बीड : राज्यभर लोकशाहीचा उत्सव साजरा केला जात असताना बीड विधानसभा मतदारसंघातून दुर्दैवी घटना समोर आली आहे. मतदारसंघातील अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचा हृदयविकाराचा झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बाळासाहेब शिंदे बीड मतदारसंघातून अपक्ष म्हणून रिंगणात उतरले होते. परंतु ऐन मतदानाच्या दिवशी त्यांची प्राणज्योत मालवली आहे. बाळासाहेब मतदान केंद्रावर आले असता त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांनी जागीच आपला श्वास सोडला.
विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना काही मतदारसंघात गोंधळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या परळी मतदारसंघातील घाटनांदूर येथे राडा झाल्याचे पाहायला मिळाले. परिणामी तीन मतदान केंद्रावर १ तास मतदान यंत्रणा बंद होती. त्यामुळे, बीड जिल्ह्यातील मतदानाचा दिवस चांगलाच चर्चेत आला आहे. एकीकडे राड्यामुळे बीड जिल्ह्यातील वातावरण तापले असताना दुसरीकडे बीड विधानसभा मतदारसंघातून दुर्दैवी आणि धक्कादायक घटना समोर आली. बीड विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचा मतदान केंद्रावरच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे. आपल्या तरुण उमेदवाराचा मृत्यू झाल्याने कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे. तर त्यांच्या कुटुंबावरही दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
बाळासाहेब शिंदे बीड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत होते. दरम्यान ते आज मतदानाच्या दिवशी ते बीड शहरातील छत्रपती शाहू विद्यालयात असणाऱ्या मतदान केंद्रावर आले होते. यादरम्यान धक्का बसला अन् ते खाली कोसळले. त्यानंतर, कार्यकर्त्यांनी त्यांना तात्काळ बीड शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, तेथून त्यांना छत्रपती संभाजी नगर येथील रुग्णालयात नेण्यात आले. पण, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. शिंदे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून उमेदवार शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनाही या घटनेने मोठा धक्का बसला आहे.