सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • पुण्यात अघोषित पाणीकपात,विविध भागातील पाणीपुरवठा विस्कळीत
 पूर्ण तपशील

सिद्धांची लक्षणे (भाग २)

डिजिटल पुणे    24-02-2025 10:29:56

सिद्धांची लक्षणे (भाग २)
 
आता असो हे बोलणे | ऐका साधूची लक्षणे | जेणे समाधान बाणे | साधकाअंगी ||८/९/२३||
 
आता आपण साधूची लक्षणे बघुयात ज्यामुळे साधकाच्या ठिकाणी समाधान बाणण्यास मदत होईल. पशुत्व व मनुष्यत्व दोन्हीच्या पल्याड साधूची चित्तस्थिती असते. अर्थात अंधाराशी न भांडता प्रकाशाकडे वाटचाल करावी तशी पशुत्व वा मनुष्यत्व याचा विचार न करता संत स्वरुपाकार राहण्याचा अभ्यास करतात. असा स्वरूपाशी एकाकार झालेला, निष्काम साधू असतो. मनातील एखादी गोष्ट हाताची निघून गेली तर क्रोध येतो पण हे स्व स्वरूप हा त्या सिद्धाचा कधीही कोणी हिरावून न घेऊ शकणारा अक्षय ठेवा आहे. म्हणून साधू अक्रोधी असतो. आत्मदर्शनामुळे मी सर्वत्र व्यापून आहे हा संतांचा अनुभव असतो, अर्थात त्यांचा अहंकार विश्वाकार झालेला असतो. मग ते कोणावर रागावणार ! म्हणून ते सर्वांबाबत क्रोधरहित असे प्रेममूर्ती असतात.
 
स्वानंदात तल्लीन असणाऱ्या संतांजवळ मद नसतो, त्यामुळे त्यांचे कोणाशी वाद होत नाहीत. स्वरूप विकाररहित असते. त्याच्याशी एकाकार झाल्याने साधूही निर्विकार असतात त्यामुळे ते कोणाचा तिरस्कार करत नाहीत, सगळीकडे मीच आहे हा अनुभव असल्याने ते कोणावर मत्सर करणार ? ब्रह्मस्वरूप साधूंकडे मदमत्सराचे वेडेपण नसते. दुसरा कोणी असेल तर त्याच्या समोर दंभ (दिखावा) करता येतो. पण त्यांच्यासाठी स्वयंभू स्वरूपाशी एकाकार झाल्याने, द्वैत न राहिल्याने त्यांच्यासाठी दुसरा म्हणून कोणी नसतो मग ते कोणासमोर दंभ करणार ? ज्याच्यासाठी दृश्य म्हणून काही राहिलेले नाही अशासाठी कसला आलाय प्रपंच ? म्हणून तो नि:प्रपंच असतो. अवघे ब्रह्मांड माझे घर आहे, असे साधू मानतात. पंचभूतांचा सगळा विस्तार मिथ्या आहे, खोटा आहे हे ओळखून आल्याने त्यांनी त्याचा त्वरीत त्याग केला असतो, म्हणून त्यांना लोभ नसतो. शुद्ध स्वरूपात त्याची वासना समरस होऊन गेलेली असते.
 
सर्व मीच आहे या अनुभवामुळे स्वार्थ गळून गेलेली असतो, म्हणून साधू शोकरहित असतात. ज्ञानाने चित्त हे वृत्तीशून्य म्हणजे निवृत्त झालेले असते, म्हणू आदी आणि अंती साधू शोकरहित असतात. उन्मनी अवस्था असल्याने साधूंचे मोहाने मन संमोहित होत नाहीत. ते मोहातीत झालेले असतात. परब्रह्म निर्भय असते त्याच्याशी अद्वैत झाल्यामुळे साधू निर्भय, निवांत असतात. जगात सगळ्या वस्तूंना अंत आहे पण अनंत ब्रह्माशी समरस झाल्यामुळे साधूची स्थिती अंत रहित असते. सत्य अमर आहे, त्याच्याशी स्वरूपाशी एकरूप झाल्यामुळे साधू भय रहित असतात. द्वंद्व-भेद न राहिल्याने देहबुद्धीचे दु:ख साधूंना नसते.
 
निर्गुणाचा अनुभव असल्याने साधुंची बुद्धि स्थिर असते. हे निर्गुण नेण्याची गोष्ट नसल्याने साधूंना खेद नसतो. दृश्य मिटलेले आहे, आपणच सर्वत्र भरलेलो आहोत हा अनुभव असल्याने त्यांनी स्वार्थ कशाचा करावा ? साधू एकटाच सर्वत्र व्याप्त असल्याने, दुसरा म्हणून कोणी नसल्याने अविवेकाने येणारा दु:खशोक तिथे कुठून असणार ? केवळ परमार्थाची आशा आहे, स्वार्थ तुटलेला आहे, तिथे नैराश्य (निर्वासनता) असणे ही साधूची ओळख असते. आकाशासारखा मृदुपणा साधुत असतो म्हणून त्यांचे वचन कठोर नसते. स्वरूपाशी संयोग झाल्याने साधू स्वरूपच झालेला असतो. यामुळे तो निरंत वीतरागी असतो. म्हणजे दृश्य प्रपंच त्यास आकर्षित करत नाही.
 
स्वरूपाशी एकरूप असल्याने साधुस देहाची चिंता नसते, स्वरूपी बुद्धी लागल्याने दृश्याची उपाधी तुटलेली असते, त्यांची आत्मबुधी अमर्याद किंवा निरुपाधिक असते. स्वरूपातच राहत असल्याने दृश्याचा थोडाही संसर्ग त्यास नकोसा झालेला असतो. म्हणून मानापमान म्हणून मनाचा व्यवहार त्यास नसतो. जिथे मनही पोहोचत नाही ते अलक्ष असते. तिथे साधू लक्ष लावून असतात. असा परम दक्ष साधू केवळ परमार्थाचे समर्थन करतो. स्वरूपी मल नसल्याने त्याच्याशी एकाकार झालेला साधू निर्मल असतो. स्वरूपी राहणे हाच स्वधर्म आहे. हा सर्व धर्मात श्रेष्ठ धर्म आहे. आणि हेच साधूच्या लक्षणाचे मुख्य वर्म आहे. साधूच्या संगतीत आपल्यालाही स्वरूपस्थिती सहजच प्रपात होते. अशी ही साधूची लक्षणे आहेत. निरंतर स्वरूपात बुद्धी राहिल्याने स्वरूपच प्राप्त होते. अवगुण नष्ट होतात. अर्थात ही लक्षणे सत्संगतीने, निरुपणाने अंगी बाणतात.
 
कथाव्यास/प्रवचनकार/लेखक : श्री. दामोदर रामदासी पुणे. (रामदासी मठ परंपरा, नवगणराजुरी, जिल्हा बीड)


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती