गडचिरोली : वर्षाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात दाखल झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कुख्यात नक्षल कमांडर तारक्का हिनं पोलिसांपुढं आत्मसमर्पण केलं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेनगुंडा या गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद्यांचा गड असलेल्या परिसरात जात नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पोलीस अधिक्षक निलोत्पल यांचं नक्षलग्रस्त पेनगुंडा इथं 24 तासात पोलीस मदत केंद्र उभारल्यामुळे कौतुक केलं. दुसरीकडं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अहेरी ते गर्देवाडा या नक्षलग्रस्त परिसरात पहिलीच बससेवा सुरु करण्यात आली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल 77 वर्षानंतर या गावात लालपरी बससेवा सुरू झाल्यानं नागरिकांनी आनंद व्यक्त केला.
देशाला स्वातंत्र्य मिळून आता मोठा कालावधी झाला आहे. मात्र अद्यापही गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त गावात सरकारची लालपरी पोहोचली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर नवीन वर्षाची सुरुवात गडचिरोली जिल्ह्यातून केली. त्यांनी नक्षलवाद्यांचा गड मानल्या जाणाऱ्या पेनगुंडा परिसरात नवीन वर्षाची सुरूवात केली. यावेळी त्यांनी अहेरी ते गर्देवाडा या मार्गावर बससेवा सुरू केली. त्यामुळे आता नक्षलग्रस्त परिसरात बससेवा सुरू झाल्यानं नागरिकांना दळणवळणाच्या सुविधा निर्माण झाल्या आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहेरी ते गर्देवाडा बससेवाचा शुभारंभ केला. यावेळी बोलताना ते म्हणाले, की "आज अहेरी ते गर्देवाडा दरम्यान बससेवा सुरू करण्यात आली. 77 वर्षांनंतर पहिल्यांदाच बससेवा सुरू झाली आहे. आमचे पोलीस आणि गावकरी नक्षलवाद्यांशी लढले. त्यांच्या सहकार्यामुळेच पेनगुंडा इथं एक नवीन चौकी उघडण्यात आली. नक्षलवाद्यांचं वर्चस्व असलेल्या भागात पोलीस आणि सरकारी वर्चस्व दिसून येत आहे. मी इथं खाण प्रकल्पाचं उद्घाटन करण्यासाठी आलो. त्याची पायाभरणी 2019 मध्ये कमी मुख्यमंत्री असताना करण्यात आली. या माध्यमातून आम्ही 50 हजार लोकांना रोजगार देण्याचा प्रयत्न करत आहोत."