शून्यत्व निरसन (भाग २)
मागील लेखापासून पुढे –
एक म्हणतो की, की या गोष्टी सोडा, आधी पोटाला भाकरी हवी, बाकीच्या गप्पा नंतर करा. एक म्हणतो की, पाऊस चांगला व्हायला हवा. मग सगळे काही छान होते. दुष्काळ न पडो म्हणजे बरे ! एक म्हणतो की, खूप तप करावे आणि सिद्धी प्राप्त कराव्यात म्हणजे काही कमी पडणार नाही. एक म्हणतो की, आधी इंद्रपद साधावे. एक म्हणतो की, आगम तंत्र अभ्यासून वेताळाला प्रसन्न करून घ्यावे. त्याच्या कृपेने स्वर्ग मिळवून तेथे देव म्हणून राहावे. एक म्हणतो की, अघोर मंत्राचा अभ्यास करून स्वतंत्र व्हावे ज्यायोगे श्रीहरी जिचा आश्रय आहे ती लक्ष्मी प्रसन्न होईल, सर्व धर्म तिच्याच भोवती गोळा झालेले आहेत. म्हणून इतर क्रियाकर्म करण्याची आवश्यकता नाही. एक म्हणतो की, लक्ष्मीच्या मदानेच सर्व कुकर्म घडतात.
एक म्हणतो की, मृत्युंजय मंत्र जपावा हाच एक प्रयत्न करावा. त्याच्या प्रभावाने सर्व संकल्प सिद्धीला जातात. एक म्हणतो की, बटुभैरव, झोटिंग यांच्या कृपेने वैभव मिळवावे. कोणी म्हणतो काळी कंकाळी, भद्रकाळी, उष्टी चांडाळी प्रसन्न करून घ्यावी. एक म्हणतो गणपती, एक म्हणतो भोळा शंकर, तर एक म्हणतो की भगवती लवकर पावते. एक म्हणतो की, मल्हारी लवकर भाग्यवान करतो. एका म्हणतो की व्यंकटेशाची भक्ति सर्वोत्तम आहे. एक म्हणते की पूर्व पुण्याईवर सर्व आहे. एक म्हणतो की, प्रयत्न करावा. एक म्हणतो की देवावर भार घालून स्वस्थ राहावे.
एक म्हणतो की, हा देव तर भल्या लोकांचा अंत पाहातो, यावर एक म्हणतो की, यात देवाचा काय दोष ? सज्जन लोकांना त्रास होत आहे हा तर या युगाचा धर्म आहे. परिस्थिती बघून कोणी आश्चर्यचकीत होतात तर कोणाला विस्मय वाटतो. एक तर कंटाळून जे होईल ते बघत राहावे असे म्हणतात. प्रापंचिक लोक अशी अनेक मते व्यक्त करत असतात. ती सर्व सांगणे कठीण आहे. पण त्यांच्या काही तऱ्हा आपण बघितल्या.
आता ज्ञानी लोकांची देखील अनेक मते आहेत ती देखील आपण बघू. ती सावधपणे ऐका. एक म्हणतात की चांगली भक्ति केली तर श्रीहरी सद्गती देतो. एक म्हणतात की कर्माने ब्रह्मप्राप्ति होते. एक म्हणतात की भोग काही सुटत नाही, जन्ममरण काही तुटत नाही, एक म्हणतात की या सर्व अज्ञानाच्या उर्मी आहेत. कोणी म्हणतात की सर्व ब्रह्म आहे, मग तिथे क्रियाकर्म गरजेचे नाही. एक म्हणतात की क्रियाकर्माबाबत हे बोलणे अधर्म आहे. एक म्हणतात की सर्व नाशिवंत आहे. दृश्य नष्ट झाल्यावर फक्त ब्रह्म उरते. तर एक म्हणतात की हे काही समाधानाचे स्वरूप नाही. सर्व ब्रह्म आहे असे म्हणणे आणि दृश्य नाहीसे झाल्यावर जे उरेल ते ब्रह्म आहे असे म्हणणे ही दोन विधाने पूर्व पक्षाचे भ्रम आहेत. म्हणून एक म्हणतात की ब्रह्म अनुभवाचे वर्म वेगळेच आहे.
क्रमश: ...
कथाव्यास/प्रवचनकार/लेखक : श्री. दामोदर रामदासी पुणे. (रामदासी मठ परंपरा, नवगणराजुरी, जिल्हा बीड)