मुंबई : बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फरार तीन आरोपींपैकी दोन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मुख्य आरोपी सुदर्शन घुले याच्यासह सहआरोपी सुधीर सांगळेला काल रात्री पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतले. त्यानंतर आज त्यांना केज कोर्टात हजर केले जाणार असून आतापर्यंत या प्रकरणात एकूण सात जणांना अटक करण्यात आली आहे. तर अजूनही कृष्णा आंधळे हा एक आरोपी फरार असून त्याच्या अटकेसाठी विशेष पथके मागावर आहेत. दुसरीकडे या आरोपींना मदत करणाऱ्या डॉ. संभाजी वायबसे आणि त्यांच्या वकील पत्नीला पोलिसांनी नांदेडमधून अटक केली आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येच्या दिवशी डॉ.संभाजी वायबसे याने सुदर्शन घुले याच्याशी संपर्क साधला होता. त्यानेच आरोपींना पळून जाण्यास मदत केली, शिवाय आरोपींना पळून जाण्यासाठी पैसे पुरवल्याचा देखील त्याच्यावर आरोप आहे. डॉ. संभाजी वायबसे हा स्वतःचा बीड शहरांमध्ये काही वर्षांपूर्वी रुग्णालय चालवायचा. मात्र तो नंतर ऊसतोड मुकादम म्हणून काम करत होता. सुदर्शन घुलेसह, सुधीर सांगळे यांच्यासोबत तो काम करायचा अशी माहिती आहे. ऊसतोड मुकादम असे काम करत असताना सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे या तिघांसोबत डॉक्टरचा संबंध आला. संभाजी वायबसे सध्या डॉक्टरकीचा व्यवसाय करत नाही. मात्र,त्याची पत्नी वकील असून तिने काही दिवस सरकारी वकील म्हणूनही काम केलेले आहे. डॉ.वायबसे संतोष देशमुखची हत्या झाल्यापासून फरार असल्याची माहिती होती.
त्यानंतर पहिल्या दिवसापासून पोलीस त्याच्यावर लक्ष ठेवून होते, मात्र तो सापडत नव्हता. अखेर आज डॉ. वायबसेला वकील पत्नीसह विशेष तपास पथकाने नांदेडमधून अटक केली. या अटकेमुळे संतोष देशमुख हत्येच्या प्रकरणाला चांगलाच वेग आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, डॉ.संभाजी वायबसे यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येच्या दिवशी सुदर्शन घुलेशी संपर्क साधला होता. विशेषतः त्यानेच आरोपींना पळून जाण्यात मदत केली होती. एवढेच नव्हे तर आरोपींना पळून जाण्यासाठी त्यानेच पैसे पुरविल्याचा आरोप आहे. तर आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेसह पोलिसांनी सिद्धार्थ सोनवणे नावाच्या एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. संशयित सोनवणे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या दिवशी बीडमध्ये होता. त्यानेच मारेकऱ्यांना संतोष देशमुख यांच्या लोकेशनची टीप दिली होती, असा आरोप आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
केज तालुक्यातील सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबरला अपहरण करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण देशभरात खळबळ उडाली होती. या प्रकरणाचे पडसाद विधानसभा अधिवेशनातही पाहायला मिळाले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्याची घोषणा केली. या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.