सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
 पूर्ण तपशील

बीडच्या घटनेची पुनरावृत्ती! धाराशिवच्या सरपंचावर जीवघेणा हल्ला

डिजिटल पुणे    27-12-2024 17:27:14

धाराशिव:  धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा गावचे सरपंच नामदेव निकम यांच्यावर गुरुवारी जीवघेणा हल्ला करण्यात आला. यावेळी मेसाई जवळगा गावच्या सरपंचाच्या गाडीवर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र आता या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

मेसाई जवळगा गावच्या सरपंचावर जीवघेणा हल्ला :

नामदेव निकम हे मेसाई जवळगा गावचे सरपंच असून, त्यांच्यावर हा हल्ला तुळजापूरमधील बारुळ गावानजीक झाला. गुंडांनी नामदेव निकम यांच्या गाडीवर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात सरपंचाला गंभीर दुखापत झाली आहे. मात्र त्यांच्या या घटनेने कुटुंबीयांमध्ये तणावाचे वातावरण पसरले आहे.पवनचक्कीच्या वादातून हा हल्ला झाल्याचे प्राथमिक तपासात समजत आहे. कारण पवनचक्की स्थापनेच्या विषयावरून स्थानिक नेते आणि समुदायातील काही गटांमध्ये वाद निर्माण झाला होता, मात्र त्यामधून हा हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे.

बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणानंतर आता धाराशिव जिल्ह्यातही सरपंचावर हल्ला झाल्याने स्थानिक समुदायात दहशत निर्माण झाली आहे. या घटनेमुळे ग्रामीण क्षेत्रातील नेत्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.

नामदेव निकम हे गुरुवारी रात्री बारुळ गावातून आपल्या कारने जवळगा मेसाई गावाकडे परतत होते. त्यावेळी रस्त्यात असताना त्यांच्या कारच्या दोन्ही बाजुंनी अचानक दोन बाईक आल्या. या बाईकस्वारांनी निकम यांच्या गाडीच्या काचा फोडून आतमध्ये पेट्रोलने भरलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या टाकल्या. तरीही नामदेव निकम यांनी गाडीचा वेग कमी केला नाही. तेव्हा बाईकवरील गुंडांनी निकम यांच्या कारच्या काचांवर अंडी फेकली. त्यामुळे त्यांना पुढील काहीही दिसेनासे झाले. त्यामुळे त्यांना गाडी थांबवावी लागली. त्यावेळी गुंडांनी त्यांच्या गाडीवर आणखी पेट्रोल टाकून गाडीसकट नामदेव निकम यांना जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, नामदेव निकम कसेबसे गाडीतून बाहेर पडले. यामध्ये नामदेव निकम आणि त्यांचा एक सहकारी जखमी झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून या भागात गुंड दहशत माजवत असल्याच्या बातम्या सातत्याने समोर येत आहेत. प्राथमिक तपासात हा हल्ला पवनचक्कीच्या वादातून हल्ला झाला असल्याची माहिती समोर आली. बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर गृह विभाग आणि पोलीस दल विरोधकांच्या निशाण्यावर आहे. त्यामुळे आता याप्रकरणात पोलीस काय कारवाई करतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

मात्र नामदेव निकम यांच्यावर हल्ला झाल्यानंतर पोलिसांनी त्वरित कारवाई सुरू केली आहे आणि हल्ला करणाऱ्या आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत. तसेच सरपंच नामदेव निकम यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे आणि या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती