सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • शरद पवार घेणार अकरा दिवसात 42 सभा
  • गद्दारी करणाऱ्यांना आधी लाज वाटायची आता नाही : राज ठाकरे
 राज्य

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी स्वीप अंतर्गत राज्य-स्तरीय मतदार जागरुकता कार्यक्रम

डिजिटल पुणे    09-11-2024 10:20:20

मुंबई : 2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदारांचा सहभाग वाढविण्याच्या आणि मतदानाची टक्केवारी वाढवण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र, यांनी 8 नोव्हेंबर 2024 रोजी प्रसिद्ध गेटवे ऑफ इंडिया, मुंबई येथे राज्यस्तरीय मतदार जागृती कार्यक्रमाचा शुभारंभ केला. 20 नोव्हेंबर 2024 च्या निवडणुकीपूर्वी मतदारांना शिक्षित आणि प्रेरित करण्याच्या उद्देशाने राज्यव्यापी उपक्रमाची अधिकृत सुरुवात म्हणून या कार्यक्रमाला मान्यवरांचा समूह आणि प्रसिद्ध सार्वजनिक व्यक्ती उपस्थित होत्या.

या कार्यक्रमाला रोहित शेट्टी, अनन्या पांडे, अजिंक्य रहाणे, वर्षा उसगावकर, भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांच्यासह अनेक प्रमुख नामवंत उपस्थित होते. या नामवंतांनी नागरिकांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी  मतदारांना विशेष आवाहन केले.  या कार्यक्रमाला गौरी सावंत (ट्रान्सजेंडर राइट्स ॲक्टिव्हिस्ट) आणि निलेश सिंगित (अपंग हक्क कार्यकर्ते) हे  राज्य मान्यवर म्हणून उपस्थित होते, ज्यांनी या मोहिमेची सर्वसमावेशकता अधोरेखित केली.

“भारतामध्ये जर आपला आवाज ऐकला जात असेल, तर त्याचे कारण म्हणजे आपला मतदानाचा अधिकार आहे. जर तुम्ही मतदान करत नसाल, तर तुम्हाला तक्रार करण्याचा कोणताही अधिकार नाही. आपण एका लोकशाहीत जन्माला आलो आहोत आणि प्रत्येक देशात ही परिस्थिती नाही. आपण भारतीय आहोत हे आपले भाग्य आहे”असे दिग्दर्शक रोहित शेट्टी म्हणाले.

नागरिकांना प्रोत्साहित करताना ट्रान्स्जेंडर हक्क कार्यकर्त्या गौरी सावंत म्हणाल्या की, “ आपल्या पालकांकडून आपल्याला बऱ्याच गोष्टींचा वारसा मिळतो, पण केवळ मतदानाचा अधिकार आपल्याला आपल्याला राज्यघटनेने प्रदान केला आहे. ट्रान्स्जेंडर मतदारांच्या संख्येत 1000 वरून 6000 पर्यंत वाढ केल्याबद्दल महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक आयुक्तांचे विशेष आभार त्यांनी व्यक्त केले.

“मी सर्व मतदारांना बाहेर पडण्याचे आणि मतदानाचा अधिकार बजावण्याचे आवाहन करतो. भारताच्या निवडणूक आयोगाने अतिशय सहजतेने मतदान करण्यासाठी विशेष सुविधा केल्या आहेत,” असे अपंग हक्क कार्यकर्ते निलेश सिंगित यांनी सांगितले.भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे म्हणाले की, “एक पाऊल पुढे टाकणे आणि समाजात तुमची उपस्थिती दर्शवणे अतिशय महत्त्वाचे आहे. प्रत्येक मताचे महत्त्व आहे, म्हणूनच बाहेर पडा आणि मतदान करा.”

संपूर्ण महाराष्ट्रात फिरून मतदान प्रक्रियेबद्दल आवश्यक माहितीचा प्रसार करणाऱ्या एका मोबाईल युनिटचा भाग असलेल्या सीबीसी मतदार जागरुकता व्हॅनचे लॉन्चिंग हे आजच्या कार्यक्रमाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य होते. भारत निवडणूक आयोगाचे निवडणूक उपायुक्त रिदेश कुमार, महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम, उप-मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कुलकर्णी यांच्या उपस्थितीत व्हॅनचे उद्घाटन करण्यात आले. ट्रान्सजेंडर हक्क कार्यकर्त्या गौरी सावंत, अपंग हक्क कार्यकर्ते, निलेश सिंगित, ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री मनोज जोशी, ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर, संगीतकार आणि गायक मिलिंद इंगळे हे देखील यावेळी उपस्थित होते.

