पंढरपूर : पंढरपूर मध्ये विठ्ठल रूक्मिणी च्या चरणी एका दानशूर भाविकाने 9 लाखांचा हार अर्पण केला आहे. हा हार सूर्यकळ्यांच्या आकाराचा आहे. दरम्यान भाविकाने नाव न सांगण्याची अट घातली असल्याचं समोर आलं आहे. 132 ग्रॅम वजनाचा हा हार सुमारे 9 लाख 26 हजारांचा असल्याची माहिती देण्यात आली आहे. हा सोन्याचा हार विठ्ठलाला परिधान देखील करण्यात आला होता.
हार दान केलेली व्यक्ती पंढरपूर मध्ये सहकुटुंब आली होती. त्याने विठ्ठल रूक्मिणीचे दर्शन घेतले. सोबतच श्री संत तुकाराम भवन येथील अन्नछत्राला दान दिले. अन्नदानामुळे त्यादिवशी सुमारे 1200-1500 भाविकांना मोफत जेवणाचा आनंद घेता आला.
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये सोनं-चांदीच्या वस्तू दान करण्यासाठी स्वतंत्र कक्ष आहे. तेथे 2 सराफा उपस्थित असतात. दरम्यान भाविकांना या दानानंतर स्वतंत्र पावती दिली जाते.पंढरपूर मध्ये आता घरबसल्या ऑनलाईन दर्शनाची सोय खुली करण्यात आली आहे. यासाठी पहिल्याच दिवशी 3 महिन्यांचं बुकिंग फुल्ल झालं आहे. 31 मार्च 2025 पर्यंतचं बुकिंग सध्या फुल्ल झालं आहे. 26 डिसेंबर पासून या बुकिंगची सुरूवात झाली आहे. या ऑनलाईन बुकिंगच्या माध्यमातून लोकांना सकाळच्या नित्य पूजेचा आनंद घेता येणार आहे.