उजनी : उजनी धरण हे सोलापूर जिल्ह्यातल्या भीमानगर (ता.माढा) या गावाजवळ आहे. या धरणाचे पाणी पुढे कर्नाटक राज्यामध्ये कृष्णा नदीला जाऊन मिळते. उजनी हे महाराष्ट्रातील जायकवाडी धरणानंतर सर्वात मोठे धरण आहे. सोलापूर, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातील अर्थकारण व राजकारण यावर अवलंबून आहे. उजनी धरणाच्या माध्यमातून सुमारे २५००० कोटी रूपयाची उलाढाल होते. पर्यटनाच्या बाबतीत महत्त्वाचे वैशिष्ट्ये म्हणजे येथे दरवर्षी आवर्जून येणारे देश-विदेशी हजारो पक्षी. यामुळे उजनी बॅकवाॅटर जलाशय हा पाणपक्ष्यांसाठी देशात प्रसिद्ध पावत आहे. ज्या गावाविषयी अनेकांना माहिती नाही.अशाच एका बेटावरील गावाबद्दल आज तुम्हाला माहिती सांगणार आहे
● कुगाव एक निसर्गरम्य बेट
उजनी पाणलोट क्षेत्रात सोलापूर जिल्ह्यातील ज्या गावांना विस्थापित व्हावे लागले. त्यापैकीच एक गाव म्हणजे करमाळा तालुक्यातील कुगाव. दोन हजार लोकसंख्या असलेल्या या गावाचा मोठा इतिहास आहे. हनुमानाची जन्मभूमी म्हणून कुगावची ओळख आहे. याबाबतचा 'भीममहात्म्य' या पौराणिक ग्रंथातील ३३ व्या अध्यायात उल्लेख आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजीराजे यांनी कुगाव येथे भूईकोट किल्ला बांधला आहे. सध्या या ठिकाणीला उजनी धरणाच्या निर्मितीनंतर जलसमाधी लाभली आहे. धरणातील पाणी उथळ असताना हा किल्ला उघडा पाडतो. भारतातीतील हनुमान भक्त, शिवप्रेमी व पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात. नागराज मुंजळे यांच्या सैराट चित्रपटातील काही प्रसंगाचे चित्रिकरण या ठिकाणी करण्यात आले आहे. संपूर्ण गावाला भीमा नदीच्या पात्राने तिन्ही बाजूने वेढा घातला आहे. त्यामुळे हा परिसर बेटासारखा भासतो. या ठिकाणी जमीन मार्गाने येण्यासाठी एकच मार्ग (प्रजिमा ११) आहे; हा मार्ग ही तितकासा सोपा नाही. त्यासाठी स्थानिक गावकरी, हनुमान भक्तांना व प्रवाशांना सुमारे १२० किलोमीटरचा वळसा घालून यावे लागते. तर उर्वरित चार मार्ग पुणे जिल्ह्यातील कळाशी, गंगावळण, कालठण व शिरसोडी गावातून पाण्यामार्गे येणारे आहेत. हा मार्ग सोपा होण्यासाठी कळाशी (ता.इंदापूर)ते कुगावपर्यंत पुल तयार झाला तर मराठवाड्याला जोडणारा हा जवळचा मार्ग होणार आहे. उजनी बॅकवाॅटर परिसरातील पर्यटन विकासाला मोठी चालना मिळू शकेल.
● पौराणिक इतिहास
कुगाव गावचा भीमामहात्म्य या पौराणिक ग्रंथातील अध्याय ३३ मधील पौराणिक संदर्भ श्रीराम दूत हनुमानाचा जन्म #hanumanbirthplace याच परिसरात झाल्याची नोंद आहे व या ठिकाणी पौराणिक काळापासून हनुमान जन्माचा उत्सव मोठ्या प्रमाणात चैत्र पौर्णिमेच्या आदल्या दिवशी साजरा केला जातो. या ठिकाणी हनुमानाच्या दर्शनासाठी भारतातून मोठ्या संख्येने हनुमान भक्त व पर्यटक येत असतात.
