सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
 शहर

गोपाळकृष्ण गोखले ( फर्गयुसन रस्ता ) रस्त्याचा श्वास कोंडतोय,प्रामाणिकपणे कठोर कारवाई करावी....

डिजिटल पुणे    31-12-2024 10:44:30

पुणे : तरुणाईचे आवडते ठिकाण म्हणजे ना. गोपाळकृष्ण गोखले पथ ( फर्गयुसन रस्ता ). येथे सणासूदीला,शनिवार रविवार तर गर्दी चा उच्चांक असतोच पण इतर दिवशी देखील नागरिक व पर्यटकांनी रस्ता गजबजलेला असतो. ह्या रस्त्यावरच्या पदपथावरील अतिक्रमण, स्टॉल, खोकी टाकून व्यवसाय करणाऱ्यांविरुद्ध शहरातील अनेक संस्था, संघटना, जागरूक पुणेकर, वृत्तपत्र सर्वांनी आवाज उठविला आहे. मी देखील 2/3 वेळा आंदोलन, निदर्शने केली आहेत व वेळोवेळी प्रशासनाकडे तक्रारी देखील केल्या आहेत.मात्र येथील अतिक्रमणकर्ते आणि प्रशासन यांचे नाते येवढे घट्ट आहे की येथे तात्पुरती कारवाई होते आणि पुन्हा पहिले पाढे पंचावन्न !!

काल येथे पाहणी केली असता पदपथा लगत भरपूर स्टॉल दिसून आले.... हे कमी की काय तर बहुतांश इमारतींच्या साईड मार्जिन, फ्रंट मार्जिन, पार्किंग च्या जागेत व अन्यत्र पत्र्यांच्या शेड उभारून आतल्या आत भरपूर दुकाने थाटल्याचे निदर्शनास आले.

अगदी चिंचोळ्या जागेत फॅब्रिकेशन करून, लोखंडी जिने उभारून ही दुकाने थाटली आहेत. 2/3 ठिकाणी तर इतकी गर्दी आणि कच्ची शेड ठोकून तेथे फॅशन मार्केट ची उभारणी बघितली आणि अंगावर काटा आला. चुकून एखादा अपघात घडला तर कोणाच्याही वाचण्याची सूतराम शक्यता नाही."Seeing is Believing" आज उद्याच वेळ काढून बघा, सोबत अतिक्रमण आणि बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना देखील न्या.

ह्या सर्वांना मनपा ची परवानगी आहे का ? असल्यास कोणत्या नियमानुसार ? काही ठिकाणी जागा मालकाने सीमाभिंत म्हणून उभारलेल्या पत्र्यांवर  कपडे लटकवून त्यावर व्यवसाय चालू आहे. माहिती घेतली असता ह्या स्टॉल धारकांचे प्रकरण म्हणे न्याय प्रविष्ट आहे.अश्या बाबतीत प्रशासन, मनपा चा विधी विभाग काय करतोय याची माहिती देखील उघड करावी ही विनंती.

ह्या रस्त्यावर जगप्रसिद्ध फर्गयुसन महाविद्यालय, रानडे इन्स्टिट्युट,हॉटेल वैशाली,लगतच्या रस्त्यावर बी एम सी सी, आय एम डी आर, गोखले इन्स्टिटयूट, मराठवाडा महाविद्यालय अश्या अनेक प्रतिष्ठित संस्था आहेत.एकीकडे परदेशात असते तसे गुडलक चौकात कलाकार कट्ट्यावर कलेचे प्रदर्शन करणारे, त्याभोवती गर्दी करणारे दर्दी पुणेकर आणि दुसरीकडे हे भयानक बेकायदेशीर चित्र !!आता परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी सावरा हा पसारा आणि प्रामाणिकपणे कायमस्वरूपी कठोर कारवाई करा अशी आग्रही मागणी करत आहे.

आपला,

संदीप खर्डेकर.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती