नागपूर : राज्यात गुलेन बॅरी सिंड्रोमचे रुग्ण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. पुण्यात जीबीएसने थैमान घातलं असून आत्तापर्यंत 8 जणांचा बळी गेलायजीबीएस सिंड्रोम आजाराचा नागपुरातहीं पहिला बळी गेला आहे. शुक्रवारी रात्री रुग्णालयात या रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. गुइलेनबॅरे सिंड्रोममुळे एका 45 वर्षीय रुग्णाचा शासकीय वैद्यकीय रुग्णलयाच्या आयसीयूमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. नागपुरातील पारडी शिवारात राहणाऱ्या एका व्यक्तीला 11 फेब्रुवारी रोजी आयसीयुमध्ये दाखल करण्यात आलं होतं. रुग्णाच्या दोन्ही हात आणि पायाला लकवा मारला होता. श्वास घ्यायला त्रास होत होता. शिवाय बीपीचा त्रास होता. त्यातचं शुकवारी त्या रुग्णाची प्रकृती बिघडल्यानं त्याचा मृत्यू झाला. दरम्यान आणखी दोन जीबीएसचे बाधित रुग्ण आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत, अशी माहिती रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
गुलेन बॅरी सिंड्रोम या मेंदू विषयक आजाराच्या रुग्ण संख्येने 200 चा टप्पा ओलांडला आहे. राज्यात 13 फेब्रुवारी रोजी जीबीएसची रुग्णसंख्या 203 एवढी होती. पुण्यानंतर कोल्हापूर आणि नागपुरातही जीबीएसच्या रुग्णांची संख्या वाढती असल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. हा आजार संसर्गजन्य नसल्याने नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही असे वारंवार प्रशासन आणि राज्य सरकारकडून सातत्याने सांगितले जात आहे.
गुलेन बॅरी सिंड्रोमची लक्षणे
अचानक हातापायातील त्राण जाणे .अशक्तपणा दुर्बलता किंवा लकवा बसणे
अचानक चालताना अशक्तपणा आणि त्रास उद्भवणे
जास्त दिवसांचा अतिसार (डायरिया ) आणि ताप
नागरिकांनी काय काळजी घ्यावी ?
पिण्याचे पाणी उकळून प्यावे
स्वच्छ व ताजे अन्न खावे
शिजलेले अन्न आणि न शिजलेले कच्चे अन्न एकत्रित ठेवू नये
वैयक्तिक स्वच्छतेवर भर द्यावा
हात किंवा पायामध्ये अचानक वाढत जाणारा अशक्तपणा असल्यास त्वरित जवळच्या महानगरपालिका रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क साधावा
गुलेन बॅरी सिंड्रोम हा आजार काही नवीन नाही. तो अनेक वर्षांपासून ओळखला जात आहे. जरी तो संसर्गजन्य नसला, तरी काही वेळा जीवाणू किंवा विषाणूच्या संसर्गानंतर दिसून येतो. GBS चे इतरही काही संभाव्य कारणे आहेत. हा आजार वर्षभर आढळतो आणि अंदाजे 1 लाख लोकांमध्ये एखादृयाला बाधताे. त्यामुळे मोठ्या शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये दर महिन्याला GBS चे काही रुग्ण उपचारासाठी येतात. GBS च्या सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, कारण वेळीच उपचार झाल्यास रुग्णाला गंभीर अवस्थेत जाण्यापासून वाचवता येऊ शकते.