बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरी लग्नसोहळा पार पडणार आहे. अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार हे लग्नबंधनामध्ये अडकणार आहेत. येत्या 10 एप्रिल रोजी जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा साखरपुडा पार पडणार आहे. सोशल मीडिया कंपनी सांभाळणारे प्रवीण पाटील यांची मुलगी ऋतुजा पाटील हिच्यासोबत जय पवार यांचं लग्न पार पडणार आहे. यापूर्वी त्यांनी आजोबा शरद पवार यांची निवासस्थानी जाऊन भेट घेत आशिर्वाद घेतले आहेत.
साखरपुडा होण्याआधी जय पवार आणि ऋतुजा पाटील हे मोदीबागेमध्ये आले होते. मोदीबागेतील घरी दोघांनी आजोबा शरद पवारांची भेट घेऊन आशीर्वाद घेतला. जय पवार आणि ऋतुजा पाटील यांनी शरद पवारांना साखरपुड्याचं आमंत्रण दिलं. पवारांचे पुत्र जय पवार यांनी काल (13 मार्च) शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांचीदेखील भेट घेतली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील भेट घेतली. पवार कुटुंबियांच्या या भेटीचे फोटो सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर शेअर केले. दरम्यान, जय पवार यांच्या साखरपुड्याच्या निमित्ताने अजित पवार आणि शरद पवार आणि संपूर्ण पवार कुटुंब एकत्र येणार आहे. त्यामुळे कौटुंबिक सोहळ्यासह राजकीय वर्तुळातून देखील या सोहळ्याकडे सर्वांची नजर लागली आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर याबाबत पोस्ट करुन माहिती दिली आहे. तसेच जय पवार आणि ऋतुजा पाटील यांना आशिर्वाद आणि शुभेच्छा देखील दिल्या आहेत. जय पवार यांच्या होणाऱ्या पत्नी पवार कुटुबांच्या भावी सूनबाई ऋतुजा पाटील या सोशल मीडिया कंपनी सांभाळणारे साताऱ्यातील फलटणचे प्रविण पाटील यांच्या कन्या आहेत. ऋतुजा पाटील या उच्चशिक्षित आहेत. जय पवार आणि ऋतुजा पाटील यांची मागील काही वर्षांपासून ओळख आहे.