सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • वारी काळात एसटी ला १ कोटीचा फायदा
  • शरद पवार घेणार अकरा दिवसात 42 सभा
  • गद्दारी करणाऱ्यांना आधी लाज वाटायची आता नाही : राज ठाकरे
 शहर

'कला साधना' चित्र- शिल्प प्रदर्शनाचे उदघाटन ; 'अभिज्ञानशाकुंतलम' वरील चित्रमालिका पाहण्याची संधी !

डिजिटल पुणे    21-11-2024 10:12:06

पुणे : ज्येष्ठ शिल्पकार,चित्रकार आणि अभिनव कला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य  दिनकर शंकर थोपटे हे वयाच्या ८५ व्या वर्षात पदार्पण करीत असल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी आणि  शिष्यपरिवाराने आयोजित केलेल्या 'कला साधना'  या चित्र-शिल्प प्रदर्शनाचे उदघाटन ज्येष्ठ समाजसेवक गिरीश प्रभुणे यांच्याहस्ते, ज्येष्ठ  लेखक,वात्रटिकाकार रामदास फुटाणे,ज्येष्ठ इतिहास संशोधक  पांडुरंग बलकवडे,पंकज भांबुरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

 हा कार्यक्रम आणि थोपटे यांच्यावरील 'शिल्प साधना' या पुस्तकाचे प्रकाशन समारंभही उदघाटनाच्या दिवशी २०नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता पार पडला.हे चित्र- शिल्प प्रदर्शन घोले रस्त्यावरील राजा रविवर्मा कलादालनात आयोजित करण्यात आले आहे.हे प्रदर्शन बुधवार दि. २० नोव्हेंबर ते रविवार दि.२४ नोव्हेंबर २०२४ दरम्यान सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत सर्वांसाठी खुले राहील.

या प्रदर्शनात महाकवी कालिदासांच्या ग्रंथ साहित्यावरील पेंटिंग्जचे चित्र प्रदर्शन तसेच थोपटे यांच्या अद्वितीय अशा शिल्पकलाकृतीही या प्रदर्शनात सर्वांना पाहता येतील. या चित्रप्रदर्शनात महाकवी कालिदासांच्या ग्रंथ साहित्यावर आधारित 'अभिज्ञानशाकुंतलम' या  नाटकातील  वर्णन थोपटे यांनी आपल्या चित्रमालिकेत साकारले आहे. या ग्रंथावरील निसर्गवर्णन, कथात्मक भाग चित्रात साकारण्यासाठी सरांनी काव्यात्मक ग्रंथाचे वाचन तसेच काही उपलब्ध भाषांतरीत पुस्तकांचा  आधार घेतला आहे.

उदघाटन समारंभा नंतर पंकज भांबुरकर यांनी 'कालिदासिय साहित्य आणि दृश्यकला' या विषयावर भाष्य केले . श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट तर्फे थोपटे यांचा सत्कार  करण्यात आला .क्षितिज प्रकाशनाद्वारे सुरेखा थोपटे यांनी  'शिल्पसाधना' या  पुस्तकानिर्मिती केली असून स्वाती जरांडे यांनी या पुस्तकाचे शब्दांकन केले आहे.

या प्रदर्शनाच्या ,कार्यक्रमाच्या  संयोजन समितीच्या वतीने   शिल्पकार दीपक थोपटे, संतोष पवार, बापू झांजे, विभूषण झांजे, देवदत्त बलकवडे, विशाल काळे,चेतन भोसले, स्वाती जरांडे, कनिष्का थोपटे आणि सुरेंद्र कुडपणे यांनी स्वागत केले.प्रसाद भारदे, सौ.अनिता देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.बापू झांजे यांनी आभार मानले.

जयप्रकाश जगताप, प्रा. पवार,मंगेश जेजुरीकर,डॉ. प्रसाद खंडागळे, विवेक खटावकर,शिवराज कदम -जहागीरदार,माधुरी कासट,परेश गरुड,राजेंद्र बलकवडे,राजीव अगरवाल,सदानंद जेजुरीकर,कैलास सोनटक्के,राजेंद्र थोपटे, प्रा.टाक, ज्ञानेश्वर मोळक उपस्थित होते.

