिक आणि नीराजन अशा दोन नावांनी संबोधले गेले आहे
आरती ही साधारण एखाद्या धार्मिक कार्यानंतर केली जाते. त्यामुळे पूजा किंवा कोणत्याही धार्मिक कार्यात काही त्रुटी झाली असेल, काही विधी राहिल्या असतील तर आरती मुळे त्या त्रुटी भरून देवाची आरती करणाऱ्या व्यक्तीला आपल्या पंच- प्राणांना संपूर्ण एकाग्रतेने आरतीच्या तालात सुरात स्वतःला समरस करावे लागते.आरती करताना आरतीच्या ताटात असणारा दिवा हा त्या व्यक्तीच्या आत्म्याचे प्रतीक असल्याचेही पुराणात नमूद केले आहे त्यामुळे आरती करताना तो दिवा अखंड तेवत राहणे आणि तो पंचमुखी असणेही महत्त्वाचे ठरते.
आरती करताना आपल्या मुखातून येणारा प्रत्येक शब्द ही देवाची स्तुती असते त्यामुळे ते शब्द अत्यंत भावगर्भतेने आपल्या मुखातून यायला हवे तरच आरतीचा लाभ आपल्याला मिळतो.आरती दरम्यान आपण सगळेच स्वतः भोवती गोल प्रदक्षिणा का घालतो?
याचे स्कंद पुराणात महत्त्व सांगितले गेले आहे. ते म्हणजे आपल्याला जीवन प्रदान करण्यासाठी रोज नवा दिवस दिसण्या साठी पुथ्वीचे खूप मोठे कार्य आहे. तिच्या अस्तित्वामुळे आपल्याला जीवन मिळाले आहे.त्यामुळे तिच्या प्रति कृतज्ञतापूर्वक भाव व्यक्त करण्या साठी स्वतः भोवती गोल फिरणे म्हणजे पृथ्वीला प्रदक्षिणा मारण्या सारखेच आहे.
आरती करताना आपल्याला हातातले आरतीचे ताट केवळ गोल फिरवायचे नाही तर ते फिरवताना ॐ अशी आकृती निर्माण होईल अशा पद्धतीने ताट फिरवायचे आहे. म्हणजेच देवाच्या चरणापाशी चार वेळा, देवाच्या छातीपाशी दोन वेळा आणि मुखाजवळ एक वेळा. अशा पद्धतीने ॐ ही आकृती निर्माण होते हे पुराणात नमूद केले आहे. आपण आरती करताना साधारण दिवा किंवा धूप इ. ने आरती करतो मात्र आरती ही चार प्रकारे केली जाते.
पहिली जल आरती
दुसरी दीप आरती
तिसरी पुष्प आरती
चौथी कर्पूर अगरबत्ती धुपाआरती
अशा वेगवेगळ्या प्रकारात आपण आरती करु शकतो.
पुराणात आरती करण्यासाठी शुभ अशा ५ वेळा सांगीतल्या आहेत.
१ पहिली आरती जी सूर्योदया पूर्वी आपण केली पाहिजे तिला मंगल आरती असे म्हणले जाते.
२ दुसरी आहे शृंगार आरती जी शक्यतो सूर्य डोक्यावर आल्यानंतर केली जाते.
३ तिसरी आरती ही दुपारी देवाला नैवेद्य दाखवताना केली जाते.
४ चौथी आहे संध्या आरती जी संध्याकाळी केली जाते.
५ पाचवी आहे शयन आरती जी रात्री देवाच्या निद्रेसाठी केली जाते.
रोज देवाची आरती केल्याचे अनेक फायदे ही आहेत.
देवाची आरती केल्याने आपल्या भोवतालचे वातावरण शुद्ध होते. आरतीमुळे देव जागृत होऊन त्यांचा आपल्या भोवती वावर असतो त्यामुळे आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते. आरतीच्या गायनाने वाद्यांच्या तालाने वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. आरती केल्याने व्यक्तीचे पाप नष्ट होऊन तो पवित्र होतो. त्याच्या मनातील राग, द्वेष कमी होऊन त्याच्या भावना शुद्ध होतात. आरती करताना वापरलेल्या कापूरमुळे भोवतालचे सूक्ष्म कीटक नष्ट होऊन वातावरण शुद्ध होते.श्वासाद्वारे ही हवा आपल्या शरीरात गेल्याने आपल्या रक्ताची शुद्धी होते आणि आपल्याला शांतता प्रदान होते.हे आहे आरतीचे महत्त्व आणि तिचे आपल्याला होणारे फायदे
संग्रहक – वे.श्री.ईश्वर स्वामी होळीमठ (ज्योतिष शास्त्री) सोलापुर.