उरण : महाराष्ट्रातील सर्व नगरपरिषद,नगरपंचायत, महानगरपालिका मध्ये सन १९७२पासून लाड व पागे समितीच्या शिफारशी नुसार अनुसूचित जातीमधील व इतर समाजामधील एखाद्या सफाई कर्मचाऱ्यांने स्वेच्छा निवृत्ती घेतल्यास, वैद्यकीय अपात्रता किंवा एखादा सफाई कर्मचारी सेवेत असताना मयत झाल्यास त्याच्या वारसांना वारसा हक्काने नियुक्ती देण्याबाबतची तरतूद करण्यात आली आहे. याबाबत नगर विकास विभाग यांनी दिनांक २४/२/२०२३ रोजी सफाई कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने सर्व समावेशक आदेश काढला होता. परंतु मा उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी दिनांक १०/४/२०२३ रोजी दिलेल्या न्यायालयीन निर्णयानुसार दिनांक २४/२/२०२३ रोजीच्या शासन निर्णयास स्थगित दिली होती.औरंगाबाद खंडपीठ हायकोर्टात रिट पिटीशन क्र. ३२०४/२०२३ ने याचिका दाखल झाली. त्यामुळे सर्वच समाजाच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसा हक्काने दिल्या जाणाऱ्या नियुक्तीला स्थगिती दिली होती.
महाराष्ट्र राज्य नगरपरिषद नगरपंचायत व महानगरपालिका कर्मचारी संघर्ष समितीच्या वतीने व महाराष्ट्रातील अनेक संघटनांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसा हक्काबाबतच्या नियुक्ती ची पार्श्वभूमी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर भंगी, वाल्मिकी,मेहतर व अनुसूचित जाती मधील सफाई कर्मचाऱ्यांना वारसा हक्क लागू करता येईल निर्णय दिला होता.परंतु आज ही साळी, माळी, धनगर, मराठा, कोळी, मुस्लिम, रामोशी, वडारी,वंजारी व इतर समाजाचे लाखो सफाई कर्मचारी वारसा हक्क पासून वंचित आहेत यासाठी संघर्ष समितीच्या माध्यमातून न्यायालयीन लढाई चालू होती.
महाराष्ट्र राज्य नगरपरिषद नगरपंचायत कर्मचारी संघर्ष समितीचे ज्येष्ठ कामगार नेते ॲड. सुरेश ठाकूर, अनिल जाधव आणि संतोष पवार हे मा. संभाजी नगर उच्च न्यायालय खंडपीठ (औरंगाबाद खंडपीठ) येथे प्रत्येक तारखेला उपस्थित होते व आजही दिनांक ८ जानेवारी २०२५ रोजी दाव्याचे सरकारी ज्येष्ठ वकील श्री गिरासे तसेच ज्येष्ठ वकील श्री. बाली , विजयकुमार संकपाल यांच्या समवेत उर्वरित राहिलेल्या साफ सफाई करत असलेल्या सर्व जातीच्या सफाई कर्मचाऱ्यांना वारसा हक्काने नियुक्ती मिळावी म्हणून म्हणणे मांडण्यासाठी उपस्थित होते.
औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) खंडपीठ उच्च न्यायालयाचे न्यायाधीश मा.एस जे मेहरे व मा.एस बी ब्रह्मे यांनी आज दिनांक ८ जानेवारी २०२५ रोजी या दाव्याचा अंतिम निकाल दिला असून यापुढे महाराष्ट्रातील जे सफाई कर्मचारी गेल्या अनेक वर्षापासून साफसफाई चे काम करीत आहे अशा सर्वच जातीमधील सफाई कर्मचाऱ्यांना लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार वारसा हक्क लागू असल्याबाबतचा महत्वपूर्ण निर्णय आज दिल्याने राज्यातील गेल्या अनेक दिवसापासून प्रलंबित असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांचा वारसा हक्काचा प्रश्न मार्गी लागला आहे आजच्या या महत्वपूर्ण निर्णयामुळे राज्यातील लाखो सफाई कर्मचाऱ्यांना न्यायालयाने न्याय मिळवून दिला आहे त्याबद्दल महाराष्ट्र राज्य नगर परिषद ,नगरपंचायत कर्मचारी संघर्ष समितीच्या वतीने आभार व्यक्त केले आहेत.
परंतु यात विशेष नमूद करावे असे वाटते की, ऍड.सुरेश ठाकूर यांचे वय ७५ असून सुद्धा महाराष्ट्रातील तमाम सफाई कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती बाबत प्रत्येक तारखांना राहून खंबीरपणे आपली बाजू मांडली होती संघर्ष समितीचे नेते डॉ. डी एल कराड ,अँड.संतोष पवार ,अनिलजी जाधव, अँड .सुनिल वाळूजकर, प्रा . ए.बी.पाटील, भिवाजी वाघमारे,सुभाष कदम,रामदास पगारे यांनी राज्यातील जोपर्यंत महाराष्ट्रातील सर्व सफाई कर्मचाऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत न्यायालीन व संघटना पातळीवर ही लढाई चालू ठेवली होती यामुळेच आज महाराष्ट्रातील सर्व सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना न्याय मिळाला आहे त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम सफाई कर्मचाऱ्यांच्या वतीने व सर्वच संघटनेच्या प्रतिनिधींच्या वतीने वरील सर्व मान्यवरांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे