सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
 जिल्हा

कोथरुडमधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मंत्री तथा आमदार चंद्रकांतदादा पाटील यांचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांना निवेदन

डिजिटल पुणे    05-02-2025 16:22:53

मुंबई – कोथरुड विधानसभा मतदारसंघातील वाढती वाहतूक कोंडी आणि रस्त्यांच्या समस्येवर त्वरित उपाययोजना करण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तथा कोथरुडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन मिसिंग लिंकससाठी आवश्यक निधी देण्यासंदर्भात निवेदन दिले.

मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुणे शहरातील रस्ते विकासामध्ये येणाऱ्या अडथळ्यांविषयी चर्चा करत, वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी निधीची आवश्यकता असल्याचे सांगितले. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे शहरातील रस्ते विकासासाठी आवश्यक तो निधी राज्य सरकारकडून दिला जाईल, अशी ग्वाही दिली.

पुणे महापालिकेच्या माध्यमातून शहरातील ३३ प्रमुख रस्त्यांपैकी १५ प्रमुख रस्त्यांच्या विकासासाठी 'मिशन १५' हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी एकूण ८७० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, कोथरुड मतदारसंघातील रस्ते विकासासाठी ३२५ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. यापैकी १५० कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारकडून अपेक्षित आहे.

पुणे शहराचा वेगाने होत असलेला विस्तार लक्षात घेता, येथील वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण येत आहे. त्यामुळे रस्ते सुधारणा, पुलांचे बांधकाम आणि वाहतूक व्यवस्थापनासंदर्भात ठोस निर्णय घेण्याची गरज आहे. याकरिता राज्य सरकार आणि पुणे महापालिकेच्या संयुक्त प्रयत्नांतून तांत्रिक व प्रशासकीय अडथळे दूर करून विकासकामांना गती देऊन पुणेकरांच्या सोयीसाठी हे काम प्राधान्याने पूर्ण केले जाईल, असे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट केले.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती