उरण : काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ प्रामाणिक कार्यकर्ते तसेच बॅरिस्टर अंतूले साहेब यांचे कट्टर समर्थक व गोरगरिबांच्या अडीअडचणीत नेहमी धावून जाणारे, विविध समस्यां विरोधात नेहमी आवाज उठवणारे काँग्रेसचे उरण शहराध्यक्ष प्रकाश पाटील यांनी आपल्या वैयक्तिक कारणासाठी तसेच जास्तीत जास्त तरुणांना राजकारणात संधी मिळावी म्हणून त्यांनी आपल्या उरण शहर अध्यक्ष पदाचा राजीनामा काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्याकडे सुपूर्त केला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्क वितर्कांना उधाण आले आहे.
प्रकाश पाटील यांनी दिलेल्या राजीनाम्यात त्यांनी म्हंटले आहे की गेल्या तीन वर्षा पासून मी पक्षाचा प्रामाणिक व निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून काम करीत आहे. पक्षाचे सर्व कार्यक्रम बैठाका वेळो वेळी घेतले आहे.परंतु माझे वय ६२ वर्षे झाले असून येणाऱ्या नवीन कार्यकर्त्याला संधी मिळावी अशी माझी धारणा आहे. तसेच मला माझ्या व्यवसाया मुळे व कौटुंबिक जबाबदाऱ्यामुळे मी आता पक्षाला फार जास्त वेळ देवू शकत नाही. परंतु पुढील काळात मी आपल्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून नक्कीच काम करीन.असे त्यांनी म्हंटले आहे.प्रकाश पाटील हे उरण शहरातील काँग्रेसचे निष्ठावंत प्रामाणिक नेते असून ते बॅ. ए आर अंतूले (माजी मुख्यमंत्री )यांचे खंदे समर्थक म्हणून मानले जातात. प्रकाश पाटील यांनी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यामुळे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते नाराज झाले असून अनेकांनी त्यांना फोन करून नाराजी व्यक्त केली आहे.