नवी दिल्ली :देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देत असल्याची घोषणा केली होती. मात्र, घोषणा झाल्यानंतरही याबाबतचा शासन आदेश निघाला नव्हता. मात्र, आज अखेर मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याचे स्वप्न पूर्ण झाले असून, याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे. सांस्कृतिक मंत्री गजेंद्र शेखावत यांनी मंत्री उदय सामंत यांना याबाबतचा आदेश सोपवला आहे. संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा अतिशय आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचं महाराष्ट्राकडून स्वागत केलं जात आहे.
याबाबत बोलताना उदय सामंत म्हणाले, ‘महाराष्ट्राचे स्वप्न आज पूर्ण होत आहे. मी मराठीला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवायचं काम करायचं आहे. आता मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करण्याची जबाबदारी वाढली आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सांस्कृतिक मंत्री गजेंद्र शेखावत यांचे आभारी मानतो.’
यावेळी मंत्री उदय सामंत यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांच्या हस्ते मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणारा शासन निर्णय स्वीकारल्यानंतर महाराष्ट्रातील जनतेच्यावतीने तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांचे आभार मानले.तसेच यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सामंत म्हणाले की, “हा एक अनोखा योगायोग आहे. ११ वर्षांपूर्वी, जेव्हा हा प्रस्ताव पाठवला गेला, तेव्हा मी मराठी भाषेचा राज्यमंत्री होतो. आज, अभिजात भाषेसाठीचा शासन आदेश हाती मिळाला तेव्हा मी मराठी भाषेचा कॅबिनेट मंत्री आहे. आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर जे काही लाभ मिळतात, ते मिळवण्यासाठी आम्ही तातडीने प्रस्ताव सादर करणार आहोत, असे त्यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले की, “आज देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात मराठा भाषेचा कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर हा शासन निर्णय माझ्या हातात आणण्याचे भाग्य नियतीने लिहून ठेवलेले होते. म्हणून आता आमची जबाबदारी वाढलेली आहे, असे मला वाटते. तसेच या जबाबदारीने काम करून मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन केवळ महाराष्ट्रातच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर कसे केले जाईल, यासाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत. पुढील महिन्यात होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर या शासन आदेशाच्या आगमनाला खास महत्त्व आहे”,असेही उदय सामंत यांनी सांगितले.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने फायदे
अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करणाऱ्या अभ्यासकांना दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार दिले जातील.
सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडीजची स्थापना करता येणार
प्रत्येक अभिजात भाषा विद्यापीठात एक अभ्यास केंद्र स्थापन केले जाईल.
मराठी बोलीभाषेचा अभ्यास, संशोधन, साहित्यसंग्रह करता येणार आहे.
भारतातील सर्व 450 विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याची सोय होणार
प्राचीन ग्रंथांचे भाषांतर करता येणार
महाराष्ट्रातील सर्व 12,000 ग्रंथालयांना सक्षम केले जाईल
पुरातनता, श्रेष्ठता, स्वाभिमान आणि सलगता म्हणजेच अभिजात भाषा. कोणत्याही भाषेला अभिजात दर्जा देण्याचा अधिकार केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाला आहे. गृह मंत्रालयाने 2005 मध्ये सांस्कृतिक मंत्रालयाला अधिकार दिले. हा दर्जासाठीचे 4 निकष आहेत. मराठी भाषा ते सर्व निकष पुर्ण करते हे रंगनाथ पठारे समितीच्या 436 पृष्ठांच्या अहवालात सिद्ध केलेले आहे.
अभिजात भाषेसाठी निकष
भाषेचा रेकॉर्ड केलेला इतिहास खूप प्राचीन आहे, म्हणजे ती 1500-2000 वर्षे जुनी आहे.
प्राचीन साहित्य हवं, जे त्या भाषिकांना मौल्यवान वारसा वाटतं.
दुसर्या भाषा समूहाकडून उसनी न घेतलेली अस्सल साहित्यिक परंपरा हवी.
अभिजात भाषा ही आजच्या भाषेपेक्षा निराळी हवी.