पुणे : पुण्यातील जेल रोडवरील एका रुग्णालयासमोर भरधाव कारने दिलेल्या धडकेत दीर भावजयीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. लोहगाव परिसरातील जेल रस्त्यावरील संजय पार्क येथे हा अपघात गुरूवारी सकाळी झाला. याप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशीर्वाद गोवेकर (वय ५२), रेश्मा गोवेकर (वय ४७) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. याप्रकरणी कारचालक अचलकुमार (वय ४३) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत प्रसाद गोवेकर (वय ५४, रा. शिव पार्वती मंगल कार्यालयाजवळ, गोकुळनगर, कात्रज-कोंढवा रस्ता) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, दुचाकीस्वार आशीर्वाद आणि त्यांची भावजय रेश्मा लोहगाव परिसरातील जेल रोडवरील संजय पार्क परिसरातून गुरुवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास निघाले होते. त्यावेळी भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. अपघातात दुचाकीस्वार आशीर्वाद यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या सहप्रवासी रेश्मा यांना खासगी रुग्णालयात दाखल केले होते. परंतु, त्यांचा देखील उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच सहायक आयुक्त प्रांजली सोनवणे, वरिष्ठ निरीक्षक अजय संकेश्वरी यांनी घटनास्थळी भेट दिली. सहायक निरीक्षक पोटे अधिक तपास करत आहेत.
बेशिस्त वाहन चालकांमुळे देखील या वाहतूक कोंडीत भर पडते. तर अपघाताला देखील निमत्रंण मिळते. गेल्या काही दिवसांत वाहतूक पोलिसांनी ट्रिपलशिट, विरूद्ध दिशेने वाहने चालविणारे तसेच मोबाईल टॉकिंग अशांवर जोरदार कारवाई सुरू केली. वाहने देखील जप्त करण्यात येत होती. नंतर आता पोलिसांनी थेट गुन्हे दाखल करण्यास सुरूवात केली आहे. आता थेट पोलिसांनी बेशिस्तांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई केली जात असून, यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करण्याची मोहिम हाती घेतली आहे. यात धोकादायक पद्धतीने वाहन चालविणाऱ्यांसह रस्त्यावर वाहतुकीला अडथळा करणाऱ्यांवर प्रामुख्याने कारवाई केली जात आहे, असे दाखल गुन्ह्यांचे विश्लेषण केल्यावर दिसून येते.