● गावाचे दळणवळण
कुगाव गावात येण्यासाठी जमीनीवरील एकच भुमार्ग आहे तोही प्रचंड खराब आहे हा मार्ग प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक ११ या नावाने ओळखला जातो या ठिकाणी हनुमान भक्तांना येण्यासाठी नाहक १२० किलोमीटर चा वळसा घालून यावे लागते. ही बाब ओळखून तत्कालीन मुख्यमंत्री मा श्री शरदचंद्र पवार साहेब यांनी १ एप्रिल १९९३ रोजीच्या राजपत्राने हनुमान जन्मभूमी कुगाव येथे येण्यासाठी पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातून चार जलमार्ग मंजूर करून दिले आहेत परंतु राज्य शासनाने कोणत्याही सोयी सुविधा आजपर्यत पुरवल्या नाहीत परंतु ही गैरसोय दूर व्हावी यासाठी कुगाव मधील बेरोजगार युवकांनी शिरसोडी ते कुगाव, कालठण ते कुगाव, कळाशी ते कुगाव व गंगावळण ते कोकरे आयलॅन्ड कुगाव मार्गावरून जलवाहतूक चालू करणेबाबत पुढाकार घेतला आहे. आता या हनुमान जन्मभूमी येथून कळाशी दरम्यान उजनीतून पुल करावी ही १९७८ ला उजनी धरण भरण्यास सुरवात झाली तेव्हापासून ची प्रलंबित पूलाची मागणी पुढे येत आहे व याबाबत ग्रामसभेत ठराव मंजूर करण्यात आला आहे
● नयनरम्य दृश्य
हिवाळ्याची चाहूल लागताच उजनी जलाशयावर हजारो किलोमीटरचा प्रवास करून फ्लेमिंगोसह विविध प्रजातींच्या पक्ष्यांनी हजेरी लावण्यास सुरुवात होते. कुंभारगाव, डिकसळ,भादलवाडी, डाळज, पळसदेव, गंगावळण,आगोती, कुगाव, भिगवण या उजनीच्या पाणलोट क्षेत्रात पक्ष्यांचे थवेच्या थवे दिसू लागतात. त्यानंतर पर्यटकांची पावले उजनी पाणलोट क्षेत्राकडे वळू लागतात. पक्ष्यांचे आगमन हे पर्यटक,पक्षी अभ्यासक आणि पक्षीप्रेमीसाठी पर्वणीच ठरते.कुगाव गावचा पर्यटनाच्या माध्यमातून विकास व्हावा यासाठी पुढाकार घेतलेल्या तत्कालीन सरपंच तेजस्विनी कोकरे सांगतात, " पर्यटकांना जलविहार करता यावे, यासाठी नौका विहारची सोय करण्यात आली आहे. जलाशयावर विहार करणारे फ्लेमिंगो (रोहित-अग्निपंख), पेंटेड स्टॉर्क (चित्रबलाक-रंगीत करकोचा), ग्रे हेरॉन (राखी बगळा), ग्रेट इग्रेट (मोर बगळा), कॉमन कूट (चांदवा), ब्लॅक हेडेड आयबिस (काळ्या डोक्याचा शराटी), ब्राऊन हेडेड गल (तपकिरी डोक्याचा कुरव), ब्लॅक हेडेड गल (काळ्या डोक्याचा कुरव), एशियन ओपनबिल (मुग्धबलाक), पर्पल स्वॅम्पहेन (जांभळी पाणकोंबडी) पर्पल हेरॉन (जांभळा करकोचा), लिटल कॉर्मोरंट (छोटा पाणकावळा), ग्रेट कॉर्मोरंट (मोठा पाणकावळा), रुडी शेल्डक (चक्रवाक), नॉर्दर्न शॉवेलर थापट्या), युरोपिअन स्पूनबिल (चमचा) यांसारखे अनेक प्रकारचे पक्षी आणि पक्ष्यांचे दर्शन होते. त्यासोबतच मच्छिमारांच्या होड्या, मासळीचे खमंग जेवण आणि सुर्योदय आणि सुर्यास्ताचे मनमोहक दृश्यही या ठिकाणावरून बघता येते. जलाशयात भरपूर खाद्य उपलब्ध असल्यानं पक्ष्यांसाठी ही पर्वणीच असते. तिन्ही ऋतूमध्ये नितांत सुंदर अनुभव येतोच; पण येथे दडलेल्या जैवविविधता व निसर्ग नवलांमुळे पर्यटकांची मजा द्विगुणित होते."
● कुगावचा किल्ला
निजामाच्या दरबारात सरदार असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांनी या ठिकाणी भीमा नदीच्या काठी सैनिकांना रसद पोहेच व्हावी म्हणून भुईकोट किल्ला बांधला होता हा किल्ला १८९३ साली इनामात यशवंत मेघश्याम यांना त्यांची आई रमाबाई यांच्या नावे दिला हा पुढे उजनी धरण झाल्यावर १९७८ साली पाण्यात समावून गेला व त्याचे जलदुर्ग किल्ल्यात रूपांतर झाले हा किल्ला उजनी बॅकवाॅटर परिसरातील पाणी उथळ असताना उघडा पडतो त्यावेळी महाराष्ट्रातील शिवप्रेमी व पर्यटक मोठ्या संख्येने या ठिकाणी भेटी देतात हा किल्ला सध्या इनामदार वाडा नावाने ओळखला जातो
● कुगाव गावची वैशिष्ट्ये
१ ) हनुमान जन्मभूमी
२) तिन्ही बाजूंनी उजनी बॅकवाॅटर
३) बोटिंगची सुविधा पक्षी पाहण्याची संधी
४) कोकरे आयलॅन्ड कुगाव ला शालेय सहलीची शासकीय परवानगी
५) शिवार फेरी, प्रत्यक्ष शेतीची प्रात्यक्षिके.
६) राहण्याची सोय
७) स्थानिक भोजनाची सोय
८) फिशींग करण्याची संधी
९) शेतात काम करण्याची संधी
१०) जलदिंडी च्या विसाव्याचे ठिकाण
११) भुईकोट किल्ला सध्या इनामदार वाडा नावाने ओळखला जातो
१२) चित्रपट चित्रीकरणाचे पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाचे ठिकाण
१३) उस व केळीचे आगार
_समस्त ग्रामस्थ व ग्रामपंचायत कुगाव ता करमाळा जि सोलापूर