सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • पुण्यात अघोषित पाणीकपात,विविध भागातील पाणीपुरवठा विस्कळीत
 पूर्ण तपशील

शून्यत्व निरसन (भाग १)

डिजिटल पुणे    03-03-2025 10:14:25

शून्यत्व निरसन (भाग १)
 
जनाचे अनुभव पुसता | कळहो उठिला अवचिता | हा कथाकल्लोळ श्रोता | कौतुके ऐकावा ||८/१०/१||
 
लोकांचे अनुभव विचारायला गेले तर त्यांच्यात कलह उत्पन्न होईल इतके परस्पर विरोधी मत प्रवाह असतात. हा वैचारिक गोंधळ श्रोत्यांनी गंमतीने ऐकावा.एक म्हणतो की, संसार करत त्यातून पैलपार जावे. जीवावर देवाचे नियंत्रण असल्याने हा संसार काही आपला नाही. एक म्हणतो की, छे : असा संसार केल्याने लोभ अंगी जडतो. पोटासाठी कुटुंबाची सेवा करावी लागते. एक म्हणतो की, संसार सहज सुखाने करावा. सद्गतीसाठी काही दानपुण्य करावे. एक म्हणतो की संसार खोटा आहे, त्यामुळे वैराग्य घेऊन कुठेतरी देशांतराला निघून जावे. यामुळे स्वर्ग प्राप्त होईल. एक म्हणतो की, घर सोडून कुठे जावे ? व्यर्थ का हिंडावे ? आपला आश्रमधर्म सांभाळून घरीच राहावे.
 
एक म्हणतो की, कसला आलाय धर्म ? सगळीकडे अधर्म माजला आहे ! या संसारात भलीबुरी नाना कामे करावी लागतात. एक म्हणतो की, वासना चांगली असावी म्हणजे संसार सहज तरून जाता येतो. एक म्हणतो की, भाव हाच सर्वांना कारण आहे. भावानेच देव भेटतो. अन्यथा सर्व बाष्कळ गप्पा आहेत. एक म्हणतो की, आई वडलांना देव मानावे आणि निष्ठेने त्यांची पूजा करीत जावी. एक म्हणतो की, देवब्राह्मण पूजावे, त्यामुळे सर्वांचा मायबाप नारायण प्रसन्न होतो. एक म्हणतो की शास्त्र अभ्यास करावा. त्याच्यात देवाचा उपदेश असल्याने त्या प्रमाणे वागून परलोकाला जावे. एक म्हणतो की, अरे शास्त्र इतकी आहेत की त्याचा अभ्यास संपणारा नाही. त्याऐवजी साधूला शरण जावे. एक म्हणतो की, सोडा या बाष्कळ गोष्टी, मनात भूतदया असावी एवढे पुरे.
 
एक म्हणतो की आपल्या आचार धर्माने वागावे, अंतकाळी देवाचे नाम घ्यावे म्हणजे झाले. एक म्हणतो की, पुण्य असेल तरच अंती नाम आठवते. अन्यथा अंतकाळी माणूस भ्रमात पडतो. एक म्हणतो की, जिवंत असेपर्यंत सार्थक करून घ्यावे. एक म्हणतो की, तीर्थाटन करत फिरावे. एक म्हणतो की, असे तीर्थाटनाचे कष्ट घेऊन शेवटी पाणी आणि दगडच बघावे लागतात. त्या पाण्यात बुचकळ्या मारताना नाकातोंडात पाणी जाऊन जीव कासावीस होतो. एक म्हणतो की, या तीर्थाच्या दर्शनाने महापातकाचा विनाश होतो.
 
एक म्हणतो की, मन आवरल्याने ते तीर्थ बनते. एक म्हणतो की सतत कीर्तन करत राहावे. एक म्हणतो की, योग मार्ग श्रेष्ठ आहे. त्याला आधी साधावे आणि देहाला अमर करावे. एक म्हणतो की, हे तर काळाला फसवणे आहे. एक म्हणतो की, भक्तिमार्ग धरावा. एक म्हणतो की, ज्ञान मार्ग उत्तम आहे. एक म्हणतो की, साधना करावी. एक म्हणतो की, सदा मुक्त (स्वैर) असावे. एक म्हणतो की, अरे स्वैर वर्तनाच्या अनर्गळ बाता करणाऱ्या माणसा, पापाचा कंटाळा करावा. त्यावर एक म्हणतो की, आमचा हा मार्ग बंधन रहित असा आहे. एक म्हणतो की, निंदाद्वेष करू नये, दुष्टाची संगत सोडून द्यावी हेच विशेष वर्तन आहे. एक म्हणतो की, ज्याचे अन्न खावे त्याच्या समोरच मरून जावे म्हणजे लगेच मोक्ष मिळतो.
 
क्रमश: ...
 
कथाव्यास/प्रवचनकार/लेखक : श्री. दामोदर रामदासी पुणे. (रामदासी मठ परंपरा, नवगणराजुरी, जिल्हा बीड)


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती