मुंबई : मराठा आरक्षण आणि सुविधा यासाठी गठित केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेत सह्याद्री अतिथीगृह येथे मंगळवारी संपन्न झाली. या बैठकीत मराठवाड्यातील मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मराठवाड्यात क्रांतीसुर्य स्व. अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या नावाने एक नवीन महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
पाटील यावेळी म्हणाले कि, मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन प्रयत्नशील असून मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे. मराठा समाजाचे एसईबीसी आरक्षण टिकविण्यासाठी न्यायालयीन लढा शासन देत असल्याचे पाटील यांनी सांगितले. मराठा -कुणबी दाखले उपलब्ध करून देण्यासाठी पूर्वीची संख्या वाढवण्यात आली आहे. त्याआधारे कुणबी प्रमाणपत्र मिळणे सोपे झाले आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या धर्तीवर मराठवाड्यात क्रांतीसुर्य स्व. अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या नावाने सुरु करण्यात येणाऱ्या महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजाच्या तरुणांना उद्योगासाठी २० लाखांपर्यन्त वैयक्तिक कर्ज व्याजपरतावा देण्यात येईल. तसेच या महामंडळाच्या माध्यमातून मराठवाड्यातील मराठा समाजाच्या तरुणांना स्वयंरोजगारासाठी विविध योजना राबविण्यात येतील, अशी माहिती पाटील यांनी यांनी यावेळी दिली.
या बैठकीला महसूल तथा मंत्री समितीचे सदस्य राधाकृष्ण विखे पाटील, राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा मंत्री उप समिती सदस्य शंभूराज देसाई, आमदार सर्वश्री प्रवीण दरेकर, राजेंद्र राऊत, प्रसाद लाड, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष तथा माजी आमदार नरेंद्र पाटील, छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था चे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे, विधी व न्याय विभागाच्या प्रधान सचिव तथा विधी परामर्ष सुवर्णा केवले आणि मराठा समाजाच्या विविध संघटनेचे प्रतिनिधी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.