बीड : पोलिस विभागातील जातीय द्वेष मिटविण्यासाठी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी अनोखी संकल्पना राबत पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांना पहिल्या नावाने ओळखण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.ही संकल्पना प्रत्यक्षात राबवली जात असून बीड जिल्हा पोलीस दलातील प्रत्येक कर्मचारी अधिकारी यांच्या नेमप्लेटवर केवळ पहिले नाव आहे. कर्मचाऱ्याला त्याच्या आडनावाने नाही तर त्याच्या पहिल्या नावाने बोलावले जावे. असा प्रयत्न पोलीस अधीक्षकांचा आहे.
खाकी परिधान केल्यावर कोणताही भेदभाव नसतो. कायद्याप्रमाणेच पोलिसांना काम करावे लागते. मात्र अधिकारी कर्मचाऱ्यांचे आडनाव पाहून अनेकांना प्रश्न पडतो ते आमचे काम करणार की नाही. त्यामुळे ही सुरुवात करण्यात आली. आडनाव वगळून केवळ पहिले नावाने ओळखले जाणार आहे.
नावासंदर्भात असा आहे आदेश
कोणत्याही पोलिस कर्मचाऱ्याला त्याच्या आडनावाने हाक मारली जाणार नाही. फक्त पहिल्या नावानेच संबोधन केले जाईल. या निर्णयामुळे समाजातील विविध गटांमध्ये एकात्मता वाढण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या निर्णयानुसार, पोलिस कर्मचाऱ्यांच्या नेमप्लेट्स, ओळखपत्रे आणि इतर ठिकाणीही फक्त पहिले नाव दिसेल, आडनाव दर्शवले जाणार नाही, असे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी दिले आहेत.
आडनावाच्या उच्चारावरुन कसे बोलायचे ते ठरते
अनेकदा आडनावाच्या उच्चारावरुन जात समजते. त्यामुळे आडनावाने नाही तर नावाने हाक मारण्याची प्रथा त्यांनी सुरु केली. पुढे कार्यालयीन परिपत्रके, पत्र देखील एकेरी नावानेच निघण्याची सुरुवात झाली. आता या कडीत अगदी पोलिस अधीक्षकांपासून, पोलिस कॉन्स्टेबलपर्यंत सर्वांच्या छातीवर असणाऱ्या आणि पट्टचाही बदलण्यात आल्या आहेत, असे पोलीस अधीक्षक नवनीत कॉंवत यांनी सांगितले.
बीडमधील जातीय संघर्ष
बीड जिल्ह्यातील जातीय संघर्ष हा अनेक वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय घडामोडींमध्ये महत्त्वाचा मुद्दा राहिला आहे. महाराष्ट्रातील इतर भागांप्रमाणेच, बीडमध्येही जातीव्यवस्थेचे प्रभाव जाणवतात, आणि कधी कधी त्यातून तणाव निर्माण होतो. बीड जिल्हा सामाजिकदृष्ट्या विविध समुदायांनी समृद्ध असला तरी, काही घटनांमुळे येथे जातीय तणाव वाढल्याचे दिसून आले आहे. ग्रामीण भागात जमिनीच्या मालकीचे प्रश्न, राजकीय सत्तासंघर्ष आणि सामाजिक सन्मानाशी संबंधित वाद जातीय संघर्षाचे मुख्य कारण ठरले आहेत.
काही गावांमध्ये सामाजिक बहिष्कार किंवा अत्याचाराच्या घटना नोंदवल्या आल्य. या घटनांमुळे अनेकदा बीडमध्ये जातीय हिंसाचारासाठी कारणीभूत ठरल्या. निवडणुकीच्या काळात जातीआधारित राजकारणामुळे बीडमध्ये दोन समाजातील तणाव वाढीच्या घटनाही समोर आल्या. राजकीय पक्षांकडून जातीय समीकरणांचा वापर करून ठराविक समाजातील मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जातो. पोलिस आणि स्थानिक प्रशासन वेळोवेळी मध्यस्थी करून जातीय तणाव कमी करण्याचा प्रयत्न करतात. त्याचाच एक भाग म्हणून, बीड पोलिसांनी आडनाव नसलेल्या नेमप्लेट्सचा निर्णय घेतला आहे.