पुणे : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सांगवी येथील बाबुरावजी घोलप महाविद्यालयामध्ये ७७ वा भारतीय संविधान दिन विविध उपक्रमांचे आयोजन करत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाच्या वतीने द युनिक अकॅडमी पुणेचे डॉ. महेश शिरापूरकर यांच्या 'भारतीय संविधान - समकालीन प्रस्तुतता' या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन समिती सदस्या व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संगीता जगताप यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालय विकास समिती सदस्य प्रा.विजय घारे, कला शाखा समन्वयक डॉ.अर्जुन डोके, राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. भरत राठोड, समन्वयक डॉ. गोरक्षा डेरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते संविधान प्रतिमेचे पूजन करत २००८ मध्ये संविधान दिनाच्या दिवशीच भारताची आर्थिक राजधानी मुंबईवर झालेल्या आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी प्रथम वर्ष राज्यशास्त्र विभागाचा विद्यार्थी प्रणय माने याने संविधानाचे वाचन करून उपस्थितांना संविधान शपथ दिली.'भारतीय संविधान - समकालीन प्रस्तुतता' या विषयावर सविस्तर विवेचन करताना डॉ. महेश शिरापुरकर यांनी भारतीय संविधानाची उपयुक्तता व योगदान स्पष्ट करत भारतीय संविधान हे समाज व राज्य व्यवस्थेसाठी एक जिवंत प्रक्रिया असल्याचे नमूद केले. तसेच भारतीय संविधानातील महत्वाच्या घटकांचे विश्लेषण करत निवडणूक आयोग व वित्त आयोगासारख्या घटनात्मक यंत्रणांचा आढावा घेतला.
आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये प्राचार्या डॉ. संगीता जगताप यांनी २६ जानेवारी १९५० रोजी जेव्हा भारतीय संविधानाची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली तेव्हापासूनच भारतीय महिलांना स्वातंत्र्य, समता, न्याय व हक्क देणारे भारतीय संविधान हे जगातील पहिले संविधान असल्याकडे लक्ष वेधले.यावेळी प्रथम वर्ष राज्यशास्त्र विभागाचा विद्यार्थी गिरीश वाघमारे याने आपले मनोगत व्यक्त करत भारतीय संविधान हे भारतीय नागरिकांना सामाजिक व राजकीय जीवनातील दिशादर्शक असल्याचे सांगितले.
महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये आयोजित या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. भरत राठोड, सूत्रसंचालन डॉ. गोरक्षा डेरे तर आभार प्रदर्शन प्रा. प्राजक्ता कुंभार यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयातील सुमारे १२० पेक्षा जास्त विद्यार्थी उपस्थित होते. यशस्वितेसाठी डॉ. सुवर्णा खोडदे, डॉ. जितेंद्र वडशिंगकर, डॉ. विजय बालघरे, डॉ. विद्या पाठारे, प्रा. तुषार भुसे, प्रणित पावले यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले असून राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.