उरण : उरण तालुक्यात एनएमएमटीची बंद असलेली सेवा पुन्हा सुरु करावी यासाठी द्रोणागिरी शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे गट )शाखेच्या वतीने पत्रव्यवहार करून शहरप्रमुख जगजीवन भोईर व इतर सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी पाठपुरावा केला होता. आता या पाठपुराव्याला यश आले आहे.बुधवार दिनांक २७ नोव्हेंबर २०२४ पासून एनएमएम टी बस सुरू झाली. बस सेवा सुरु झाल्याने शाखा प्रमुख जगजीवन भोईर व इतर सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एनएमएमटी प्रशासनाचे आभार मानले आहेत.शिवसेना द्रोणागिरी शहर शाखेच्या वतीने आम्ही विशेष प्रयत्न केले होते परंतु कामगारांच्या युनियनने सुरक्षेपायी सदर एनएमएमटी बंद केली होती. मग त्यासाठी शहरशाखेने व्यवस्थापनाला निवेदन देवून तसेच प्रत्यक्ष अनेकदा भेटून चर्चा केली तसेच कामगार युनियन व मॅनेजमेंट तसेच प्रवासी यांच्यात सुवर्णमध्य साधून एनएमएमटी सुरू करण्याचा प्रयत्न केला.
चालक व वाहक यांच्या सुरक्षेच्या कारणांमुळे एनएमएमटी सुरू होत नव्हती त्यांना सुरक्षेची हमी हवी होती. आम्ही द्रोणागिरी शहरात सुरक्षा देण्याची हमी घेतली होती. आचारसंहिता संपल्यानंतर एनएमएमटी सुरू करण्याच्या व्यवस्थापनाच्या आणि चालक व वाहक कामगार युनियनच्या निर्णयाचे आम्ही द्रोणागिरी शहर शाखेतर्फे स्वागत करत आहोत असे मत द्रोणागिरी शिवसेना शाखा प्रमुख जगजीवन भोईर यांनी व्यक्त केले.तसेच सर्व प्रवासी आणि शहरवासीयांना तसेच गावकऱ्यांना विनंती करत आहोत की चालक वाहक आणि प्रवास्यांना सुरक्षित आणि आनंददायी प्रवास करण्यास मदत करावी असे आवाहनही जगजीवन भोईर यांनी केले आहे.द्रोणागिरी शहरात बस डेपो साठी जागा राखीव आहे त्या ठिकाणी आम्ही द्रोणागिरी शहरात बस डेपो सुरू करून येथून वातानुकुलीत (AC) एनएमएमटी बस सुरू करावी यासाठीही प्रयत्न केले आहेत.असेही जगजीवन भोईर यांनी यावेळी सांगितले. द्रोणागिरी शहरात लोकसंख्या भरपूर असल्यामुळे बस डेपो तयार करून वातानुकुलीत बस सेवा सुरु करण्याची मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे. या मागणीला आता जनतेचा सुद्धा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.