सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • आपल्या आतिशी दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री
  • चंद्रकांत दादा यांच्या ताफ्यातील गाडीला मद्यधुंद कार चालकाने दिली धडक.,चंद्रकांत दादा सुखरूप
  • आज सकाळी दगडूशेठ गणपतीची अजित पवार यांचे हस्ते पूजा
  • अमृता फडवणीस यांनी भाऊ रंगारी गणपतीची आरती
 पूर्ण तपशील

ससून रुग्णालयातील आणखी एक घोटाळा उघडकीस;कर्मचाऱ्यांनी हडपले कोट्यवधी रुपये,२३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

डिजिटल पुणे    16-09-2024 11:44:37

पुणे : गेल्या वर्षभरापासून विविध गैरकृत्यांमुळे वादात अडकलेल्या ससून रुग्णालयात आता तेथील कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारची चार कोटी रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी संगनमत करून चार कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी २३ जणांवर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.ससून सर्वोपचार रुग्णालयातील आणखी एक घोटाळा उघडकीस आला आहे. ससूनच्या कर्मचाऱ्यांनीच चार कोटी १८ लाख ६२ हजार रुपयांचा अपहार केला. या प्रकरणी ससून रुग्णालयाचे अकाउंटंट अनिल माने आणि रोखपाल सुलक्षणा चाबुकस्वार यांच्यासह अन्य २३ सरकारी आणि खासगी कर्मचाऱ्यांविरुद्ध बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी गोरोबा आवटे यांनी या प्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार तत्कालीन लेखपाल अनिल माने (रा. हडपसर वय ५३), रोखपाल सुलक्षणा चाबुकस्वार (वय ४५, रा. क्विन्सगार्डन कॅम्प) यांच्यासह ससूनच्या आणि काही खासगी अशा २३ कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैद्यकीय शिक्षण विभागासह बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांची परवानगी नसताना प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने रुग्णालयातील १६ कर्मचारी आणि अन्य आठ खातेदारांच्या खात्यातून चार कोटी १८ लाख ६२ हजार ९४२ रुपयांचे वितरण स्वत:च्या व अन्य खातेदारांच्या खात्यामध्ये केल्याचे उघकीस आले आहे. 

प्राथमिक चौकशीनंतर पोलिसात तक्रार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक गैरव्यवहारामध्ये लेखपाल माने यांच्यासह रुग्णालयातील वरिष्ठ लिपिक, लिपिक, परिचारिका, तंत्रज्ञ यांच्यासह काही खासगी व्यक्तींचा सहभाग आहे. हा प्रकार ३१ जुलै २०२३ ते २४ जानेवारी २०२४ या कालावधीत घडला आहे. रुग्णालयाच्या आर्थिक नोंदीमध्ये गैरव्यवहार झाल्याचे ससून प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर ससून प्रशासन आणि वैद्यकीय शिक्षण विभागाने प्राथमिक चौकशी केली. या चौकशीमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे तात्काळ पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करून अहवाल सादर करण्याच्या सूचना प्रशासने दिल्या. त्यानुसार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती