मुंबई: नेत्रदान हे महान कार्य असून या माध्यमातून आपण आपल्या आयुष्यानंतर इतरांच्या माध्यमातून जगू शकतो. यासाठी नेत्रदान ही लोक चळवळ बनावी आणि सर्वांनी नेत्रदानाचा संकल्प करावा, असे आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.
राज्यपाल श्री.राधाकृष्णन यांच्या संकल्पनेतून जे.जे. रुग्णालय आणि राजभवन यांच्या संयुक्त विद्यमाने राजभवन येथे 28 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर 2024 या कालावधीत नेत्रदान संकल्प अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नेत्रदानाचा संकल्प करणाऱ्यांचा आज राज्यपालांच्या हस्ते नेत्रदान कार्ड देऊन गौरव करण्यात आला. राज्यपालांचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, सह सचिव श्वेता सिंघल, जे.जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, नेत्र शल्यचिकित्सा विभागाच्या प्रमुख डॉ.सुजाता चहांदे आदी यावेळी उपस्थित होते.
राज्यपाल म्हणाले, कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू हा वेदनादायी असतो, तथापि त्यांच्या अवयवांच्या माध्यमातून इतर गरजूंना नवीन आयुष्य मिळू शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 74 व्या वाढदिवसानिमित्त राजभवन येथे आयोजित नेत्रदान संकल्प अभियानात 740 जणांनी संकल्प करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते, प्रत्यक्षात एक हजारांहून अधिक फॉर्म भरले गेले. याबाबत समाधान व्यक्त करून हा प्रतिसाद पाहता पुढील वर्षी पंतप्रधानांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त 7500 संकल्पाचे उद्दिष्ट ठेवू या, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
प्रधानमंत्री मोदी यांनी कोविडच्या दुर्दैवी काळात लस तयार करण्यास प्रोत्साहन देऊन केवळ देशातीलच नाही तर इतर देशांमधील गरजू रुग्णांचे प्राण वाचविले होते. त्यांच्या या कार्यामुळे इतरांना प्रेरणा मिळत असल्याचा उल्लेख राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी केला. मी स्वतः यापूर्वीच नेत्रदानाचा संकल्प केला आहे असे सांगून माझ्या कुटुंबातील मृत्यू झालेल्यांचे देखील नेत्रदान करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली. सर्वांनी असा संकल्प केल्यास नेत्रहीन गरजूंची यादी संपण्यास फार वेळ लागणार नाही असे सांगून अधिकाधिक लोक नेत्रदानाचा संकल्प करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या अभियानात सहभागी झालेल्या अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांचे तसेच डॉक्टर्सचे राज्यपालांनी यावेळी आभार मानले. नेत्रदानाचा संकल्प केलेल्यांचे फॉर्म राज्यपालांच्या हस्ते जे.जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ.सापळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. आजच्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
डॉ.सापळे यांनी यावेळी नेत्रदानाचे महत्व सांगून राज्यपालांनी या अभियानास पाठबळ दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले. तर, राज्यपालांचे परिवार प्रबंधक जितेंद्र वाघ यांनी ‘आय कॅन सी क्लियरली नाऊ’ ही या वर्षी नेत्रदान संकल्प अभियानाची थीम असल्याचे सांगून राजभवन येथे राबविण्यात आलेल्या अभियानाबाबत माहिती दिली.