मुंबई : देश सध्या एका प्रचंड गोंधळाच्या मानसिकतेतून जात आहे. आज महाराष्ट्रात लोकशाहीचा उत्सव सुरु आहे. मात्र इथले राजकारणी म्हणतात आम्ही निवडणूक लढतो. मात्र लढाई फक्त एकमेकांच बळकवण्यासाठी, लुटण्यासाठी असते. ती नेहमीच दोन देशात होत असते. जशी आज जगात कोठे ना कोठे सुरु आहे. मग निवडणुक म्हणजे लढाई म्हणणाऱे कुणाविरोधात लढताहेत. तर इथल्या गोरगरिब जनतेविरूद्ध लढून आपली खूर्ची वाचवताहेत तेव्हा आता ही गोरगरिबांची, देशाची लूट थांबवणे आवश्यक आहे. या भ्रष्ट राजकारण्यांना त्यांची जागा दाखवणे गरजेचे आहे. यासाठी महाराष्ट्रातील जनतेने विधानसभेच्या निवडणुकीचा आनंद उत्सव साजरी करीत महाराष्ट्राची सत्ता युवा वर्गाच्या हाती द्यावी असे आवाहन इको फ्रेन्डली लाईफ या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोक एन.जे यांनी आज व्यक्त केले.
महाराष्ट्रात सुरु असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व सामान्य जनतेमध्ये या लोकशाहीच्या आनंद उत्सवाबाबत जागृतता निर्माण व्हावी याकरिता इको फ्रेन्डली लाईफ या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्र विधानसभा लोकशाही उत्सव -2024, तरुण तगडा भारत अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. या अभियानाबाबत आज मुंबई प्रेस क्लब येथे प्रसार माध्यमांना माहिती देण्यात आली. त्यावेळी अशोक एन.जे यांनी सध्यस्थिती एकमेकांवर कुरघोडी करणाऱ्या राजकारणाबाबत खंत व्यक्त केली. मागील अनेक वर्षापासून महाराष्ट्रासह देशभरात हेच राजकारण सुरु आहे. हे कुठे तरी थांबायला हवे. याकरिता पुढील काळात केवळ युवा वर्गाच्या हातात सत्तेची चावी देणे गरजेचे आहे. जेणेकरून या देशाचा वास्तव विकास होईल. याबाबत तरुण तरुणींमध्ये राजकारणांबाबत जागृती निर्माण होणे गरजेचे आहे. हा युवा वर्ग कोणत्याही पक्षात असो आम्ही कोणतेही पक्षीय राजकारण करीत नाही. आम्हाला या देशाची सत्ता केवळ येथील तरुणांच्या हाती द्यायची आहे या देशात पर्यावरण संरक्षण करणारे शासन निर्माण व्हावे याकरिता तरुण तगडा भारत अभियानच्या वतीने हे आवाहन करण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
5 जून 2024 या जागतिक पर्यावरण दिनापासून पुढील चार वर्षात इको फ्रेंडली लाईफ फाउंडेशन ने देशभरात 700 कोटी फळझाडे लावण्याचा निर्धार केला आहे. या महाउपक्रमांतर्गत महाराष्ट्रासह देशातील विविध ठिकाणी वृक्षारोपण होत आहे. या मोहिमेत विशेष करून महाविद्यालयीन तरुण तरुणी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. मात्र राज्यकर्त्यांच्या उदासिन भूमिकेमुळे या उपक्रमाला गती मिळत नाही. तेव्हा येणाऱया विधानसभा निवडणुकीत पर्यावरण पूरक लोकप्रतिनिधी असणे अत्यंत आवश्यक आहे. हे काम फक्त युवा शक्तीच करू शकते. प्रामुख्याने युवा वर्गाला प्रोत्साहित करण्यासाठी विधानसभा -2024 निवडणुकीत केवळ तरुण उमेदवारांना मते देऊन त्यांना विजयी करण्यासाठी महाराष्ट्र विधानसभा लोकशाही उत्सव -2024, तरुण तगडा भारत अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे.
पर्यावरणाच्या संरक्षणासाठी तरुणांशिवाय तरणोपाय नाही. 700 करोड फळझाडे भारतभरात लावण्याचा महासंकल्प सर अशोक एन जे यांनी केला आहे. ज्यामध्ये भारतभरातील युवा वर्गाला वॉटर हार्वेस्टिंग इको व्हिलेज इको हाऊस इत्यादी प्रकल्पांचे प्रात्यक्षिक पाहण्याची आणि अनुभवण्याची संधी मिळत आहे .तरुणाईच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणाबरोबरच महाराष्ट्राचा शाश्वत विकास आणि देशाचा सर्वांगीण शाश्वत विकास या मोहिमेला गती देण्यासाठी महाराष्ट्रामध्ये सरकार आणण्याचे उद्दीष्ट याद्वारे ठेवण्यात आले आहे. पक्ष कोणताही असो मात्र प्रत्येकाने युवा वर्गाला संधी द्यावी ही भूमिका या अभियानाद्वारे मांडण्यात येत आहे.
भ्रष्ट शासन प्रशासन मागील कित्येक वर्षापासून तेच तेच राजकारण करत आहेत. त्यांना आता निवृत्त करण्याची वेळ आली आहे. तरीही हे लोक आपला 30-40 वर्षापूर्वीचेच विचार मांडत राजकारण करीत आहेत. ज्याचा आजच्या युगाला आणि युवा वर्गाला काडीमात्र उपयोग नाही. आजच्या आधुनिक युगातील युवा वर्ग अधिक सक्षम आहे. याची युवा वर्गाला जाणीव करून देणे गरजेचे आहे. यासाठी ठाणे इथून जागृती रथ यात्रेची शानदार सुरुवात करण्यात आली. जागृती रथ यात्रे सोबतच पथनाट्याद्वारे देखील संपूर्ण महाराष्ट्रात जनजागरण करण्यात येत आहे. याला सर्वसामान्य जनतेकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे आणि विशेष करून युवा वर्ग या उपक्रमात स्व-स्फूर्तीने सहभागी होत आहे.