पुणे : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयात संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला यशदामधील प्रशिक्षक डॉ. बबन जोगदंड यांचे 'भारतीय संविधान समकालीन प्रस्तुतता' या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नितीन घोरपडे होते.
संविधानामुळे सर्वसामान्य माणसाला अभिव्यक्ती, संचार, धार्मिक स्वातंत्र्य मिळाले. धर्मनिरपेक्षता हे आपल्या संविधानाचे वैशिष्ट्य आहे. सर्वसमावेशकता हे भारतीय संविधानाचे वैशिष्ट्य असून त्याचे काळानुरूप संशोधन करण्याची तरतूद आहे. संविधान कितीही चांगले असले तरी ते राबविणाऱ्या लोकांवर त्याचे चांगुलपणा अवलंबून आहे. संविधानाने दिलेली मूल्ये आत्मसात करून या देशाचा चांगला नागरिक बनले पाहिजे. असे प्रतिपादन यशदामधील प्रशिक्षक डॉ. बबन जोगदंड यांनी केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक समता, न्याय, बंधुता यासह सामान्य नागरिक हाच राज्यघटनेचा केंद्रबिंदू मानला असून प्रास्ताविकातील "आम्ही भारताचे लोक..." या वाक्यातील 'आम्ही' या शब्दाला विशेष महत्त्व असल्याचे सांगितले.
याप्रसंगी उपप्राचार्य प्रा. विलास शिंदे, प्रा. अनिल जगताप, डॉ. नाना झगडे, डॉ. दत्तात्रय संकपाळ, प्रा. भाऊसाहेब भोसले, प्रा. शीतल कापरे, डॉ. पंतोजी शेळके, प्रा. प्रवीण वायदंडे आदी उपस्थित होते.कार्यक्रमच्या सुरुवातीला संविधानाच्या उद्देशिकेचे जयश्री अकोलकर यांनी समूह वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मंजुषा भोसले यांनी केले तर आभार प्रा. विलास शिंदे यांनी मानले.