अध्यक्षस्थानावरून बोलताना ज्येष्ठ समाजसेवक गिरीश प्रभुणे म्हणाले,' आयुष्यभर कलेची साधना करणाऱ्या कलाकाराचा हा गौरव आहे.भारतीय परंपरेचा गौरव त्यांनी कलेतून केला आहे.अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी घडवले. खेडयापाड्यातून कलाकार उभी राहात आहे. पिढी उभी राहात आहे,ही प्रेरणादायक बाब आहे. गुरुकुल परंपरा चालवून ३ पिढ्यांना त्यांनी प्रेरणा दिली.कलेचे दारिद्रय दुर करण्याचे प्रयत्न केले. महाराष्ट्राचा कलेचा इतिहास पुढे आणण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन करावे.'

यावेळी बोलताना रामदास फुटाणे म्हणाले,' समाजात राजकारण्यांचे, सिनेकलाकारांचे कौतुक होते.पण,शिल्पकार, चित्रकारांचे कौतुक होत नाही.या तपस्वी व्यक्तिमत्वाला पद्मश्री मिळाली नाही,याची खंत आहे. पुतळा उभारणीत पैसे खाल्ले जातात,यावरून महाराष्ट्र कोठे चालला आहे,याची कल्पना येते.पांडुरंग बलकवडे यांनीही मनोगत व्यक्त केले.

सकाराला उत्तर देताना प्रा.दिनकर थोपटे म्हणाले,'कलाकाराला शिकताना प्रारंभी घरून फार पाठिंबा नसतो. हा प्रवास खडतर आहे.कलेत जे काम केले, त्याचा आदर म्हणून हा सत्कार झाला, त्याबद्दल मी आभारी आहे.'

कलेतील विद्यार्थी घडविणारे श्रेष्ठ शिल्पकार :दिनकर थोपटे

 अभिनव कला महाविद्यालयात प्राचार्य पदावर कार्यरत असताना त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक शिल्पकार, चित्रकार घडले .1997 ते 2000 पर्यंत अभिनव कला महाविद्यालय टिळक रोड पुणे येथे प्राचार्य पदावर कार्यरत होते.फायबर ग्लास माध्यमात सर्जनशील शिल्प घडविणाऱ्या थोपटे यांनी  शिवाजी महाराजांवरील अनेक शिल्प साकारली.अकलूजच्या शिवसृष्टी पासून सुरुवात करीत त्यांनी अनेक ठिकाणी शिवसृष्टी साकारल्या.भारतभरातील अनेक प्रकल्प ते अमेरिकेतील गीता मंदिरातील शिल्पकृती त्यांनी साकारल्या आहेत. त्यांचे भारतीय परंपरेतील स्री निगडित शिल्प अप्रतिम असेच म्हणता येईल. संत मीराबाई हे त्यांचे अधिक आवडतं आणि लोकप्रिय ठरलेलं  शिल्प.नव्या ढंगातील आधुनिक स्त्री  शिल्प,समूह शिल्प ही त्यांच्या शिल्पकलेतील अद्भुत अशीच रचना आहे.फायबर ग्लास माध्यमातून शिल्प साकारत त्या माध्यमातून त्यांनी अनेक प्रयोग केले .त्यांची सर्व शिल्प वास्तववादाशी निगडित असली तरी त्याला एक नववास्तववादाची  जोड त्यांनी दिली आहे.

शिल्पकार दिनकर थोपटे यांना चित्रशिल्पकलेतील राज्य पातळीवरील अनेक पुरस्कार मिळाले.  1996 मध्ये त्यांच्या प्रवासी शिल्पाला ललित कला अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार त्यांना प्राप्त झाला .तसेच 2011 मध्ये राज्यातील  श्रेष्ठ शिल्पकार म्हणून त्यांना गौरविण्यात आले. 


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती