मुख्य निवडणूक कार्यालय, केंद्रीय संचार ब्यूरो यांच्या संयुक्त विद्यमाने मतदार जनजागृती व्हॅनचा पुण्यात शुभारंभ
निवडणूक आयोग, केंद्रीय संचार ब्युरोमार्फत 11 ते 20 नोव्हेंबर दरम्यान पुण्यात मतदार जनजागृती, एलईडी व्हॅनच्या माध्यमातून 15 मतदारसंघांमधील मतदारांचे प्रबोधन
पुण्यात कमी मतदानाचे प्रमाण असलेल्या ठिकाणी निवडणूक आयोग, केंद्रीय संचार ब्युरोमार्फत मतदार जनजागृती
Posted On: 11 NOV 2024 4:11PM by PIB Mumbai
पुणे, 11 नोव्हेंबर 2024
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक कार्यालय, महाराष्ट्र आणि भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयअंतर्गत, केंद्रीय संचार ब्यूरो, पुणे आणि SVEEP व्यवस्थापन कक्ष, पुणे जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यामार्फत आयोजित मतदार जनजागृती मोहिमेचा आज पुण्यात शुभारंभ झाला.
विशेष निवडणूक निरीक्षक दीपक मिश्रा, निवडणूक निरीक्षक राजेश सिन्हा यांच्या हस्ते आणि पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या प्रमुख उपस्थितीत एलईडी व्हॅनला हिरवा झेंडा दाखवून मतदार जनजागृती मोहिमेची सुरूवात करण्यात आली. यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुरेश फुलारी, उपजिल्हाधिकारी तथा उप निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा स्वीप नोडल अधिकारी अर्चना तांबे, केंद्रीय संचार ब्युरोचे उपसंचालक निखिल देशमुख, व्यवस्थापक डॉ. जितेंद्र पानपाटील आणि माध्यम व क्षेत्रीय प्रचार अधिकारी हर्षल आकुडे आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर स्वीप मतदार जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत एलईडी व्हॅन ही 11 ते 20 नोव्हेंबरदरम्यान पुण्यातील सुमारे 15 मतदारसंघातील अल्प मतदानाचे प्रमाण असलेल्या परिसरांमध्ये जाऊन नागरिकांचे प्रबोधन करणार आहे. नियोजित कार्यक्रमानुसार, ही व्हॅन 11 नोव्हेंबर रोजी पुणे कॅन्टोनमेंट, 12 नोव्हेंबर रोजी कसबा पेठ आणि वडगाव शेरी, 13 नोव्हेंबर रोजी हडपसर आणि पुरंदर, 14 नोव्हेंबर रोजी खडकवासला आणि पर्वती, 15 नोव्हेंबर रोजी शिवाजीनगर आणि कोथरूड, 16 नोव्हेंबर रोजी भोर, 17 नोव्हेंबर रोजी मावळ, 18 नोव्हेंबर रोजी चिंचवड, 19 नोव्हेंबर रोजी पिंपरी आणि भोसरी तर 20 नोव्हेंबर रोजी खेड आळंदी या मतदारसंघांमध्ये जाऊन येथील अल्प मतदान झालेल्या परिसरांमध्ये जनजागृतीचे कार्य करेल.
यासोबतच, मतदान प्रक्रिया, मतदान केंद्राची ठिकाणे, आदर्श आचारसंहिता आणि कोणत्याही प्रकारच्या उल्लंघनाबाबत तक्रारी दाखल करण्यासंबंधी महत्त्वपूर्ण बाबी यांच्याविषयीची माहितीही या व्हॅनमधून सर्वांना देण्यात येईल. मोहिमेमध्ये जास्तीत जास्त नागरिकांना माहिती पुरवण्याची आणि सहभागी करून घेण्यासाठी दृकश्राव्य माध्यमांचा वापर केला जाणार आहे.
मोबाइल जनजागृती मोहिमेसोबतच, ज्येष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्यक्तींसह प्रमुख मान्यवरांचे व्हिडिओ संदेशही या एलईडी स्क्रीनवर प्रदर्शित केले जातील. पुण्यातील सर्व नागरिकांनी मतदानाचा पवित्र हक्क बजावावा, असे आवाहन या व्हॅनमधून करण्यात येणार आहे.
व्हॅन उद्घाटनप्रसंगी डॉ. सुहास दिवसे यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मतदार जनजागृतीसाठी पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या उपक्रमांविषयी माहिती दिली. स्वीप उपक्रमाअंतर्गत महिला, कामगार, तृतीयपंथीय, तरूण आणि सर्वच नागरिकांमध्ये मतदानाप्रती जागृती निर्माण होऊन त्यांनी आपला हक्क निर्भिडपणे बजावावा यासाठी वेगवेगळ्या मोहिमा आयोजित करण्यात येत असतात. त्याचाच एक भाग म्हणून हा रथ पुणे जिल्ह्यात फिरेल. यामध्ये पथनाट्य, डॉक्युमेंटरी आणि चित्रफिती या माध्यमातून मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात येईल. यामुळे, यंदाच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी नक्की वाढेल, असा विश्वास यावेळी जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी व्यक्त केला.