सिद्धांची लक्षणे (भाग १)
स्वरूप होऊन राहिजे | त्या नाव सिद्ध बोलिजे | सिद्ध स्वरुपीच साजे | सिद्धपण ||८/९/४||
स्वस्वरूपाकार होऊन जो राहतो त्यास सिद्ध म्हणावे. स्वत:सिद्ध आत्मस्वरुपाशी तदाकार झालेल्या महापुरुषाला सिद्ध म्हणणे शोभून दिसते.अमृत प्यालेल्या व्यक्तीची अंगकांती लखलखीत दिसते तशी साक्षात्कारामुळे, शुद्ध आत्मज्ञानामुळे ज्याची अंतरस्थिती बदलेली आहे अशा संतांची कोणती लक्षणे दिसतात याचे वर्णन समर्थांनी सिद्ध लक्षण या समासात केलेले आहे. आत्मस्वरूप स्वत:सिद्ध असते. त्याच्याशी संत एकरूप झालेले असतात. ते तत्वत: समाधीमध्येच असतात. प्रगट झालेली सिद्ध लक्षणे ही देहाच्या स्थितीवरून ओळखायची नसतात तर कुठलाही संशय नसलेले साधन, स्वरुपानुसंधानात सतत असणे आणि आतबाहेर प्रगट झालेले शाश्वत समाधान या प्रमुख लक्षणावरून त्यांची स्थिती ओळखायची असते.
अंतरस्थिती स्वरुपमय झालेली असली तरी देहाचे व्यापार थांबत नाहीत. जसे स्वप्नात असताना सर्व गोष्टी खऱ्या वाटतात तरी त्या वस्तुत: खोट्याच असतात तसे देह मिथ्या आहे जरी कळाले तरी मिथ्यापणाने सर्व क्रिया संत करतात. देहाने लोकामध्ये वावरून सुद्धा असे साधू स्वरुपानुसंधानात सतत मग्न असतात. त्यांना प्रपंचाची चिंता मुळीच नसते. त्यांना स्वरूपाच्या निरूपणाची गोडी असते. निरुपण गोडी हे तर खरे साधकाचे लक्षण आहे तरी ते त्यांच्याही ठिकाणी असते. कारण ते साधक अवस्थेतून गेलेले असतात. म्हणून बाह्य जरी ते साधक वाटले तरी अंतरी स्वरुपाकार असतात्त.
त्यांचे साधन संदेह रहित असते. अंतर्बाह्य समाधान ओतप्रोत भरलेले असते. यांचा देह जरी हालचाल करत असला, बसून राहिला किंवा पळू लागला तरी यांची कधीही चंचल न होणारी अंतरीची निश्चल स्थिती स्वरूपाला चिकटली असल्यामुळे त्यापासून वेगळी होत नाही.
चित्त भगवंताकडे लागल्यामुळे वृत्तीरहित झाले की सिद्धावस्था प्राप्त होते. मग देहाची अवस्था कशीही असली तरी फरक पडत नाही. जसे कोणी पूर्व कर्माने राजा झाला तर त्याला राजाचे ऐश्वर्य प्राप्त होते तसे ज्याला स्वरूपाविषयी जिव्हाळा वाटू लागतो त्याच्या ठायी सिद्ध लक्षणे आपोआप बाणू लागतात. एरवी केवळ अभ्यासाने ती प्राप्त होत नाहीत.
निर्गुणाच्या ठिकाणी वृत्ती राहणे ही साधनेची पराकाष्ठा समजावी. संतांच्या संगतीने, निरुपणाने ही अवस्था येते. स्वरूपाशी तदाकार होण्याचा अभ्यास करत असताना या लक्षणांचाही अभ्यास करावा. स्वरूपाशी एकाकारता सुटली तर मोठे गोसावी किंवा साधूही भांबावून जातात.
कथाव्यास/प्रवचनकार/लेखक : श्री. दामोदर रामदासी पुणे. (रामदासी मठ परंपरा, नवगणराजुरी, जिल्हा बीड)