सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
 पूर्ण तपशील

कल्याण अल्पवयीन मुलीची लैंगिक अत्याचार करून हत्या; आरोपी विशाल गवळीला 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

डिजिटल पुणे    26-12-2024 16:25:18

कल्याण : कल्याणमधील एका अल्पवयीन मुलीवर आरोपी विशाल गवळीने बलात्कार केला. शिवाय या नराधमाने तिची हत्याही केली. एक चिमुकली चॉकलेट आणायला घरातून बाहेर पडली होती. ती घरी परतलीच नाही. तिच्यावर बलात्कार करून हत्या केल्याचे समोर आले. याप्रकरणी आता आरोपी विशाल गवळीला 2 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. कल्याण कोर्टाने ही कारवाई केली आहे. दरम्यान, याप्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. यात विशालच्या बायकोचाही हात असल्याचं बोललं जातंय. तिलाही अटक करण्यात आलीय. त्याला फाशी देण्याची मागणी होतेय.

विशालच्या कल्याणच्या घराबाहेर रक्ताचे डाग सापडल्यानंतर पोलिसाचा त्याच्यावर संशय बळावला. त्यामुळे पोलिसांनी त्याची बायको साक्षी हिला अटक केली. साक्षीची उलट तपासणी करताच तिने गुन्ह्याचा संपूर्ण घटनाक्रमच सांगितला. त्यानंतर पोलिसांनी थेट शेगाव गाठत विशालच्या मुसक्या आवळल्या. त्याचाच सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाला आहे.

हा सीसीटीव्ही फुटेज अत्यंत क्लिअर आहे. यात विशालच्या हालचाली स्पष्टपणे दिसून येत आहे. विशाल शेगावमधील एका जेन्ट्स पार्लर (सलून)मध्ये येताना दिसतो. त्याच्या हातात एक पिशवी आहे. ती पिशवी तो बाजूलाच ठेवतो. त्यांच्या अंगात टी शर्ट आणि जीन्स आहे. त्यानंतर तो दाढी आणि कटिंग करण्यासाठी खुर्चीवर बसतो. त्याची दाढी झाल्याबरोबर एक पोलीस तोंडाला रुमाल बांधून आत येतो. पोलिसाने निळा टीशर्ट आणि जीन्स घातली होती. पोलीस आत आल्यावर विशालची खुर्ची फिरवतो. विशालचे दोन्ही हात घट्ट पकडून ठेवतो.

त्यानंतर दोघांमध्ये बोलचाल होते. विशालला पोलीस सोबत येण्याची विनंती करतात. पण विशाल काही उठायचं नाव घेत नाही. तेवढ्यात गणवेशातील पोलीस आत येतो. पुन्हा बोलचाल सुरू होते. पण विशाल काही उठत नाही. मग आधी आलेला पोलीस विशालची खुर्ची जोराने ओढतो, विशालला उठवण्याचा हा प्रयत्न असतो. त्यानंतर विशाल उठतो. विशाल पळून जाऊ नये म्हणून दोन्ही पोलीस त्याला कडं करतात आणि त्याला बाहेर नेतात. यावेळी विशालच्या चेहऱ्यावर भीती, पश्चात्ताप काहीच दिसत नाही. सलूनमध्ये लोकही काय घडतंय हे वळून वळून पाहताना सीसीटीव्हीत दिसत आहेत.

दरम्यान, विशाल गवळी आणि त्याची बायको साक्षी हिला आज कोर्टात हजर करण्यात आलं होतं. कोर्टाने दोघांनाही 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. न्यायाधीश व्ही. ए. पत्रावळे यांच्यासमोर ही सुनावणी झाली. यावेळी सरकारी वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. आरोपीने अल्पवयीन मुलीचं अपहरण कुठून केलं? तिची हत्या कशी झाली? तिला कशा प्रकारे मारलं? त्याला या प्रकरणात मदत करणारे आणखी कोणी आहेत का? त्याने हत्या करण्यासाठी कोणतं साहित्य वापरलं? मृतदेहाची विल्हेवाट कुठे लावली? या सर्वांचा तपास करायचा असल्याने त्याची पोलीस कोठडी द्यावी, असी मागणी सरकारी वकिलांनी केली होती. त्यानुसार कोर्टाने ही कोठडी सुनावली आहे.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती