मुंबई :- राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची (एनईपी) प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. याबाबत महाविद्यालय आणि विद्यापीठांचे एनईपी अंमलबजावणी संदर्भात मूल्यमापन करावे, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी सांगितले.
श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ मुंबई, चर्चगेट येथे आज राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी संदर्भात गठीत केलेल्या सुकाणू समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत मंत्री श्री. पाटील बोलत होते.
या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव वेणूगोपाल रेड्डी,मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.रवींद्र कुलकर्णी, एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा.उज्ज्वला चक्रदेव, उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण संचालक डॉ.विनोद मोहितकर, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राज्य सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉ.नितीन करमळकर, सदस्य अनिल राव व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री. पाटील म्हणाले की, नवीन शैक्षणिक धोरणासंदर्भात विद्यार्थी, पालक आणि प्राध्यापक यांच्यात अधिकाधिक संवाद वाढवावा. ज्या महाविद्यालयामध्ये, विद्यापीठात नवीन शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करत आहेत असे महाविद्यालय आणि विद्यापीठ निवडून त्यांच्या कार्यपद्धतीचा एकत्रित अहवाल तयार करावा. त्यामुळे राज्यातील शैक्षणिक संस्थांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी येणाऱ्या अडचणीवर हा अहवाल मार्गदर्शक ठरेल. तसेच सुकाणू समितीच्या अभ्यास गटाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी संदर्भातील सविस्तर अहवाल शासनाकडे सादर करावा तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाकडून येणाऱ्या सूचना संदर्भात राज्याचा अहवाल तयार करून आयोगाला कळवावे, अशा सूचनाही मंत्री. श्री. पाटील यांनी यावेळी दिल्या.