सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • वारी काळात एसटी ला १ कोटीचा फायदा
  • शरद पवार घेणार अकरा दिवसात 42 सभा
  • गद्दारी करणाऱ्यांना आधी लाज वाटायची आता नाही : राज ठाकरे
  पर्यटन

जागतीक पर्यटन दिन विशेष पहिला लेख लातूरची प्राथमिक ओळख करून देणारा

MSK    26-09-2021 21:54:03

जागतिक पर्यटन दिन विशेष

लातूर जिल्ह्यात काय बघायला आहे हो? या प्रश्नाचे उत्तर २७ सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिनापासून आम्ही लातूर जिल्ह्याची ओळख करून देणाऱ्या इतिहासाच्या पानातून करून देणार आहोत. फार लांब लचक नसेल थोडक्यात ओळख असेल, आठवड्यातून एकदा क्रमशः दिली जाईल..

हा पहिला लेख… लातूरची प्राथमिक ओळख करून देणारा…!!

महाराष्ट्र राज्याच्या मराठवाड्यातील एक जिल्हा. त्याचा विस्तार १८° ०५’ उत्तर ते १९° १५’ उत्तर अक्षांश आणि ७६° २५’ पूर्व ते ७७° ३५’ पूर्व रेखांशां दरम्यान आहे. क्षेत्रफळ ७,३७२ चौ. किमी. असून त्याची पूर्व – पश्चिम लांबी सु. ११२ किमी. व उत्तर दक्षिण रूंदी ११३ किमी. आहे.

लातूर, औसा, निलंगा, रेणापूर, चाकूर, देवणी, जळकोट, शिरूर, अनंतपाळ, अहमदपूर आणि उदगीर असे दहा तालुके आहेत. प्रत्येक तालुक्याला स्वतःची ऐतिहासिक ओळख आहे. काही ओळखी तर प्रचंड प्राचीन आहेत.

आजच्या घडीला लातूर जिल्ह्यातील तालुका असलेले उदगीर कर्नाटक राज्याच्या हद्दीला लागून असलेलं आपल्या राज्याचे शेवटचे टोक… याच शहरात बहामनी पूर्व एक महत्त्वाचा किल्ला आहे… मराठ्यांच्या साम्राज्य विस्ताराच्या वेळी निजामाच्या ताब्यात असलेला.. या किल्‍ल्यावर ज्या इब्राहिमखान गारदीची (जगातल्या जहाल सैन्यात गणले गेलेले गारद्यांच्या सैन्याचा सेना नायक) सत्ता होती. तिथूनचं सदाशिव राव भाऊ यांच्या नेतृत्वातील सैन्याने दिल्लीच्या तख्ताला आव्हानाची लढाई सुरु केली… अशा जहाल सैन्यावर हल्ला करून उदगीरचा किल्ला फत्तेह केला… या लढाई मागचा मुख्य बेत हे गारद्याचे सैन्य मिळवणे होते..  त्याप्रमाणे उदगीर करार झाला…  याच सैन्याच्या बळावर दौलताबाद घेतलं..  पुढे पानिपतच्या युद्धात शेवट पर्यंत चिवट लढा याच गारद्याच्या तुकडीने देऊन सदाशिव भाऊ युद्ध भूमीवर धारातीर्थी पडेपर्यंत यांची धड लढत होती.

निलंगा तालुक्यातील खरोसा येथे ज्या लेणी आहेत. त्याचा इतिहासही प्राचीन आहे.

खरोसा लेण्यांचे तत्कालीन राजकीय स्थान बघितले तर गुलबर्गा जिल्ह्याच्या सीमेवर येते… राष्ट्रकूटाची राजधानी मान्यखेत इथून 170 किलोमीटर आहे… राष्ट्रकूटाचे मूळ गाव लातूर आहे (लत्तलूर) राष्ट्रकूट राजवंश नरेश कृष्णा या राजांनी वेरूळची एक नंबरची कैलास लेणीही कोरल्याचा उल्लेख नागपूरच्या म्युझियम मध्ये आहे. (हा संबंध लातूरशी असल्यामुळे उल्लेख त्यावर सविस्तर लिहूच.) त्यामुळे तत्कालीन काळात या लेण्याचे स्थान अनन्यसाधारण असेच असावे… इथल्या मुख्यलेणीत मात्र रामायणातील दृश्य कोरले आहेत… एका ठिकाणी हिरण्यकशिपुचे नरसिंह रूपातील विष्णुने पोट फाडल्याचे शिल्प आहे… वेरूळच्या कैलास लेण्यातील शिल्पाच्या  रिपलिका वाटाव्यात एवढे साम्य यात आहे.. वेरूळच्या तिथे काळा पाषाण असल्यामुळे झिज झाली नाही इथे मात्र कमालीची झिज झाली आहे.

या लेण्याचा उद्देश शिक्षण देणं असावं आणि इथे छोट्या गुंफा आहेत कदाचित त्या विद्यार्जन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असाव्यात….कागदोपत्री याचे फारसे काही पुरावे नाहीत पण डॉ.दाऊद दळवी यांच्या लेण्याच्या इतिहासातील पुस्तकात या लेण्यांचा उल्लेख आहे.

उदगीरचा किल्ला आणि खारोसा लेण्या या दोन स्थानांचे महात्मे तर राष्ट्रीय स्तरावर अभ्यासले गेले आहे. अजून यावर अभ्यास सुरु आहे.

आज ही जिल्ह्याची मोठी ओळख, उद्या पासून छोट्यातली छोटी ओळख क्रमशः देऊ…!!

 

@युवराज पाटील

जिल्हा माहिती अधिकारी, लातूर


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती