उरण : माझा गाव माझा अभिमान आणि माझी शाळा या संकल्पनेतून गेली अनेक वर्ष शाळा आणि शालेय विद्यार्थी यांच्यासाठी शैक्षणिक साहित्य, शाळा गणवेश, पिटी ड्रेस, खाऊ वाटप, शैक्षणिक चित्र रंगरंगोटी असे नवनविन उपक्रम राबविणाऱ्या गोवठणे विकास मंच आणि वंदे मातरम् सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने रा.जि.प. प्राथमिक शाळा गोवठणे शाळेच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल शिवसमर्थ स्मारक आणि रामबाग येथे आयोजित केली होती.शाळेतून सहल निघताना वंदे मातरम् सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सूरज म्हात्रे यांच्या सौभाग्यवती तथा उरण तालुका भाजपच्या महिला अध्यक्षा ॲड.राणीताई सूरज म्हात्रे यांनी मुलांना सहलीसाठी शुभेच्छा दिल्या.
तर गोवठणे विकास मंच अध्यक्ष सुनिल वर्तक, उपाध्यक्ष अनंत वर्तक, कार्याध्यक्ष संतोष म्हात्रे, सचिव प्रेम म्हात्रे, खजिनदार संदीप पाटील आणि सहसचिव प्रदीप वर्तक तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना म्हात्रे आणि सहशिक्षक अजित जोशी हे स्वतः सहल निघण्यापासून ते विद्यार्थी घरी येईपर्यंत विद्यार्थ्यांची काळजी घेण्यास सहली समवेत होते. शिव समर्थ स्मारकात गेल्यानंतर तेथील गाईड प्रशांत म्हात्रे यांनी सर्व विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती अनेक सरदार,शस्त्रे त्याच बरोबर स्मारकात असलेल्या विविध नेत्यांच्या आणि समाजसुधारकांच्या पुतळ्यांची ओळख आणि त्यांचे कार्य विषद केले.स्मारकातील मिनी थिएटर मध्ये बसून तानाजी चित्रपटातील एक गीत आणि छत्रपतींचे अनेक युद्ध प्रसंग पाहून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वहात होता.विद्यार्थी आणि आयोजकांतर्फे गाईड चे आभार मानून शीतपेय घेतल्यानंतर सहलिचे प्रस्थान रामबाग येथे झाले.
रामबाग मध्ये गेल्यागेल्या मुलांनी मांसाहारी भोजनाचा आस्वाद घेतल्यानंतर ताबडतोब रंगीबिरंगी विद्युत रोषणाई असलेल्या रामबागेतील उसळताना प्रकाशमान होणारे रंगीबिरंगी कारंजे, पाळणे, घसरगुंडी सारख्या सर्व प्रकारच्या खेळण्यामधून मनसोक्त आनंद घेतला.विद्युत रोषणाईमुळे चमकणारी झाडे पाने फुले या सर्वांनी मुळे इतकी खुश होती की, अगदी घरी यावयास तयार नव्हती. शेवटी रात्री बाग बंद होण्याच्या वेळेस. मुलांनी घरी येण्यास काढता पाय घेतला.गोवठणे विकास मंचचे अध्यक्ष सुनिल वर्तक यांनी सहलीस मंजुरी देणाऱ्या शालेय शिक्षक तथा शाळा व्यवस्थापन समिती चे आभार मानून परतीच्या प्रवासानंतर सहलीचा समारोप केला. गाव आणि मित्र परिवार तथा अनेक सामाजिक संस्थांकडून प्रेम म्हात्रे यांनी सहलीचे केलेले यू ट्यूब प्रक्षेपण पाहून सहलीचा उपक्रम राबविणाऱ्या गोवठणे विकास मंच आणि वंदे मातरम् सामाजिक संस्था या दोन्ही मंडळांचे कौतुक करून धन्यवाद देत आहेत.