ही व्हॅन महाराष्ट्रातील 15 जिल्हे आणि 133 मतदारसंघांमध्ये प्रवास करेल, ज्यात ऐतिहासिक दृष्ट्या मतदानाचे प्रमाण अल्प  असलेल्या भागांचा समावेश आहे. ही व्हॅन मतदान प्रक्रिया, मतदान केंद्राची ठिकाणे, आदर्श आचारसंहिता आणि कोणत्याही प्रकारच्या उल्लंघनाबाबत तक्रारी दाखल करण्यासंबंधी महत्त्वपूर्ण माहिती वितरित करेल. दुर्गम भागात पोहोचणे, सर्व नागरिकांना सुयोग्य माहिती पुरविणे तसेच मतदानासाठी प्रेरित करण्याची खात्री करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

सर्वसमावेशक मतदार सहभागाच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून तसेच महाराष्ट्रातील नागरिकांमध्ये जागरुकता वाढविण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमात विविध गतिशील उपक्रमांचा समावेश करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात पोलिस बँडच्या संगीतमय सादरीकरणाने, निवडणूक संकल्पनेवर आधारित गीत सादर करून, तसेच त्यापाठोपाठ मान्यवरांनी मतदार प्रतिज्ञा घेत, पात्र मतदारांना आगामी निवडणुकीत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. संध्याकाळचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे मनोरंजक समूह नृत्य, ज्याने मजेदार, परस्परसंवादी पद्धतीने उत्साही आणि आकर्षक धाटणीत चैतन्यशील मांडणीसह जमलेल्या गर्दीसमोर मतदानाचे महत्त्व विषद केले. या कार्यक्रमात वैशाली माडे, राहुल सक्सेना, मिलिंद इंगळे आणि सुबोध जाधव यांनी निवडणुकीच्या संकल्पनेवर आधारित गाणी सादर करत संगीत सादरीकरण करून या माध्यमाद्वारे  प्रेक्षकांना निवडणूक प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी होण्याचे आवाहन देखील केले.याव्यतिरिक्त, मतदार जागरूकता आणि नागरी सहभागासाठी समर्पित विशेष टपाल पाकिटाचा प्रारंभ देखील या कार्यक्रमात झाला.

गेटवे ऑफ इंडिया येथील कार्यक्रमाव्यतिरिक्त, कुलाबा परिसर तसेच मुंबई शहर आणि उपनगरांतून मागील निवडणुकांमध्ये कमी मतदान झालेल्या इतर 28 ठिकाणांचा समावेश असलेल्या भागात विशेष मतदार जागृती रॅली काढण्यात आली. गेटवे ऑफ इंडियापासून सुरू झालेलीं ही रॅली, मतदारांचा सहभाग वाढवण्याच्या आणि प्रमुख भागात निवडणूक प्रक्रियेबद्दल जागरूकता पसरवण्याच्या मोहिमेचा एक महत्त्वाचा भाग आहे.

तरुण, महिला, दिव्यांग व्यक्ती (PWD), पारलिंगी समुदाय आणि ज्येष्ठ नागरिकांवर विशेष भर देऊन, समाजातील सर्व घटकांना सहभागी करून घेण्यासाठी मतदार जागृती कार्यक्रमाची रचना करण्यात आली होती. आपल्या लोकशाही अधिकारांचा वापर करण्यासाठी सर्व स्तरातील मतदारांना आवश्यक असलेली माहिती उपलब्ध असणे सुनिश्चित करणे हा या मोहिमेचा सर्वसमावेशक दृष्टीकोन आहे.

मतदारांना सहभागी करून घेत गेटवे ऑफ इंडिया येथे लेझर शोद्वारे प्रतिष्ठित वस्तू प्रकाशमान करत कार्यक्रमाचा कळसाध्याय गाठला गेला. यानंतर मनोरंजक समूह नृत्य, सुसंवाद आणि सर्वांसाठी सेल्फी पॉइंट तयार केल्याने कार्यक्रमाच्या परस्पर संवादी आणि उत्सवी वातावरणाला आणखी झळाळी प्राप्त झाली.

अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी पी. प्रदीप, सह मुख्य निवडणूक अधिकारी विजय राठोड, सह मुख्य निवडणूक अधिकारी के. सूर्यकृष्णमूर्ती, मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, मुंबई शहर महापालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त निवडणूक अधिकारी आणि महापालिका आयुक्त (शहर), अश्विनी जोशी, अतिरिक्त निवडणूक अधिकारी आणि महापालिका आयुक्त डॉ.व्ही.पी. शर्मा, अतिरिक्त निवडणूक अधिकारी डॉ.अमित सैनी, अतिरिक्त निवडणूक अधिकारी अभिजीत बांगर हेसुद्धा उपस्थित होते.

 

 

 


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती